बाबा - संस्काररुपी आधारवड

प्रथम पुण्यसमरण - ०४.०९.२०२० 
विठ्ठल हेच दैवत, मानवता हीच जात,
संस्कार आमच्या बाबांचे, कायम राहणार कुटुंबात




                                        ।। राम कृष्ण हरी ।।

बुधवार दिनांक ४ सप्टेंबर २०१९ रोजी माझे आजोबा श्री गणपत टोलू पाटील (बाबा) यांना वयाच्या ९६ व्या वर्षी देवाज्ञा झाली आणि आमच्या घरातील कौटुंबिक संस्काराचा आधारवड हरपला. स्वातंत्र्यपूर्व काळात १९२३ साली जन्मलेल्या बाबांनी अथक परिश्रमातून कुटुंब सांभाळले व वाढवले. जेमतेम बेताची परिस्थिती असलेल्या आमच्या कुटुंबाला बाबांनी शेती व किराणा दुकानाच्या व्यवसायातून प्रापंचिक आधार दिला. त्याचबरोबर मुला नातवंडांवर कडक शिस्तीचे व संस्कारांचे धडेदेखील गिरवले. अनेकदा कठीण घडीला बाबांनी कुटुंबाला खंबीरपणे मानसिक व शाब्दिक आधाराने सावरले. अखेरच्या क्षणापर्यंत बाबांचा शब्द आमच्या कुटुंबात प्रमाण मानला गेला. संस्कारांबरोबर त्यांनी आपले कौटुंबिक स्वास्थ्य व कुटुंबकबिला कधीही हरवू दिला नाही. वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरदेखील त्यांच्या आवाजातील व नजरेतील कडकपणा व तीक्ष्णता अजिबात कमी झाली नाही. शेवटच्या घडीपर्यंत त्यांनी सकाळच्या दोन तीन तासांची पांडुरंगाची पूजाअर्चा सोडली नाही. आजारपणातदेखील त्यांनी आपला दिनक्रम कधी बदलला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत मृत्यूला सामोरे जाण्यासाठी ते कदापि डगमगले नाहीत. त्यामुळेच ९५व्या वर्षापर्यंत मृत्यू त्यांना गाठू शकला नाही. अनेकांची संपूर्ण आयुष्य डोळ्यांनी पाहणाऱ्या बाबांना स्वतःच्या मृत्यूनंतर कुणीही रडू नये असेच वाटायचे. शरीराने व मनाने अतिशय कणखर असलेल्या बाबांना अखेर मृत्यूने कवटाळलेच. एका छोट्याशा जखमेचे निमित्त झाले व त्यांना रुग्णालयात दाखल केले. तब्बल आठ दिवस औषधोपचार झाल्यानंतर जखम व शरीर साथ देईनसे झाल्यावर त्यांचाही नाईलाज झाला व त्यानंतर मात्र ते वैकुंठगमनास राजी झाले. 

आपल्यापासून देता येण्यासारख्या शक्य तितक्या सर्व इहलोकी सुखापासून त्यांनी कुटुंबातील कुणालाही वंचित ठेवले नाही. स्वतःकडील आंनद इतरांना देण्यातच त्यांनी नेहमी धन्यता मानली त्यामुळेच जाताना ते दुसऱ्यांना समाधान व तृप्तीची शिदोरी देऊन गेले. अखेरपर्यंत पत्नी सरस्वती, चार मुली, दोन मुले व असंख्य नातवंडे- पतवंडे यांचा सहवास लाभलेले आमचे बाबा इतरांना हेवा वाटावा असेच जीवन जगले. मुला नातवंडांवर कठोर भाषेत संस्कार घडवणारे बाबा, आम्हा नातवंडांच्या लहानसहान मागण्या पूर्ण करताना हळवे होतानादेखील आम्ही अनेकदा पाहिले. लहानपणी शालेय जीवनात बाबांचे सर्वाधिक सानिध्य मला मिळाले हे माझे परमभाग्य. किराणा दुकानाच्या व्यवसायातदेखील काही काळ मी त्यांच्यासोबत घालवला, त्यात त्यांची प्रचंड मेहनत, व्यावहारिकपणा व जिद्ददेखील पाहिली. शालेय आयुष्यात त्यांनी दिलेले धडे व संस्कार मी कदापि विसरू शकणार नाही. एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वतः भिवंडीला जाऊन माझ्यासाठी आणलेली सायकल अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. त्याच सायकलवरून मी माझे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. 




संपत्ती कमावण्यासोबतच धर्म व संस्कारांचे महत्व त्यांनी आपण जगलेल्या आयुष्यातुन अधोरेखित केले. वारकरी संप्रदाय स्वीकारलेल्या बाबांना वर्तमानात जगणे नेहमीच आवडायचे. देव, धर्म व कुटुंब यांचे मोल त्यांनी आम्हा सर्वांना शिकवलेच पण त्याचबरोबर कर्तव्यपूर्तीसाठी आवश्यक असणारे करिअर घडवण्यासाठी ते आमच्याशी नेहमीच आग्रही राहिले. त्यामुळे जेव्हा कधी गावी गेल्यानंतर त्यांना भेटत असे तेव्हा ते हाल हवाल, तब्येतीची विचारपूस न करता थेट आम्ही करत असलेल्या कामधंद्याबद्दलच बोलायचे. किती दिवसाची सुट्टी काढून आलास, कधी कामावर परतायचे आहे, पगार किती, कुठली गाडी घेऊन आलायस अशा त्यांच्या प्रश्नांनी येताक्षणीच जाण्याची चर्चा सुरू व्हायची. त्यात त्यांचा आपलेपणा होता, आपण घडवलेली मूर्ती किती चोख आहे याची पडताळणी असायची. प्रापंचिक आयुष्यात आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहत असल्याचे पाहून त्यांचा ऊर अभिमानाने भरून येताना आम्ही पाहिलाय. त्यांनीदेखील आयुष्यातील स्वप्न ठरलेल्या काशी- बद्रीनाथ यात्रा, विमानभ्रमंती, मुलानातवंडांची नोकरी धंद्यातील प्रगती त्यांच्या उतारवयात याची डोळा पाहिली. यात माझ्या काकांचे राहिलेले मोठे योगदान नाकारता येणार नाही. बाबांच्या आशीर्वादानेच आपले मोठे व्यवसायिक बनण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे मानणारे काका, बाबांना काही कमी पडू नये व त्यांच्या इच्छापूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील राहिले. बाबांनी अलिकडल्या काळात तर आम्ही नातवंडे घरी गेल्यावर 'बबलू' म्हणजे आमची मुले (त्यांची पतवंडे) कुठे आहेत हाच त्यांचा पहिला प्रश्न असायचा. यातून त्यांचे हळवे मन व नातवंडांवरून त्यांची माया पतवंडांवर परावर्तित होत असल्याचे दिसून येत होते. दोन वर्षांपूर्वीच आम्ही त्यांचा ९३वा वाढदिवस देवघर गावामधील राहत्या घरी कुटुंब व नातेवाईकांसोबत मोठ्या जल्लोषात साजरा केला होता. तर यावर्षीदेखील त्यांचा ९५वा वाढदिवस कुटुंबासह साजरा केला. बाबांनी वयाची किमान शंभरी गाठावी अशी आमची सर्वांचीच मनापासून इच्छा होती मात्र वाढते वयोमान व अल्पशी जखम बाबांना त्रासातून मुक्त करू शकली नाही. आज बाबांच्या आठवणीत आम्ही जगण्याचे मान्य केलेय, त्यांची उपस्थिती आमच्यात नसली तरी त्यांचे संस्कार व सावली नेहमीच आमच्या मागे उभी आहे ही जाणीवच त्यांचे अस्तित्व आमच्यासाठी अधोरेखित करणारी आहे. बाबांचे सानिध्य लाभलेल्या सर्वांनाच त्यांनी दिलेले प्रेम, संस्कार व शिस्तीचे धडे कायमच लक्षात राहतील यात शँका नाही. आमच्या जीवनातील सुख, समाधान, धन संपत्ती व चांगल्या प्रपंचीक आयुष्यासाठी बाबा हेच आमचे "सुखकर्ता" आहेत एव्हढे नक्की.  
विठ्ठल हेच दैवत,
मानवता हीच जात,
संस्कार आमच्या बाबांचे,
कायम राहणार कुटुंबात


वैभव मोहन पाटील

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त