Posts

Showing posts from September, 2020

तडजोडींवर उभ्या इमारती

Image
भिवंडीतील धामणकर नाका येथील पटेल कंपाउंड मधील जीलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले.  मागील महिन्यातच रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत कोसळून डझनभर लोकांचा मृत्यू झाला होता. भिवंडीच्या घटनेने पुन्हा एकदा या घटनेची पुनरावृत्ती झाली. जीलानी इमारत पालिकेने धोकादायक घोषित केल्यानंतर घरमालकांनी घरे खाली केली. तशा दोन नोटीसा घरमालकांना देण्यात आल्या होत्या. मात्र भाड्याच्या हव्यासापोटी ही घरे कमी भाड्यात मजुरांना भाड्याने दिली होती. जवळपास २५ कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास होती. आज इमारत कोसळल्याने यातील अनेक जीव तर गेलेच पण सर्वांचे संसारदेखील उध्वस्त झाले. भिवंडीसह सर्वच महानगरपालिका क्षेत्रात अशा धोकादायक व अनधिकृत इमारती रातोरात उभ्या राहत आहेत. इमारतीचे मालक त्यातील सदनिका बाजारभावापेक्षा कमी भावाने लोकांना विकून नामानिराळे होतात. काही वर्षांनी जेव्हा इमारत जीर्ण व कोसळण्याच्या अवस्थेत येते तेव्हा तेथील रहिवाशी दुसरीकडे घर घेण्यासाठी आर्थिक सक्षम नसतात. ...

असा मामा पुन्हा होणे नाही

Image
कुटुंबाचा आधारस्तंभ हरपला मागील शनिवारचा दिवस आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळवणारा ठरला. आमच्या सर्वांच्या लाडक्या भाईमामाला काळाने झडप घालत सर्वांपासून दूर नेले. गेल्या दोन वर्षांपासून किडनीचा आजार जडलेले मामा या वेळी मात्र दुखण्यातून सुटू शकले नाही. शुक्रवारी अचानक त्यांना पोटाचा विकार सुरू झाला व नैसर्गिक क्रियांमध्ये बाधा येत पोटात पाणी साचायला लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मामांचा मुलगा अनुप याने त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात भरती केले. सायंकाळपर्यंत त्यांची प्रकृती अधिक अत्यवस्थ झाल्याने त्यांना श्वास घेण्यासही प्रचंड त्रास होऊ लागला. त्यामुळे व्हेंटिलेटरच्या ताब्यात गेलेले मामा शनिवारी पहाटे त्यातून बाहेर पडले ते कायमचेच. पन्नाशीच्या वयातील मामा इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील याची सुतरामदेखील शक्यता नसल्याने कुटुंबातील सर्वांसाठीच हा मोठा धक्काच आहे. आपल्या हळव्या व मायाळू स्वभावाने संपूर्ण कुटुंबाला एकसंघ ठेवण्यात यशस्वी ठरलेले मामा इतरांना हेवा वाटावा असेच जीवन जगले. कुणाच्या घरचे लग्न असो, पूजा असो, आजारपण असो, शैक्षणिक अडचण असो किंवा अचानकपणे ...

लिखाणाने मिळतो आत्मविश्वास

Image
लॉ कडाऊनमध्ये काय केले असा प्रश्न कुणी केला तर बऱ्याच लोकांकडे उत्तरेच नाहीत. मात्र लॉकडाऊन ही छंदिष्ट लोकांसाठी एक पर्वणी होती असे मला वाटते. आयुष्य जगण्याच्या धडपडीत आपल्या आवडीच्या अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. लॉकडाऊनसारखा प्रसंग शतकामध्ये पहिल्यांदाच आला आहे. खरेतर ही जागतिक आपत्ती आहे त्यामुळे तिचा उत्सव साजरा करता येणार नाही. मात्र आयुष्यात पहिल्यांदाच मिळालेल्या ह्या सक्तीच्या सुट्टीत मानसिक तृप्तीचा आंनद शोधण्यात काय हरकत आहे. यासाठी आपल्या आवडीचा छंद जीवनात पुन्हा रुजवणे व जागवणे ही एक प्रकारची पर्वणी ठरू शकेल. आपल्याला अनेक छंद असतात पण 'वेळ मिळत नाही' या सबबीखाली आपण ते जोपासणे सोडून देतो. पण खरेतर हा आपल्या आत्मिक आनंदापासूनचा केवळ पळपुटेपणा आहे. ऐहिक सुखपायी आपण मानसिक आनंदावर विरजण घालत असतो. मनुष्याला आपल्या छंदाची आवड असेल तर सवड मिळतेच या मताचा मी आहे. त्यामुळेच लिखाणाचा लागलेला छंद आज माझे व्यसन बनला आहे. कामाचा कितीही व्याप असला तरी दिवसभरातून थोडा वेळ तरी लिखाणावर खर्च करतोच. मग तो प्रवासातील असो वा रात्री झोपण्यापूर्वीचा. त्यामुळे लॉकडाऊन काळातही जरी क...

वर्क फ्रॉम होम

Image
वर्क फ्रॉम होम ही लोकांची नव्हे तर काळाची गरज होती व आहे. कोरोना संक्रमण काळात जर घरून काम करण्याचे प्रावधान नसते तर अनेक उद्योगधंदे व छोटेमोठे व्यवसाय आतापर्यंत बंद पडले असते. आयटी क्षेत्रातील अनेक कँपन्या तर आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम पर्याय देण्याच्या विचारात आहेत. कार्यालये, वीज पुरवठा, सार्वजनिक वाहतूक सेवा यांवरील सध्याचा ताण पाहिला तर सरकारी निकषांप्रमाणे सोशल डिस्टन्स राखणे अत्यंत जिकिरीचे आहे. संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करण्यासाठी सार्वजनिक स्थळांवरील गर्दी नक्कीच परवडणारी नाही. पाश्चात्य देशांमध्ये वर्क फ्रॉम होम चा पर्याय केव्हाच अंगिकारला गेलाय. करिअर व कौटुंबिक स्वास्थ्य संतुलित राहावे यासाठी वर्क फ्रॉम होम हा उत्तम प्रयोग आहे. त्यामुळे कोरोनासारख्या जीवघेण्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी घरून काम करण्याचा पर्याय जिथे जिथे शक्य असेल तिथे वापरायला काहीच हरकत नाही.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

वेळेत निदान आणि वेळेत उपचार

Image
  जगभरासह भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० लाखांकडे झपाटयाने धाव घेत आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी दैनंदिन रुग्णवाढीच्या तुलनेत बरे होण्‍याचे प्रमाण दिलासादायक आहे. आतापर्यंत सुमारे ३७ लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सुमारे ७८ हजार जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मृत्युदर हा १.६ टक्के आहे. बरे होणारे देशातील ६० टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या ५ राज्यांतील आहेत. कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र व राज्‍य सरकारमार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोना परिस्थिती संदर्भात एक अहवाल जारी केला असून, त्यानुसार कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारण्याचा वेग हा सर्वाधिक असून मे महिन्यात जवळपास ५० हजार रुग्ण बरे झाले तर सप्टेंबर महिन्यात हीच आकडेवारी ३६ लाखांहून अधिक आहे. लोकांच्या मनात कोरोनाबद्दलची भीती कमी झाली तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होऊ शकते. कोरोनाची साथ ही अन्य साथींप्रमाणेच एक आहे हे समजून घेतले पाहिजे. कोरोना स...

माझे कुटुंब, माझी जबाबदारी, आरोग्य सेवा आपुल्या दारी

Image
कोरोनामुक्त महाराष्ट्र हेच आमुचे ध्येय मीच माझ्या आरोग्याचा शिल्पकार आली आली पहा, कोरोनाची लाट | जनजीवन अन आरोग्याची, लागलीया वाट || सरकारी प्रयत्नांना, साथ देऊ सारे | सामाजिक अंतराचे, नियम पाळू सगळे || मास्क वापरा सदैव, कंटाळा कशाला | संसर्ग रोखायला, आडकाठी कशाला || लक्षणे दिसता, उपचारांची कास धरा | अंगावर काढून, लपवू नका आजारा || कोरोनाचा संसर्ग, वाढू वाढू लागलाय | मृतांचा आकडाही, वाढतच चाललाय || घरोघरी आरोग्य सर्वेक्षण, मोहीम आली सरकारी | ध्यानात घ्या, माझे कुटुंब माझीच जबाबदारी || सरकारी सेवा येणार, आपल्या प्रत्येकाच्या दाराला | तुमची साथ मोलाची, या सरकारी मोहिमेला || योग्य माहिती दिली पाहीजे, आरोग्य पथकाला | लक्षणे दिसता उपचार घ्या, दडवू नका आजाराला || सर्दी, खोकला, ताप, अन कणकण वाटता | उठा त्वरित जवळचा, सरकारी दवाखाना गाठा || आपणच होऊ आपल्या, आरोग्याचे शिल्पकार | कोरोनाला करायचे आता, महाराष्ट्रातून हद्दपार || वै भव मोहन पाटील 

मुंबई लोकल सुरू करा

Image
  सध्या मुंबईकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सरकारने सर्व उद्योगधंदे व आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिल्याने तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास ई पासची अट देखील रद्द केल्याने मोठ्या संख्येने लोक वाहनांसह रस्त्यावर उतरत आहेत. याचा परिणाम वाहतूक कोंडीत होऊन थोड्या अंतरासाठी देखील तासंतास अडकून पडावे लागत आहे. त्यात टोल नाके वाहतूक कोंडीचे सर्वात मोठे केंद्र बनले आहेत. मिशन बिगेन अगेनकडे वाटचाल करताना मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा सूरू करणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबई व उपनगरातील लाखो लोक ह्या लोकलसेवेचा उपयोग प्रवासासाठी करतात. सध्या सर्वसामान्यांनासाठी ही सेवा बंद असून अत्यावश्यक सेवेतील नोकरदारांसाठीदेखील तासातासाच्या अंतराने लोकल धावत आहे. त्यामुळे साहजिकच याचा मोठा ताण रस्तेवाहतुकीवर पडत आहे.  उपनगरांतून पोटापाण्यासाठी मुंबईकडे धाव घेणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोजची ही वाहतूककोंडी वेळ, पैसा, इंधन व आरोग्याचा अपव्यय करणारी ठरत असून मनस्ताप वाढवणारी आहे. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी...

कंगनाचे वर्तन निंदनीय

Image
मु बई व मुंबई पोलिसांबाबत अभिनेत्री कंगना राणावतची बेताल वक्तव्ये अत्यंत निंदनीय व असमर्थनिय आहेत. मुंबईत इतकी वर्षे राहून व आपले करिअर घडवल्यानंतर अचानक असुरक्षितता जाणवू लागल्याचे म्हणणे खाल्लेल्या ताटात छेद करण्यासारखे आहे. अशी वक्तव्ये जाहीरपणे करण्याची हिंमत होतेच कशी? मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे म्हणजे इथल्या व्यवस्थेवर अविश्वास दाखवल्यासारखे आहे. मुंबई आज वास्तव्यासाठी सुरक्षित व कामधद्यांचे माहेर समजले जाते. त्यामुळे देशभरातून लोक इथे येऊन आपला उदरनिर्वाह करतात. सिनेसृष्टीतील सर्वच तारक तारकांना मुंबईने पैसा, प्रसिद्धी व नाव सर्व काही दिले. अशी मुंबई अतिरेकी वाटू लागणे म्हणजे द्रोहच म्हणावा लागेल. अशा व्यक्तीला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे कंगनाने आपल्या बेजबाबदार वर्तनाबद्दल मुंबईकरांची जाहीर माफी मागावी.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

ट्रान्स हार्बर सुरू करा

Image
कोरोना प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर अत्‍यावश्‍यक सेवेतील कर्मचा-यांसाठी तिनही मार्गांवरील लोकलसेवा सध्‍या सुरु आहे. मात्र मध्‍य व हार्बर मार्गाला जोडणा-या ट्रान्‍स हार्बर मार्गावरील लोकल अदयापी सुरु करण्‍यात आलेल्‍या नाहीत. वास्‍ताविकतः नवी मुंबईत राहणारा बहुतांश नोकरदार वर्ग हा मुंबईत नोकरी धंदयानिमित्‍त प्रवास करत असतो. तसेच ठाणे दिशेकडुन नवी मुंबईच्‍या दिशेने कामानिमित्‍त प्रवास करणारे लोकदेखील मोठया संख्‍येने आहेत. या मार्गावर प्रवास करणा-यांची संख्‍या गेल्‍या काही वर्षांपासुन मोठया प्रमााणावर वाढलेली आहे. त्‍यामुळे ऐरोली ते कोपरखैरणे भागांत राहणा-या लोकांना मुंबईच्‍या दिशेने प्रवास करण्‍यासाठी तसेच कल्‍याण दिशेकडून नवी मुंबईत येणा-यांसाठी ट्रान्‍स हार्बर मार्गाचा मोठा आधार आहे. मात्र अत्‍यावश्‍यक सेवेतील लोकांसाठी लोकल सुरु झाल्‍यानंतरदेखील अदयापी हा लोकलमार्ग प्रवाशांकरीता बंद असणे अनाकलनीय आहे. ट्रान्‍स हार्बर मार्गावरील प्रवाशांंवर हा एक प्रकारचा अन्‍यायच आहे. वास्‍ताविकतः इतर तिनही मार्गांपेक्षा ट्रान्‍स हार्बर मार्गावरील गर्दी आटोक्‍यातील असल्‍यामुळे या मार्गावरील रेल्‍वे...

नैराश्यात दडलेला कोरोना

Image
  कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये मानसिक ताण व नैराश्य आल्याने मृत्यू झाल्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाविषयी असलेल्या अज्ञानाने एक गंभीर असाध्य आजार झाल्याची भीती रुग्णांमध्ये निर्माण होते व ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते. त्यातून बाहेर पडणे त्या व्यक्तीला कठीण होऊन जाते व वेळीच तिला मानसिक पाठबळदेखील न मिळाल्याने त्याचा जीवघेणा परिणाम त्या व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होतो. आगामी काळात याच मानसिक विवक्षिततेतून रुग्णांना बाहेर काढण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर आहे. तसेच मानसिक आरोग्य या काहीश्या दुर्लक्षित समस्येकडेदेखील कटाक्षाने लक्ष केंद्रित करणे काळाची गरज बनलेली आहे. मनाने व्यक्ती सक्षम व सशक्त असेल तिला इतर व्याधी फार पटकन चिकटत नाहीत. मानसिक आरोग्य हा गहन आणि व्यापक विषय आहे. मात्र ताण आणि नैराश्य हे मानसिक आरोग्याचे सर्वाधिक चर्चिले जाणारे व्यंग आहेत. ताण ही आपल्यातील सर्वाधिक जणांना भेडसावणारी समस्या आहे तर नैराश्य हा सर्वात जास्त आढळणारा मानसिक आजार आहे. अनेकदा ताण हे नैराश्य येण्याचे कारण असते. मात्र ह्या ताणाचे परिणाम व नैराश्याची कारणे ...

भारत आणि आंतराष्ट्रीय अर्थव्यवस्था

Image
ऍ पेल ह्या अमेरिकन कंपनीचे बाजारपेठीय मूल्य दोन लाख कोटी अमेरिकन डॉलर्स असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरेतर आंतराष्ट्रीय बाजारपेठेचे हे वास्तव भारतासह अनेक देशांच्या आर्थिक स्थितीची दयनियता समोर आणणारे आहे. सध्या भारताच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेला सोयीस्कररित्या कोरोनाला जबाबदार धरले जाते. मात्र कोरोनाच्या अगोदर तरी अर्थव्यवस्था कोणत्या उंचीवर होती याबाबत कुणी बोलायला तयार नाही. ऍपेल या एकट्या कँपनीचे मूल्य जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक आहे आणि कदाचित काही दिवसांनी भारतापेक्षाही मोठे असेल. भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना तसेच त्याला खीळ बसवण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्नशील असताना कोरोनाचे संकट भारतीय अर्थव्यवस्थेला भारी पडल्याचे चित्र आहे. मागणीच आटल्याने उद्योगक्षेत्राने पुरवठ्यासाठी कितीही आटापिटा केला तरी तो फेल असणार आहे. एकतर सर्वसामान्यांच्या हातात आज लॉकडावूनमुळे पैसा नाही. बेरोजगारी उग्र रूप धारण करत आहे. त्यामुळे भविष्याच्या चिंतेने लोक खर्चासाठी हात आखडता घेत आहेत. त्याचा गंभीर परिणाम बजारपेठांवर होत असून नाईलाजाने व्यावसायिक महागाई वाढ...

नेत्रदान पंधरवडा

Image
२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा राबवण्यात येत आहे. माणूस आपल्याला मिळालेल्या अवयवांची विशेष काळजी घेत असतो. कान, नाक, डोळे, हात, पाय ही नीटनेटकी व व्यवस्थित असतील तर मनुष्य आयुष्यात कितीही मोठया संकटाला सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे हे अवयव जपण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असतो. मात्र समाजात आज एक किंवा अधिक अवयव नसणारे लोकदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत हेदेखील विसरून चालणार नाही. त्यातूनच अवयवदानाची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात दृढ झाली. आज अवयवदानाने अनेक लोकांना नवसंजीवनी मिळाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. आपल्या सर्व अवयवांमध्ये अत्यंत महत्वाचा व संवेदनशील अवयव म्हणजे आपले डोळे. डोळे ही सजीवांना त्यातही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी मानली जाते. मात्र, सर्वांनाच ही देणगी मिळालेली नाही. जन्मजात आंधळे असणे किंवा अपघाताने अंधत्व येणे यामुळे अशा व्यक्ती सृष्टीच्या सौंदर्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. मात्र, आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या आधारे आपण एका व्यक्तीची दृष्टी दुसर्‍या एका अंध व्यक्तीला देऊन त्याचे जीवन प्रकाशित करू शकतो. नेत्रदानाच्या माध्यमातून मनुष्...

आणखी थोडे थांबा

Image
  जीवनावश्यक वस्तूंसाठी अत्यावश्यक सेवांना कोरोना साथीच्या सुरुवातीपासूनच सूट देण्यात आल्यामुळे लॉकडाऊनचा फार मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर झाला नाही. प्रश्न राहिला तो व्यवसाय व उद्योगधंद्याचा, तर तेदेखील आता टप्प्याटप्प्याने सर्व खुले होण्याच्या मार्गावर आहेत. शाळा व मंदिरे ही ठिकाणेदेखील कोरोनासाठी प्रतिबंधात्मक दक्षता घेऊन उघडता येणे शक्य असले तरी तूर्तास कोरोनावर ठोस औषधोपचार व लस उपलब्ध होईस्तोवर तरी ही ठिकाणे सुरू न करणेच इष्ट ठरेल. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्व दैनंदिन व्यवहार व सार्वजनिक ठिकाणे एकदम खुली करणे थोडे घातक ठरू शकते. रुग्णसंख्या अचानकपणे झपाट्याने वाढली तर त्याचा मोठा भार सरकारी यंत्रणांवर पडेल व सामाजिक स्वास्थ्यदेखील पुन्हा एकदा कोलमडेल. यामुळे सर्व काही पुन्हा सुरळीत होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करणेच योग्य ठरेल असे मत आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई