ड्रग्सच्या विळख्यातून मुलांना बाहेर काढण्याची जबाबदारी पालकांची
पुणे, नाशिक, मुंबई, पालघर भागांत गेल्या काही दिवसांपासून ड्रग्सचे मोठे साठे आढळून आले आहेत. यावरून या पुढारलेल्या शहरांत तरुणाई किती अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहे हे कळून येईल. नाशिकमध्ये सलग दोन दिवसात तब्बल 600 कोटीहून जास्त किमतीचा एमडी ड्रग्सचा साठा पोलिसांनी जप्त केलाय. मुंबई पोलिसांनी 6 ऑक्टोबरला नाशिकच्या शिंदे गावात एका कारखान्यावर केलेल्या कारवाईत ड्रग्सजा मोठा साठा मिळाला. तर पुण्यातही ससून रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सव्वा दोन कोटी रुपयांचं ड्रग्स पुणे पोलिसांनी जप्त केलं होतं. त्यामुळे राज्यातील इतर भागांतही अनेक ड्रग्ज माफिया तरुण पिढीला नासवत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. खरेतर या माफियांचे लागेबांधे खूप दूरपर्यंत असतात. त्यामुळे या शहरांमध्ये पोलिसांनी बेधडकपणे केलेल्या कारवाईचे कौतुकच करावे लागेल. मात्र त्यात सातत्य असायला हवे. पालकांनीदेखील आपल्या मुलांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आजकालचे पालक मुलांना सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अग्रेसर असतात. यात त्यांना प्रतिष्ठा व आनंद मिळत असतो. मात्र आपली मुले कुण...