प्रसारमाध्यमे गप्प का?
आजकाल कुठलीही गोष्ट केवळ प्रसिद्धी आणि राजकीय स्वार्थापोटी केली जाते. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजली जाणारी देशातील प्रसारमाध्यमेही ह्या खेळात सामील होत आहेत हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. मणिपूर मध्ये महिलांवर झालेले अतोनात अत्याचार व घडलेला हिंसाचार दोन महिने दडपला जातो व जेव्हा एका घटनेचा व्हिडिओ समोर येतो तेव्हा अनेकांची सहानुभूती अचानक जागी होते हे सारे अनाकलनीय आहे. कॅमेऱ्यासमोर आलेल्या त्या एका घटनेवरून तेथील अराजकतेची कल्पना करता येईल. अशा कित्येक घटना कॅमेऱ्याआड दडपल्या गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीड आणणाऱ्या ह्या घटनेबाबत सतत लाईव्ह राहणारी राष्ट्रीय, स्थानिक प्रसारमाध्यमे मूग गिळून गप्प का बसली हाही एक यक्षप्रश्नच आहे. महिलांप्रती दाखवल्या जाणाऱ्या सहानुभूतीचादेखील केवळ राजकीय व प्रसिद्धीसाठी वापर केला जात असेल अशा प्रवृत्तींच्या भावनादेखील मृत झाल्यात असेच म्हणावे लागेल. वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई