Posts

Showing posts from November, 2019

प्रखर विरोधी बाणा सत्ताधाऱ्यांना एकत्र ठेवणार

Image
सध्या अस्तित्वात आलेले महाविकास या नव्या कोऱ्या आघाडीचे सरकार वैचारिक नव्हे तर सत्तास्थापनेसाठी निर्माण झालेल्या परिस्थितीने बनलेले सरकार आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सुरू असलेली घोडदौड व त्यामुळे प्रादेशिक पक्षांबरोबरच राष्ट्रीय पक्षांचादेखील कमी होत चाललेला प्रभाव हे कारण या अभूतपूर्व आघाडीमागे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाजप पक्षाला जनतेने मोठा कौल देत सत्ता बहाल केली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पाच वर्षांमध्ये घेतलेले मोठमोठे निर्णय व त्याला मिळालेला जनाधार याचे ते फलित होते. मात्र सत्ता उपभोगताना घटकपक्ष व विरोधक यांना विश्वासात घेताना न जमलेला ताळमेळ यामुळे भाजप एकटा पडल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले. यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राजकीय व वैचारिक मतभेद असलेल्या पक्षांची मोट बांधून सत्तास्थापन करण्यात आली आहे. विधिमंडळात व राज्यात स्वतंत्रपणे विचार केला तर भाजपच मोठा पक्ष असल्यामुळे विरोधी कणा मजबूत झाला आहे. मात्र भाजपचा हाच प्रखर विरोधी बाणा महाविकास आघाडीतील पक्षांना घट्ट बिलगून राहण्यास कारणीभूत व टॉनिक ठरणार आहे. श्री उद्धव ठाकरे यांच्यासारखे संयम...

सरकार तर आले.....पण आव्हाने कायम

Image
अखेर सरकार स्थापन झालं आणि महाराष्ट्रातील जनतेनं सुटकेचा निश्वास टाकला. महिनाभर सुरू असलेल्या शह- काटशहाना अखेर पूर्णविराम मिळाला. अपेक्षेप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे शासन अस्तित्वात आले आहे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर जपलेली "हिंदुहृदयसम्राट" ही शिवसेनेची प्रतिमा जपणे धर्मनिरपेक्ष सहकाऱ्यांमुळे आगामी काळात सेनेला जिकिरीचे जाणार आहे. याची कल्पना दस्तुरखुद्द ठाकरे घराण्याला असूनदेखील त्यांनी सेना व स्वाभिमान टिकवण्यासाठी हे आव्हान स्वीकारले आहे असेच म्हणावे लागेल. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये ना भाजपची, ना राष्ट्रवादीची, ना काँग्रेसची प्रतिमा पणाला लागली, आव्हान आहे ते केवळ शिवसेनेपुढे. पारंपरिक राजकीय वैरी असलेल्या काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा महाराष्ट्रातील मोठा धोका पत्करत सेनेने थेट पक्षप्रमुखानाच मैदानात उतरवले व मुख्यमंत्री देखील बनवले. राजकीय सत्तापटलावरची गणिते सोडवण्यात शिवसेना यशस्वी झाली खरी मात्र खरी लढाई तर पुढे आहे. आजवर केवळ मातोश्रीवरून रिमोट कंट्रोल चालवणाऱ्या ठाकरे घराण्याची ...

नुकसानभरपाई वाढवून द्यावी

Image
राज्यपालांनी अडीच एकराला आठ हजार नुकसान भरपाईची मदत अत्यंत तुटपुंजी आहे. पीक लागवडीपासून ते हातात येईपर्यंत शेतकऱ्याचा खर्च आज अवाक्याबाहेरचा आहे. बियाणे, खते, नांगरणी, पेरणी, कापणी, झोडपणी यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ व खर्च लागतो. तो भागवण्यासाठी शेतकरी कुठूनतरी उसनवारी किंवा कर्ज काढतो. अडीच एकर साठी येणारा खर्च आठ हजारात कुठल्या हिशोबात बसवला गेलाय हे अनाकलनीय आहे. संपूर्ण पीक हंगामात यासाठी शेतकऱ्याचा खर्च खूप मोठा आहे. नुकसान भरपाई व पीकविमा मिळून त्याला किमान पंचवीस ते तीस हजार हेक्टरी मिळायला हवेत. सर्वसामान्य व अल्पभूधारक शेतकरी या मदतीत समाविष्ट व्हावेत यासाठी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय रास्त असला तरी हेक्टरी मदत वाढवून देण्याबाबत विचार व्हायला हवा.  वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई

राजकीय घडामोडी आकलनापलीकडल्या

Image
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडले गेलेल्या आहेत. कधी नव्हे इतके राजकीय डावपेच परस्परांविरुद्ध टाकले जात आहेत. कोण कुणाच्या मागे उभा आहे व कधी कुणाचा गेम करेल याचा काही भरवसा राहिलेला नाहीय. एकीकडे सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सरकार उदयास येईल असे वाटत असताना राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी नाट्यमय पद्धतीने अचानक उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन अवघ्या देशाच्या राजकारणाला जबरदस्त हादरा दिला. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व राजकारणातील चाणक्य शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष भाजप सोबत जाणार नसल्याचे स्पष्ट करून आणखी एक भूकंप घडविला. आता नव्याने उदयास आलेल्या भाजप सरकारला आपल्या मागे विरोधी पक्षांचे किती आमदार उभे राहतील याचे अंकगणित ठाऊक नसणार हे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. बरं अजित पवार यांच्या भरवश्यावर भाजपने शपथविधीची खेळी केली असेल तर तेदेखील मनाला पटत नाही. कारण गेली अनेक वर्षे राज्याच्या व देशाच्या सत्ता पटलावर आपले महत्व अबाधित राखणाऱ्या पवार घराण्यात इतक्या सहजासहजी फूट पडेल हेदेखील केवळ अशक्यच. सद्यस्थितीत भाजप बहुमत सिद्ध करू...

आरोग्यमंथन - रस्ते अपघातांचे प्रमाण वाढतेय

Image
रस्ते अपघातांचे प्रमाण वाढतेय  आज  आपल्‍याला अवतीभोवती जिकडे बघावे तिकडे नुसती वाहनेच वाहने दिसुन येतात. सर्वत्र वाहनांच्‍या लांबच लांब रांगा व वाहतूक कोंडीत उभी असलेली वाहने दररोज वाढतच चाललेली आहेत. दरदिवशी नव्‍याने नोंदणी होणारी हजारो वाहने थेट रस्‍त्‍यावर येऊन वेगाशी स्‍पर्धा करु लागली आहेत. यातुन दररोज रस्‍ते अपघातांचे प्रमाणदेखील प्रचंड वाढले आहे. अपघात या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर वाहनांचे अपघात येतात. अपघात या शब्दाची काटेकोर व्याख्या करणे अवघड आहे, पण पूर्वसूचनेशिवाय, ध्यानीमनी नसता घडलेली घातक घटना असा ‘अपघात’ या शब्दाचा सामान्य अर्थ होतो. मात्र रस्‍ते अपघातांची संख्‍या आज प्रचंड आहे.  जगात दरसाल १३ लाख लोक रस्त्यांवरील वाहनांच्या अपघातांत मृत्युमुखी पडतात. असे अपघात टाळावेत यासाठी गांभीर्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्‍याची गरज निर्माण झाली आहे. वाहतुक नियम कडक करण्‍यात आलेले असले तरी त्‍याची अंमलबजावणी फार  परिणामकारक व पारदर्शकपणे होत नसल्‍याने परिस्‍थीती अधिकच भयावह बनत चाललेली आहे. बेदरकारपणाने वाहने चालवण्याचे प्रमाण वाढत आहे. रस्‍त्‍यांची अव...

आरोग्य सेवेची संवेदनशीलता

Image
सार्वजनिक आरोग्य सेवा दिवसागणिक संवेदनशील बनत चालल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. आरोग्य सेवेतील काही असंवेदनशील घटकांमुळे पूर्ण विभागाला दूषणे लागतात. मात्र ह्या सेवेत काम करणारे अनेक कर्मचारी रुग्णांप्रति प्रचंड सहानुभूती ठेवून काम करतात हेदेखील तितकेच खरे आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत याचा परिचय कोल्हापूर जिल्ह्यात आला. कोल्हापुरातील निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या नीता खंदारे या गरोदर महिलेच्या कुटुंबियांना हा शासकीय सेवेच्या आपुलकीचा रोमांचक अनुभव आला. साखरी येथे राहणाऱ्या नीता खंदारे यांना दुपारी बाराच्या सुमारास निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी भरती करण्यात आले. मात्र तेथे प्रसूतीसाठी प्रयत्न केल्यानन्तर सायंकाळी पाच वाजता त्यांची प्रकृती चिंताजनक बनू लागली. तेथे अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्वरित कोल्हापूर येथे हलवणे गरजेचे होते. मात्र कोल्हापूर गगनबावडा या रस्त्यावर पावसाचे प्रचंड पाणी जमा झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला होता. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तातडी...

बँकिंग क्षेत्र अविश्वासार्हतेकडे

Image
सप्टेंबर महिन्यात निर्बंध घातलेल्या पीएमसी बँकेचे खातेदार दोन महिने उलटत आले तरी अजून स्वकष्टाच्या बँकेत गुंतवलेल्या पैशांसाठी झगडत आहेत. वृद्ध, महिला व असहाय खातेदारांकडून जवळपास दररोज निदर्शने सुरू आहेत तरी त्यांची किव करावीशी कुणाला वाटत नाही हे देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. १९८४ साली स्थापन झालेल्या या बँकेने सहकारी क्षेत्रात हळूहळु पाय रोवत निरनिराळ्या राज्यांत १३७ शाखा उघडल्या. आरबीआयच्या मानन्याप्रमाणे बँकेची स्थिती व पत चालू आर्थिक वर्षापर्यंत उत्तम होती. मात्र एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत असे काय घडले की अचानक आरबीआयला या बँकेत मोठी अफरातफर झाल्याचे अवगत झाले याचे उत्तर देण्याची तसदीदेखील अद्यापि आरबीआयने घेतलेली नाही. आरबीआयने आजवर केलेल्या लेखपरिक्षणामधील त्रुटी व कमतरतांचा हा परिपाक आहे. त्यामुळे या घोटाळ्याला जबाबदार घरभेदी अगोदर आरबीआयने शोधायला हवेत. बँकेचे लाखो खातेधारक अजूनही आपल्या आयुष्यभराच्या गुंतवणुकीच्या अपेक्षेत वाऱ्यावर व अधांतरीच आहेत. त्याबद्दल अधिकृतरित्या साधे दिलासा देणारे वक्तव्य करण्यासही यंत्रणा तयार नाहीत. उद्योगपती, शेतकरी यांना मदत देणाऱ्या क...

खातेदार वेठीस का

Image
पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळ्यात खातेधारकांची खाती गोठवणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे आहे. हजारो कोटी कर्ज देऊन व त्यासाठी बोगस खाती बँकेत उघडून बँकेच्या, आरबीआयच्या व एचडीआयएल कँपणीच्या अधिकाऱ्यांनी खातेधारकांची फसवणूक केली व त्यांची कष्टाची कमाई हडप केली. मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या खातेधारकांनाच त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास मनाई करण्यात आली. हा प्रकार म्हणजे खातेधारकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून संशयाच्या भोवऱ्यात आणण्यासारखे आहे. आयुष्यभराची स्वकष्टाची कमाई बँकेत गुंतवून लोकांनी मोठी घोडचूक केली काय? याचा खुलासा एकदा सरकारने व आरबीआयने करायला हवा. जेणेकरून यापुढे कोणत्याही बँकेत पैसे गुंतवण्यापूर्वी लोक हजारदा विचार करतील. घोटाळेबाजांवर कडक कारवाई करून त्यांची संपत्ती जप्त करावी मात्र सर्वसामान्य खातेधारकांची पुंजी हडप करून त्यांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे?  वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई

लहान मुलांचे आरोग्य महत्वाचे

Image
लहान मुलांचे आरोग्‍य महत्‍वाचे १४ नोव्‍हेंबर रोजी ''बाल दिन'' मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. मुले ही देशाचे भविष्‍य असतात व हेच भविष्‍य उज्‍वल होण्‍यासाठी सामाजिक व कौटुंबिक पातळयांवर जाणिवपूर्वक प्रयत्‍न करण्‍यात येत आहेत. मुलांचे शैक्षणिक करीअर घडवण्‍याबरोबरच त्‍यांचे आरोग्‍य अबाधित राखणे हीदेखील अत्‍यंत महत्‍वाची बाब आहे. लहान मुलांचे आरोग्‍य हा आपल्‍या सर्वांच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत जिव्‍हाळयाचा व संवेदनशिल विषय आहे. मुलांचे आरोग्‍य सुदृढ राखणे ही पालकांची मोठी जबाबदारी असते. आजकाल मुलांची दिनचर्यादेखील खूप व्‍यस्‍त झालेली आहे. शाळा, अभ्‍यास, क्‍लासेस, निरनिराळया अॅक्‍टीव्‍हीटीज यामध्‍ये मुलांचा दिवस कसा जातो तेच कळत नाही. या सर्व व्‍यस्‍त दिनचर्येत मुलांची शारीरीक हालचाल निट होत नाही. त्‍यांच्‍या शरीरास हवा तेवढा व्‍यायाम मिळत नाही. आजकालच्‍या मुलांची बौध्‍दीक क्षमता जरी चांगली असली तरी त्‍यांची शारीरीक शक्‍ती हवी तेवढी मजबूत राहत नाही. वातावरण बदललं व थोडी दगदग झाली की मुलांचं आजारी पडणं, व्‍हायरल इन्‍फेक्‍शन या गोष्‍टी सामान्‍य झालेल्‍या आहेत. बिझी शे...

पुस्‍तक परिक्षण - योगाभ्‍यास डॉक्‍टरी चष्‍म्‍यातून

Image
योगाभ्‍यास डॉक्‍टरी चष्‍म्‍यातून - डॉ. सतीश पाठक  प्राचीन काळी ऋषी मुनींनी अध्‍यात्मिक व आरोग्‍यविषयक संशोधनाचे एक तांत्रिक शास्‍त्र निर्माण करुन त्‍याला योगशास्‍त्र हे नाव दिले. योग ही शरीराला संतुलित  प्रसन्‍न ठेवण्‍यासाठीची एक क्रिया आहे. आपण आपल्‍या शरीराकडे वेळीच लक्ष न दिल्यास आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात. हे टाळून निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग्य व्यायाम व आहार महत्वाचा ठरतो. या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करत डॉ. सतीश पाठक यांनी ''योगाभ्‍यास - डॉक्‍टरी चष्‍म्‍यातून'' या पुस्‍तकाव्‍दारे योगाभ्‍यासाविषयी मार्गदर्शन केले आहे. वैदयकीय अभ्‍यासक्रमात एमएस, एफसीपीएस व एमएनएएमएस पदवी मिळवलेले व मुळचे सर्जन असलेल्‍या डॉ. पाठक यांनी  योगासने व प्राणायाम हा सर्वांत स्वस्त व मस्त व्यायाम प्रकार आहे हे सांगून विविध व्याधींमध्ये उपयुक्त आसनांची माहिती दिली आहे. नेत्रस्‍नान, ब्रम्‍हमुद्रा, नमनमुद्रा, योगमुद्रा, जलनेती, जलधौती, कपालभाती, उज्‍जायी , शीतली, वायुसार, अग्‍नीसार, उछदीयान, नौली, नौलीचालन, शंखप्रक्षालन, प्राणधारणा, क्रियायोग, ओम, गायत्री, आसन, षटच्रक्र, शवा...

पालिकेची एसी बस सेवा नक्की कुणासाठी

Image
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाद्वारे मोठा गाजावाजा करत काही मार्गांवर एसी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. लोकांना चांगली, किफायतशीर व आरामदायक सेवा उपलब्ध करून देणे हे त्यामागील उद्दिष्ट आहे. मात्र मागच्या रविवारी एक वेगळाच अनुभव मला ह्या सार्वजनिक परिवहन सेवेचा आला. रविवार सुट्टीचे निमित्त साधत मी कुटुंबासह दादर येथील सिद्धीविनायकाच्या दर्शनास गेलो होतो. येताना एनएमएमटीची 121 क्रमांकाची एसी बस पकडली. मंदिर बस स्टॉप पासून घणसोलीपर्यंत तिकीट प्रतिप्रवाशी 90 रुपये. सोबत पाच वर्षांची मुलगी असल्याचे वाहकास सांगीतल्यानंतरदेखील त्यांनी अर्धे तिकीट न देता तीन व्यक्तींचे 270 रुपयांचे तिकीट दिले. याबाबत विचारणा केल्यानंतर या बसमध्ये लहान मुलांना अर्ध्या तिकिटाची व्यवस्था नसल्याचे वाहकाने सांगितले. अगोदरच या बसचे तिकीट खूपच जास्त असल्यामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. वृद्ध, महिला, गरोदर स्त्रिया, अपंग यांना बसण्याची अपुरी व्यवस्था व तिकीटाचे दर ऐकूनच अनेक प्रवाशी बसमधून उतरत असल्याचे दिसून येत होते. त्यातच लहान मुलांनादेखील तिकिटातून सूट मिळत नसेल तर ही सेवा नेमकी कुणासाठी ...

नव्याने निवडणुका राज्याला परवडणाऱ्या नाहीत

Image
महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत दयनीय आहे. संमिश्र कौल देऊन जनतेने विरोधी पक्ष मजबूत केला खरा पण सध्या सत्तेच्या सुंदोपसुंदित कुणीही दुसऱ्यासोबत एकत्र येऊन सरकार बनवण्यास तयार नाही. आज राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. सरकार बनेल व लवकर नुकसान भरपाईचा निर्णय घेईल या आशेत बसलेल्या शेतकऱ्यांचीही घोर निराशा झाली व अखेर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गुरुवारी थेट राजभावनावर धडक दिली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानन्तर येत्या सहा महिन्यांत कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकला नाही तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जाऊ लागू शकते जे अजिबात परवडणारे नाही. दुसऱ्यांदा निवडणुका प्रस्थापित उमेदवारांना जड जातीलच पण जनतेच्या कररूपी पैशाचा चुरडादेखील करणाऱ्या ठरतील. गेले दोन तीन महिने निवडणूकांमुळे अगोदरच विकास कामांशीवाय वाया गेलेले आहेत. पुन्हा निवडणुका झाल्यास त्याचा विपरीत परिणाम राज्यातील विकासकामांवर होईलच पण त्याची मोठी किंमत प्रस्थापित राजकीय पक्षांना चुकवावी लागेल. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा राजकीय पक्षांनी लवकरात लवकर...

आरोग्‍य विभागात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

Image
आरोग्‍य भवनमध्‍ये जयंती कार्यक्रम १९ व्‍या शतकातील आदिवासींचे महानायक बिरसा मुंडा यांची १५ नोव्‍हेंबर रोजी जयंती. बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. 19 व्या शतकात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच जाते. अशा हया महान कतृत्‍वाची जयंती १५ नोव्‍हेंबर रोजी सर्वत्र उत्‍साहात साजरी केली गेली. सार्वजनिक आरोग्‍य आयुक्‍तालयाच्‍या आरोग्‍य भवन येथील तळमजल्‍यावरील सभागृहातदेखील आदीवासी जननायक बिरसा मुंडा यांच्‍या जयंतीचा कार्यक्रम अधिकारी व कर्मचा-यांच्‍या उपस्थितीत शुक्रवार दिनांक १५ नोव्‍हेंबर २०१९ रोजी पार पडला. याप्रसंगी विचारमंचावर उपस्थित अधिका-यांनी बिरसा मुंडा यांचे कार्य व योगदान उपस्थितांसमोर विषद करत भारतीय इतिहासातील त्‍यांचे महत्‍व अधोरेखित केले. आरोग्‍य सेवेतील सहायक संचालक डॉ. दुर्योधन चव्‍हाण या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रशासकीय अ...

कागदपत्रांना डिजिटल सुरक्षेएवजी बँकेतील पैसा सुरक्षित करा

Image
बँक खातेधारकांच्या कागदपत्रांना डिजिटल सुरक्षा देणारी 'सहमत' योजना केंद्र सरकार राबवणार असल्याचे समजते. एकीकडे बँकेचे व्यवहार सुरक्षित करण्याची सरकारी धोरणे जाहीर करायची व त्यातून पळवाटा काढण्यासाठी पीएमसीसारख्या बँकेला वाट करून द्यायची असाच निष्कर्ष काढला जाऊ शकतो. खातेधारकांची कागदपत्रे सुरक्षित होतील मात्र पैशाचे काय? पीएमसी बँकेच्या खातेधारकांना अचानक स्वतःच्याच खात्यातील पैसे काढण्यास मज्जाव करून त्यांची खाती त्यांचा काहीही दोष नसताना गोठवण्यात आली. बँकेत अनेक वर्षांपासून सुरू असलेला गैरव्यवहार, बोगस कागदपत्रांच्या आधारे उघडण्यात आलेली हजारो बनावट खाती सोयीस्कररित्या दुर्लक्षित केली गेली व अचानक एके दिवशी खातेधारकांचीच गुंतवणूक काढता येणार नाही असे सांगितले गेले. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे झाले. घोटाळे बँकेने करायचे, त्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकारी शिखर बँकेला आलेले अपयश मान्य न करता सरळ सर्वसामान्य लोकांची स्वकष्टाची कमाई अडकवून ठेवायची याला काय म्हणावे? महिनाभरात या बँकेच्या दहा खातेधारकांचा पैसे बुडतील या तणावाखाली मृत्यू झाला तरी सरकार त्यावर उ...

बदलत्‍या वातावरणाने आजारांत वाढ

Image
बदलत्‍या वातावरणाने आजारांत वाढ  ऑक्‍टोबर महिना संपला तरी पाऊस थांबण्‍याचे नाव घेत नाहीय. अवकाळी सुरु असलेल्‍या पावसाने लोकांचे दैनंदिन जिवन अस्‍वस्‍थ करुन टाकले आहे. ग्रामीण भागांत तर शेतीची पार वाताहत झाल्‍याचे पाहायला मिळत आहे. मात्र या सातत्‍याने बरसणा-या हया बेमोसमी पावसाने विविध आजार डोके वर काढू लागले आहेत. रुग्‍णालयांमधील रुग्‍णांची वाढती गर्दीवरुन बदलते वातावरण आरोग्‍याला अपायकारक ठरत असल्‍याचे लक्षात येत आहे. एकीकडे लांबणीवर परतीचा पाऊस आणि त्यातच ऑक्टोबर हीटचे चटके अशा संमिश्र वातावरणाचा फटका लोकांना बसत आहे. संसर्गजन्‍य आजारांनी डोके वर काढले असून सर्दी, खोकला यांसह तापाची लागण झाल्याने मागील महिनाभरात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसते. नवरात्रापाठोपाठ दिवाळीच्या सणापर्यंत आपला मुक्काम कायम ठोकणाऱ्या पावसाने यंदा महाराष्‍ट्राला चांगलेच झोडपून काढले. जुलै महिन्यापासून पावसाचा वाढलेला जोर ऑक्टोबर महिन्यातही कायम होता. ऑगस्ट महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने गणेशोत्सवापासून पुन्हा एकदा हजेरी लावली असून दिवाळीपूर्वी अवघे काही दिवस पावसाचा ...

खातेधारकांचा काय दोष

Image
बँक खातेधारकांच्या कागदपत्रांना डिजिटल सुरक्षा देणारी 'सहमत' योजना केंद्र सरकार राबवणार असल्याचे समजते. एकीकडे बँकेचे व्यवहार सुरक्षित करण्याची सरकारी धोरणे जाहीर करायची व त्यातून पळवाटा काढण्यासाठी पीएमसीसारख्या बँकेला वाट करून द्यायची असाच निष्कर्ष काढला जाऊ शकतो. खातेधारकांची कागदपत्रे सुरक्षित होतील मात्र पैशाचे काय? पीएमसी बँकेच्या खातेधारकांना अचानक स्वतःच्याच खात्यातील पैसे काढण्यास मज्जाव करून त्यांची खाती त्यांचा काहीही दोष नसताना गोठवण्यात आली. बँकेत अनेक वर्षांपासून सुरू असलेला गैरव्यवहार, बोगस कागदपत्रांच्या आधारे उघडण्यात आलेली हजारो बनावट खाती सोयीस्कररित्या दुर्लक्षित केली गेली व अचानक एके दिवशी खातेधारकांचीच गुंतवणूक काढता येणार नाही असे सांगितले गेले. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे झाले. घोटाळे बँकेने करायचे, त्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकारी शिखर बँकेला आलेले अपयश मान्य न करता सरळ सर्वसामान्य लोकांची स्वकष्टाची कमाई अडकवून ठेवायची याला काय म्हणावे? महिनाभरात या बँकेच्या दहा खातेधारकांचा पैसे बुडतील या तणावाखाली मृत्यू झाला तरी सरकार त्यावर...

घणसोली रेल्वे स्थानक वाहतूक कोंडीत

Image
घणसोली रेल्वे स्थानकासमोर पश्चिमेस गेल्या आठवडाभरापासून नवरात्री हॉटेलच्या बाजूच्या रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे ज्याचा विपरीत परिणाम येथील वाहतुकिवर झालेला आहे. अगोदरच हा परिसर रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे व सततच्या वाहतूक कोंडीमुळे खूप चर्चेत असतो. या ठिकाणी अनेकदा बस चालक, पादचारी व रिक्षा चालकांमध्ये वादाचे प्रसंग उदभवले आहेत. आता तर या गोंधळात अधिकच भर पडली आहे. एका बाजूचा रस्ता कामासाठी पूर्ण बंद केल्यानंतर त्या बाजूची वाहतूक विरुद्ध बाजूस वळवण्यासाठी चक्क दुभाजक तोडून येण्याजाण्याचा रस्ता जोडण्यात आला आहे. त्यामुळे स्टेशनसमोरील चौकात अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. स्टेशनसमोरून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, स्टेशनमधून बाहेर पडणारे प्रवाशी, दोन्ही बाजूंकडून येणाजाणारी वाहने यामुळे हा चौक सतत जॅम असतो. दोन ते तीन मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल पंधरा ते वीस मिनिटे लागत आहेत. पादचारी व दुचाकीस्वारदेखील या गर्दीतून मार्ग काढू शकत नाहीत इतकी भीषण अवस्था या चौकाची आहे. दर मिनिटाला इथे वाहनचालकांचे व पादचाऱ्यांचे खटके उडताना दिसत आहेत. गेले आठ ते दहा द...

सत्तेचा गुंता आपसात सोडवावा

Image
सत्तास्थापनेचा अधिकार व कौल महाराष्ट्रातील जनतेने मतदानाद्वारे राजकीय पक्षांना दिलेला आहे. त्यांनीच पुढाकार घेऊन एकमेकांच्या साथीने स्थिर सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. राज्यपालांची भेट घेऊन काही नेतेमंडळी सत्तास्थानेचा गुंता सोडवण्याची मागणी करत आहेत. हे म्हणजे घरातील भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थ किंवा त्रयस्थाचा आधार घेण्यासारखे आहे. सत्तास्थापनेची बाब ही कालमर्यादीत आहे. त्यामुळे विशिष्ट काळात सत्तास्थानेसाठी बहुमताद्वारे जास्त लोकप्रतिनिधी निवडून आलेल्या राजकीय पक्षाने सत्तेवर हक्क सांगून बहुमत सिद्ध करायला हवे. त्यासाठी राज्यपालांसारख्या राज्यातील सर्वोच्च पदास गाऱ्हाणे घालणे कितपत योग्य आहे? विहित मुदतीत कोणताही राजकीय पक्ष बहुमत सिद्ध करू शकला नाही तर अशा परिस्थितीत राज्यपाल हस्तक्षेप करू शकतात. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सत्तास्थापनेचा निर्माण झालेला गुंता राजकीय पक्षांनी लवकरात लवकर आपसांत सोडवून राज्यातील जनतेला नवे व स्थिर सरकार द्यावे ही अपेक्षा. वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

आजीची गाठ अन सुटकेचा निश्वास

Image
मागील महिन्यात ४ सप्टेंबरला माझ्या आजोबांचे वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले आणि सर्व विधी उरकल्यानंतर गावाकडे राहणाऱ्या आजीला आम्ही नवी मुंबईत राहण्यास घेऊन आलो. आजीचे वय आज साधारणतः ८६ वर्षे आहे मात्र तिची प्रकृती मात्र कमालीची ठणठणीत आहे. पूर्वी शेतीसारखी कष्टाची कामे केलेल्या आजी - आजोबांचे वय आणि इतक्या वयानंतरदेखील त्यांची ठणठणीत प्रकृती व क्रियाशीलता अनेकांना विस्मयीत करणारी ठरली आहे. इतके वय झाल्यानंतरदेखील आजीची दृष्टी व श्रवणशक्ती आजही अतिशय तीक्ष्ण आहे. वृद्धपकाळात किरकोळ आजारपण वगळता कुठलाही मोठा आजार न जडलेल्या आजीला गेल्या काही महिन्यांपासून मात्र एका वेगळ्याच समस्येने जखडले होते. डोक्याच्या मागील बाजूस मानेच्या वरच्या भागावर केसांमध्ये एक चरबीची गाठ उगवली होती जी दिवसेंदिवस मोठमोठी होताना दिसत होती. सुरुवातीला फार जटिल न वाटणारी ही गाठ अलीकडल्या काळात मात्र उठून दिसायला लागली. ही विचित्र अशी गाठ दाबल्यानंतरदेखील दुखत नसली तरी झोपणे, केस विंचरणे, स्नान करण्यासारख्या दैनंदिन दिनक्रमात मात्र अडथळा ठरू लागली होती. तसेच गाठीच्या ठिकाणी सतत खाज येत असल्याचीदेखील तक्रार आ...

सर्वसामान्य खातेधारकांचा काय दोष?

Image
पीएमसी बँकेवर निर्बंध घालून महिना लोटला तरी खातेदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होत नाही. खातेधारक अजूनही आपल्या पैशाच्या अपेक्षेत वाऱ्यावर व अधांतरीच आहेत. त्याबद्दल अधिकृतरित्या साधे दिलासा देणारे वक्तव्य करण्यासही यंत्रणा तयार नाहीत. आश्चर्याची बाब हीच आहे की आपली स्वकमाई बुडण्याच्या चिंतेत नऊ खातेदारांचा मृत्यू होवुनदेखील राजकीय पक्ष किंवा प्रसारमाध्यमे हा मुद्दा प्रभावीपणे उचलून धरत नाहीत. आजही कुणाकडे हॉस्पिटलच्या उपचारासाठी पैसे नाहीत, कुणाकडे घरभाडे, शाळेची फी, घराचे हप्ते तर अनेकांकडे रोजचे दैनंदिन जीवन जगण्यासाठीही जमापुंजी नाही, जे काही होते ते सर्व ह्या बँकेतच. जवळपास सतरा लाख खातेधारकांची कष्टाची कमाई या बँकेत अडकून पडल्याने ते हवालदिल झाले आहेत. बँक शाखांवर व आरबीआयवर मोर्चे, आझाद मैदानात आंदोलने, मुख्यमंत्री निवासस्थानावर धडक असे पर्याय वापरुनदेखील त्याची कुणीही दखल घ्यायला तयार नाही. रातोरात एखादी बँक बंद करून खातेधारकांना त्यांचे पैसे काढण्यास नकार देऊन घरी पाठवणे म्हणजे बँकिंग क्षेत्रही हुकूमशाहीकडे झुकत चालल्याचे चित्र आहे. बँकेतील अधिकारी व एखाद्या खाजगी ...