निरोगी शरीरासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे
पावसाळा हा वातावरणातील गारव्यामुळे सुखावणारा असला तरी तो अनेक साथीचे आजारदेखील घेऊन येत असतो ही बाब ध्यानात ठेवली पाहिजे. त्यामुळे साथीच्या आजारापासून प्रत्येकाने स्वतःचे व कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी दक्ष असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात मुख्यत्वे सर्दी, ताप, डोकेदुखी, डेंग्यू, हिवताप यासारखे जलजन्य आजार पसरत असतात. दूषित पाणी व वातावरणातील बदलांमुळे हे आजार डोके वर काढतात. त्यामुळे पावसात फिरताना तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत योग्य काळजी न घेतल्यास आपण या आजारांना बळी पडतो. पावसाळ्यात पाणी गाळून व उकळूनच प्यायला हवे. ओलसर कपडे व पावसाच्या पाण्यात भिजणे शक्यतो टाळले पाहिजेत. महत्वाचे म्हणजे वर उल्लेख केलेल्या आजारांची कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास तातडीने आवश्यक चाचण्या व उपचार करायला हवेत. पावसाळ्यात राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झालेल्या आहेत. साथपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सरकारने हाती घेतलेल्या आहेत. त्यामुळे आजारपणात सरकारी दवाखान्यांत औषधोपचार लाभदायी ठरेल. आज ग्रामीण व शहरी भागांत अनेक सरकारी दवाखाने व रुग्णालये लोकांच्या सेवेत अविरत दिव...