प्रवाशी भार हलका करावा
आज रेल्वेप्रवासातील मुख्य समस्या आहे ती म्हणजे गर्दी. लोकलसेवा क्षमतेपेक्षा अधिक मर्यादा ओलांडून धावत आहे तर मेल एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण मिळण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागते. हा प्रवाशी भार हलका करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद होणे गरजेचे आहे. नवे रेल्वेमार्ग टाकणे, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणे, गाड्यांची व डब्यांची संख्या वाढवणे, रेल्वेतील सुरक्षा व सुविधा वाढवणे याबरोबरच काही मार्गांवर डबल डेकर रेल्वेसेवा सुरू करण्याबाबतदेखील विचार व्हायला हवा. मुंबईला उपनगरांशी जोडणाऱ्या लोकलसेवेची आजची जीवघेणी अवस्था पाहता रेल्वे प्रशासनाने त्याची कारणमीमांसा तपासावी. यासाठी राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांशी चर्चा करून मध्य व दक्षिण मुंबईतील काही शासकीय कार्यालये व खाजगी आस्थापना उनगरांमध्ये स्थलांतरित करण्याबाबत अधिकृत सल्ला द्यावा जेणेकरून गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई