सामान्यातले असामान्य व्यक्तिमत्व - शरद यशवंत पाटील । वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल आपण बऱ्यापैकी अपडेट असतो. मात्र आपण ज्या गोष्टी विविध माध्यमांतून पाहतो, वाचतो, ऐकतो त्यावर प्रतिक्रिया वा प्रतिसाद देण्याच्या भानगडीत आपण पडत नाही. वेळ नसणे, लोक काय विचार करतील, मीच का, उगाच पुढारीपणा नको, मला काय करायचे, लाजरेपणा ह्यासारख्या गोष्टी त्याला खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरतात. कुणाचा वाढदिवस किंवा सणासुदीला शुभेच्छांचा वर्षाव करणारे ग्रुप एखादी अनधिकृत, अनुचित, चुकीची वा बेकायदेशीर बाब कुणी पुढे आणली तर सामसूम असतात ही वस्तुस्थिती आहे. खरे तर अशा संवेदनशील संदेशांवर सोशल मीडियाने तुटून पडण्याची गरज असते. सोशल मीडिया काय करू शकते हे आपल्याला दंगली, अफवा, बेजबाबदार वक्तव्ये करणाऱ्यांची काय गत होते या अलिकडच्याच काही उदाहरणांवरून लक्षात येईल. सोशल मिडियाप्रमाणेच दररोज वर्तमानपत्रांतून लिखाण करून आपल्या परिसरातील वास्तव सर्वांसमोर ठेवण्याचे काम पत्रकार मंडळी अगदी पोटतिडकीने करत असतात. बातमीमागचे सत्य दाखवण्याचे काम अनेक पत्रकार अग्रलेखांच्या माध्यमातून करतात. असे लेख रोज वर्तमानपत्र घेऊन आपणास वाचणे शक्य होत नसले तरी व्हाट्सएप, फेसबुक, ट्वीटर यासारख्या आधुनिक ऍप्लिकेशनमधून आपल्यासमोर बऱ्याच गोष्टी येत असतात. आजकालचे पत्रकार या सर्व माध्यमांचा वापर अगदी खुबीने करतात असे माझे मत आहे. मात्र इतका आटापिटा कुणासाठी सुरू असतो. अर्थात उदरनिर्वाहाचे साधन म्हणून लिखाण करण्याचा उद्योग वर्षानुवर्षे सुरू असला तरी समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा उदात्त हेतू ठेवून काम करणारे पत्रकारदेखील समाजात आहेत हेदेखील नाकारून चालणार नाही. अशाच एका निर्भीड पत्रकारापैकी एक म्हणजे आमचे वाड्याचे शरद पाटील. 'शरद यशवंत पाटील' हे नाव ऐकलं नसेल असा व्यक्ती पालघर जिल्ह्यात क्वचितच सापडेल. आपल्या स्वतःच्या बुद्धिकौशल्यावर प्रचंड आत्मविश्वास बाळगणारी ही व्यक्ती अत्यंत जिद्दी, निर्भीड, शून्यातून विश्व उभी केलेली आजच्या तरुणांना आदर्शवत अशीच आहे. माझा त्यांच्याशी परिचय अगदी खूप जुना.. वाड्याला ज्युनिअर कॉलेजला असताना त्यांनी दोनेक दशकांपूर्वी सुरू केलेले "मशाल" हे मासिक आवर्जून वाचायचो. एकतर त्यावेळी स्थानिक बातम्या छापणाऱ्या वृत्तपत्रांची कमतरता अन दुसरे म्हणजे तो संपूर्ण पेपर एकट्याने लिहून काढलेल्या पत्रकार शरद पाटील यांची निडर भाषा यामुळे मशाल हे वृत्तपत्र संपूर्ण वाडा तालुका व तत्कालीन ठाणे जिल्ह्यात मोठ्या खपाचे साप्ताहिक म्हणून प्रसिद्ध होते. अनेक राजकारणी, समाजविघातक प्रवृत्ती व औद्योगिक कँपन्यांची दादागिरी शरद पाटील यांनी त्या काळी आपल्या धारदार लेखणीच्या बळावर मोडीत काढली होती. अर्थात याची मोठी किंमतदेखील त्यांना चुकवावी लागली हेदेखील खरेच. अगदी मशाल वृत्तपत्राची होळी, शरद पाटील यांच्याविरुद्ध निषेध रॅल्या आम्ही जवळून पाहिल्या. त्यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्लेदेखील झाले. मात्र तरीही न डगमगता आपल्या लेखणीची धार काही त्यांनी कमी होऊ दिली नाही. पत्रकारिता करत असतानाच त्यांनी प्रिंटिंग प्रेस, पब्लिकेशन हाऊस, नामांकित कवी, लेखक, सामाजिक संघटनांचे व फ्रेंडशिप ग्रुप्सचे संस्थापक यासह अलीकडेच वाड्यातील नामांकित बिल्डर म्हणूनदेखील मोठा नावलौकिक मिळवला. आज वाड्यातील अनेक कार्यक्रमांची, दुकानांची, स्पर्धांची उदघाटने त्यांच्या हस्ते संपन्न होतात यातच त्यांची लोकप्रियतेचे गमक आहे. मात्र हे यश व मानसन्मान त्यांनी मोठ्या कष्टातून व जिद्दीतून मिळवला आहे हेदेखील तितकेच खरे. गेली अनेक वर्षे त्यांच्या प्रत्यक्षात संपर्कात नसल्याने मधल्या काळातील त्यांच्या बाबतीतील घडामोडी ज्ञात नाहीत. मात्र अनेक वर्षे अविरत सुरू असलेले मशाल वृत्तपत्र व सोशल माध्यमातून त्यांच्या लिखाणाचे व वक्तृत्वाचे आम्ही फार मोठे चाहते आहोत हेदेखील मला विनाअट मान्य आहे. अलीकडेच त्यांनी मशाल न्युज नेटवर्क हे दूरचित्रवाणी माध्यम सुरू केले आहे त्याची लोकप्रियता व विश्वासार्हता आज शिखरावर आहे. हे न्युज चॅनेल युट्युब वर माझ्यासह लाखो दर्शक नियमित पाहतात. सध्या सुरू असलेल्या कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील व जिल्ह्यातील ताज्या घटना आज याच माध्यमातून समजतात. कोणत्याही घटनेवर ज्या सडेतोडपणे ते वृत्तपत्रातून लिहतात त्याच निडरपणे ते आपली भूमिका या चॅनेलच्या माध्यमातून मांडताना रोज दिसतात. त्याचप्रमाणे अनेक जाहीर कार्यक्रमांच्या व्यासपीठावरूनदेखील स्थानिक घडामोडींवर आपली भूमिका ते सडेतोड मांडताना दिसतात. त्यामुळेच गावागावातील लोक व विशेष करून तरुणाई त्यांची फॅन झालेली आहे. आपल्या लिखाणाने लोकांना 'अस्वस्थ' करणारे शरद पाटील यांच्यासारखे पत्रकार फार अपवादानेच आढळतात. त्यामुळेच त्यांनी आपले वेगळेपण जिल्ह्यात इतकी वर्षे कायमच जपले आहे. पालघर या आदिवासी जिल्ह्यात ठक्कर बाप्पा या आदिवासी गरीब लोकांसाठी असलेल्या शासकीय योजनेत शेकडो कोटींचा झालेला भ्रष्टाचार त्यांनी गतवर्षी चव्हाट्यावर आणला. त्यात अनेक अधिकारी, अभियंते निलंबित देखील झाले. आयआयटी मार्फत झालेल्या चौकशीत तर या योजनेतील भ्रष्ट्राचाराचे पूर्ण पितळच उघडे पडले. आयआयटीचा अहवाल त्यांच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब करणारा, नव्हे त्याहून अधिकच विदारक चित्र दर्शवणारा ठरला. यामुळे आदिवासी बांधवांसाठी शासनाने दिलेल्या निधीत कशा प्रकारे अपहार केला जातो हे जिल्ह्यातील लोकांसमोर व महाराष्ट्रासमोर आलेे. शरद पाटील यांनी दाखवलेल्या विदारक परिस्थितीतून पुढे काय घडते हे येणारा काळच ठरवेल मात्र इतका सारा प्रताप समोर आणूनही इतर कुणी त्याची वाच्यता करायला तयार नाही ही खंत त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवते. एक पत्रकार लोकांसमोर सद्यस्थिति ठेवण्याचे काम करतो. त्याला उचलून धरण्याचे व त्यावर प्रतिक्रिया उमटवण्याचे काम हे इतरांनी करायचे असते मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. असो, शरद पाटील यांच्याशी माझा परिचय तसा फार जुना. माझी लिखाणाची सवय त्यांच्यामुळेच हळूहळू वाढत गेली. वाड्यात 1997 च्या दरम्यान महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सा मशाल व मशालच्या दिवाळी अंकातून त्यांनी वेळोवेळी माझ्या साहित्याला प्रसिद्धी दिली. लेख, कविता कशीही असो, केवळ त्या लेखकाला प्रोत्साहन व हुरूप मिळावा यासाठी त्याच्या लिखाणाला प्रसिद्धी देण्याची त्यांची लकब एकमेवाद्वितीयच आहे. नुसते प्रोत्साहनच नाही तर दरवर्षी त्यांच्या व सा मशालच्या एकत्रित वाढदिवशी 8मे ला समाजातील अनेक रत्नांचा मशाल पुरस्काराने जाहीर सन्मान करण्याचा शिरस्तादेखील त्यांनी अविरत सुरू ठेवला आहे. त्यांच्यासारख्या अनेकांचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळाल्यानेच लिखाणाचा माझा प्रवास गेली अनेक वर्षे अविरत सुरू आहे. आजही कितीही कामाचा व्याप असेल तरी वेळ काढून वाचन व लेखन दररोज करतोच. दरवर्षी त्यांच्या व सा मशालच्या एकत्रित वाढदिवसाचे निमंत्रण ते आवर्जून देत असतात. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांनी ८मे चे आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पाटील यांची काम करण्याची पद्धत, मित्रमंडळी व गरजूंना मदत करण्याची रीत, त्यांचा पत्रकार ते यशस्वी बिल्डर व्यवसायापर्यंतचा प्रवास, सुखासमाधानात सामाजिक जीवन जगत असतानाही पत्रकारितेतून अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारी मानसिकता हे सर्वच थक्क करणारे आहे. इतका सारा व्याप संभाळूनही हा माणूस आपली दिनचर्या व वक्तशीरपणा कधीच मोडत नाही. मित्रमंडळींच्या कायम गोतावळ्यात राहणाऱ्या शरदभाऊंना आपल्याला मिळालेल्या प्रसिद्धीचा व यशाचा अजिबात गर्व नाही हेदेखील विशेषच. सडेतोड लिखाणाने अनेक विरोधक निर्माण झाले असतानाही कोणतीही भीती न बाळगता अगदी सामान्य सामाजिक व प्रापंचिक जीवन व्यतीत करणाऱ्या त्यांच्या स्वभावाविषयी बोलण्यासाठी खरंच शब्द नाहीत. शरद पाटील हे आक्रमक शैलीबरोबरच व्यासंगी लेखक व प्रासंगिक कवी म्हणूनदेखील ओळखले जातात. त्यांची सडेतोड लिखाणाची अनेक पुस्तके आजवर प्रकाशित झालेली आहेत. अनेक कवी संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली आहेत. मागील वर्षी त्यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला गेलो असताना त्यांनी पुण्यात प्रकाशित केलेला राजकीय टिक्काटिप्पणीवर आधारित प्रासंगिक कवितांचा "मर्मभेद" हा काव्यसंग्रह त्या दिवशी मला भेट म्हणून दिला त्याचा हा वरील फोटो. आज हा लेख व फोटो आपल्यासमोर आणण्याचे कारण म्हणजे त्यांचा वाढदिवस. त्यांच्याकडे सांगण्यासारख्या व त्यातून बोध घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. मला भावलेल्या व अनेकांना घडवलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्वाची तोंडओळख आपणा सर्वांना व्हावी एव्हढ्यासाठीच हा खटाटोप. शरद भाऊंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. पत्रकारितेच्या माध्यमातून घेतलेला हा समाजसेवेचा वसा त्यांनी अविरतपणे असाच पुढे सुरू ठेवावा हीच यानिमित्ताने सदिच्छा.
वैभव मोहन पाटील

Comments
Post a Comment