कोरोनाग्रस्तांना मानसिक बळ आवश्यक
कोरोनाची दाहकता ही बऱ्याच अंशी मानसिक स्थिती कमकुवत असल्याने वाढते. संसर्ग हा निव्वळ निमित्तमात्र. शारीरिक संसर्गातून तुम्ही बरे व्हाल मात्र मानसिक संसर्ग फार धोकादायक आहे. त्यातच समाजाची मानसिकतादेखील ढासळत चालली आहे असेच म्हणावे लागेल. गाव खेड्यांमध्ये आणि शहरातदेखील अनेक भागांतील लोक ह्या रुग्णांना वाळीत टाकल्यासारखे करतात ज्यामुळे माणुसकी व ऋणानुबंध दुरावत चालले आहेत. कोरोना हा काही असाध्य आजार किंवा अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारा तर मुळीच नाही. येत्या काळात प्रत्येक घरापर्यंत हा संसर्ग पसरण्याची भीती आहेच. कारण आयुष्यभर घरी बसून आपल्याला कोरोनावर मात करता येईल मात्र पोटापाण्याचे काय? त्यामुळे आज ना उद्या आपल्याला पोटासाठी कोरोनाचा धोका पत्करून घराबाहेर पडावेच लागेल. तेव्हादेखील हा धोका कमी झालेला नसेल आणि आपल्याला संसर्ग होणारच नाही या भ्रमात तर अजिबात राहू नका. आज पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले सर्व आपल्यातलेच आहेत आणि यातून बरे झालेलेही. त्यांना इतर कुठला आधार देता येत नसला तरी मानसिक आधार नक्की द्या. कदाचित तुमच्या त्या शाब्दिक आजारानेच ते लवकर बरे होतील. त्यामुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी अजिबात घाबरण्याची गरज नाही. चार आठ दिवसांत तुम्ही त्यातून बाहेर पडणारच आहात. फक्त शरीराला लागलेला कोरोना मनाला मात्र लागू देऊ नका म्हणजे झालं!

Comments
Post a Comment