श्री क्षेत्र जेजुरी, कडेपठार, मोरगाव
श्रद्धा, भक्ती आणि पर्यटनाचा अद्भुत मिलाप महाराष्ट्रातील लाखो श्रद्धावानांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबादेवाच्या जेजुरीस मी दरवर्षी नित्यनेमाने भेट देत असतो. यंदाही शनिवार २९ मार्च रोजी सहकुटुंब श्री खंडेरायाचे दर्शन घेतले. जेजुरीच्या खंडेरायाची महती आज सर्वदूर पसरलेली आहे. जेजुरी हे वीरांचे दैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. आमच्या कुटुंबाचेदेखील कुलदैवत खंडोबा असल्याने दरवर्षी श्री क्षेत्र जेजुरी येथे दर्शनासाठी जातो. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ठाण्यावरून मुंबई - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस पकडून सहकुटुंब जेजुरीला दुपारी दोनच्या सुमारास पोहोचलो. जेजुरी स्थानक आता पूर्वीपेक्षा अत्यंत सुंदर व जेजुरगडाची छबी असलेले बनवण्यात आले आहे. पूर्वी येथून येण्याजाण्यासाठी एकच फलाट होता. त्यामुळे एकावेळी दोन ट्रेन आल्यास दुसऱ्या बाजूच्या गाडीतील प्रवाशांना सरळ रेल्वेपटरीवरच उतरावे लागायचे. मी व इतर अनेक प्रवाशांनी दर वेळेस अनेकदा या ठिकाणी आल्यानंतर जेजुरीच्या रेल्वे स्टेशन मास्तरकडे याबाबत तक्रार केलेली होती. मात्र आता दोन्ही बाजूला फलाट, त्या...