आरोग्यमंथनची पंचाहत्तरी दीड वर्षांपूर्वी "आरोग्यमंथन" ही आठवड्याच्या दर मंगळवारी प्रकाशित होणारी आरोग्यविषयक लेखमालिका मी दैनिक नवे शहर या वृत्तपत्रामधून सुरू केली. आपणा सर्व हितचिंतक व वाचकांच्या आशीर्वादाने ही मालिका आज पंचाहत्तरीपर्यंत पोहोचली आहे. आज आरोग्यमंथन या आरोग्यविषयक लेख मालिकेतील ७५ वा लेख आपल्यासमोर ठेवताना मला मनस्वी आंनद होत आहे. साधारण वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या ह्या आरोग्य जागृतीविषयी मोहिमेचा ७५ लेखांचा पर्यायाने 75 आठवड्यांचा प्रवास कधी संपला हे कळलेच नाही. आज महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक आरोग्य योजना राज्यभरामध्ये राबवण्यात येत आहेत. या योजना म्हणाव्या तितक्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचत नसल्याने लोकांची आजही सरकारी आरोग्य सेवेबद्दल अनास्था पदोपदी दिसून येते. याला कारणीभूत अनेक घटक आहेत. प्रसारमाध्यमे हा त्यातलाच एक घटक. मात्र प्रसारमाध्यमांचे प्रशासकीय धोरणांशी फार सख्य नसल्यामुळे शासनाच्या कामकाजात कुठे त्रुटी मिळतात याच्या मागोव्यावर बरीचशी माध्यमे असतात. अनेक माध्यमे तर केवळ र...