संकटात संधी शोधा
लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील बहुतांश उदयोग धंदे, व्यवसाय सर्वच बंद आहे. यासाठी महाराष्ट्रात आलेले अनेक छोटे मोठे उदयोजक, कामगार, मजुर आपापल्या राज्यात परतलेले आहेत. असे असले तरी मुख्यमंत्री व उदयोगमंत्री राज्यात नवे उदयोग व्यवसाय आणण्यास उत्सुक आहेत. नव्या उदयोगांना लागणा-या सर्व प्रकारच्या सोयी सवलती देण्यास राज्य सरकार सकारात्मक आहे. खरेतर राज्यातील तरुणांसाठी ही एक प्रकारची संधीच आहे. आपल्याकडील उदयोग हे एकतर परप्रांतीयांच्या हातात आहेत किंवा परप्रांतीयांच्यामुळेच चालतात असा एक समज आहे आणि तो ब-याच अंशी सत्यदेखील आहे. स्थानिकांना भांडवल व मनोबलाअभावी उदयोग व्यवसायांमध्ये पाय रोवता येत नाही हे वास्तव आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर भुमिपुत्रांना आता उदयोग व्यवसाय सुरु करण्यास संधी चालून आली आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. आज मुंबईतील छोटे मोठे उदयोग व्यवसाय करणारे अनेक परप्रांतिय काम नसल्याने आपापल्या प्रांतात परतले आहेत. आता स्थानिकांसाठी चालून आलेली ही संधी दवडली जाऊ नये. उदया पुन्हा सर्व व्यवहार सुरु झाल्यानंतर परप्रांतियांचे लोंढेच्या लोंढे पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे धाव घेणार आहेत. त्याच कालावधीत येथील व्यवसाय स्थानिकांनी ताब्यात घ्यायला हवेत. अनेक नवउदयोजक तरुणमंडळी व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. त्यांनी सरकारच्या धोरणांचा लाभ घेत आपले पाय हळूहळू या क्षेत्रात रोवायला हरकत नाही. यासाठी लागणारे मनुष्यबळ आता राज्यातच उभे करावे लागणार आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करायला सरकारदेखील तयार आहे. त्यामुळे तरुणांनी या संधीचे साने करायला हवे. आजवर परप्रांतीय लोकांनी इथे मिळेल त्या व्यवसायात आहे त्या परिस्थितीत आपले बस्तान बसवले व स्थानिक लोक मात्र यापासुन दूर गेले. त्याचाच परिणाम आज मुंबईसह राज्यातील सर्वच प्रमुख शहरांतील व्यवसाय इतर राज्यातील लोकांच्या ताब्यात आहेत. अगदी रिक्शा टॅक्सी व्यवसायापासुन हॉटेल व्यवसायापर्यंत बहुतांशी धंदे याच लोकांचे दिसुन येतात. स्थानिक भुमिपुत्र मात्र जगण्यासाठी निवारा व दोन वेळची रोजीरोटी शोधत राहीला. मात्र आता ही परिस्थीती बदलायला हवी. तशी संधी सरकार व कोरोनाने उपलब्ध करुन दिली आहे. राज्यात येत्या काळात अनेक मोठमोठे उदयोग येऊ घातलेले आहेत. या उदयोगांसाठी लागणारे कुशल, अकुशल, तांत्रिक मनुष्यबळ राज्यात उपलब्ध आहे. त्यांनी परप्रांतात गेलेल्या लोंकाना पुन्हा महाराष्ट्रात परतण्यासाठी निश्चीत असे धोरण आखणे गरजेचे आहे. ''आओ जाओ घर तुम्हारा'' ही दिलदार वृत्ती कुठेतरी सिमित करायला हवी. इतर प्रांतातील सरकारे जशी आपापले व्यवसाय, उदयोग धरुन आहेत. तशाच प्रकारे राज्यात स्थानिकांना बळ दयावेच लागेल. महाराष्ट्राचे वेगळेपण, संस्कृती व उंची टिकवण्यासाठी भुमिपुत्र खंबीर व्हायलाच हवा.

Comments
Post a Comment