हवामान खात्याची पुन्हा फसगत
बुधवारी संध्याकाळी पडलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरांत मोठ्या प्रमाणावर दाणादाण उडवली. लोकल, रस्ते वाहतूक सर्वच मंदावले. लोकल खोळंबा व मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक मुंबईत सर्वत्र पाहायला मिळाली. सिएसएमटी वरून हार्बर मार्गावरून निघालेल्या रात्रीच्या लोकल्स तब्बल दीड दोन तास चुनाभट्टी स्थानकाच्या पुढे थांबून होत्या. त्यामुळे लोकलमधून उतरून लोकांनी हायवे पकडत घर गाठण्याचा प्रयत्न केला मात्र तेही वाहतुक कोंडीत अडकले. हीच परिस्थिती मध्य मार्गावरही होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने मुंबई ठाण्यातील शाळांना रात्री उशिरा सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र या सुट्टीची कल्पना नवी मुंबईतील अनेक शाळांना नसल्याने सकाळी पुन्हा गोंधळ सुरू झाला. नवी मुंबईतील बहुतांश शाळा या दिवशी नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे पाहायला मिळाले तर काही शाळा लवकर सोडण्यात आल्या. मात्र नेहमीप्रमाणे हवामान खात्याची फसगत करत या दिवशी गुरुवारी पावसाने दडी मारली. मध्यरात्रीनंतर पाऊस थांबून ठिकठिकाणी साचलेले पावसाचे पाणी ओसरले तरी गुरुवारी सकाळी घणसोली रेल्वे स्थानकात मोठया प्रमाणावर पाणी साचलेले हो...