आरोग्य सेवेतील संवेदनशील, अभ्यासू वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश भागवत सेवानिवृत्त
आरोग्य सेवेतील संवेदनशील, अभ्यासू वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश भागवत सेवानिवृत्त ३१ मे २०२५ रोजी अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यातीलच एक म्हणजे आमचे परमस्नेही, मार्गदर्शक, खंदे पाठीराखे डॉ अविनाश भागवत. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ भागवत यांच्यासोबत निर्माण झालेले ऋणानुबंध उत्तरोत्तर वाढतच गेले. एक अत्यंत संवेदनशील, अभ्यासू, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून डॉ भागवत सर्वांना परिचित आहेत. त्यांची सेवानिवृत्ती आरोग्य व्यवस्थेत निश्चितच एक पोकळी निर्माण करणारी आहे. त्यांचा नेहमीच हसतमुख व कुणाला कधीही न दुखावण्याचा स्वभाव, सकारात्मक दृष्टिकोन, दांडगा लोकसंपर्क, माणसे जोडण्याची कला एकमेवाद्वितीय आहे. त्याचा विभागाला चांगला उपयोग झाला. ७ मे १९६७ रोजी जन्मलेल्या डॉ भागवत यांचे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भेटा हे मूळ जन्म गाव. १ मे २००१ मध्ये शासकीय आरोग्य सेवेत रुजू झालेल्या डॉ भागवत यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा येथे केली. त्यानंतर पालघर व ठाणे जिल्ह्यातील वाशाळा, दाभाड, आनगाव, वज्रेश्वरी, दहागा...