भारत आणि आंतराष्ट्रीय अर्थव्यवस्था
ऍपेल ह्या अमेरिकन कंपनीचे बाजारपेठीय मूल्य दोन लाख कोटी अमेरिकन डॉलर्स असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरेतर आंतराष्ट्रीय बाजारपेठेचे हे वास्तव भारतासह अनेक देशांच्या आर्थिक स्थितीची दयनियता समोर आणणारे आहे. सध्या भारताच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेला सोयीस्कररित्या कोरोनाला जबाबदार धरले जाते. मात्र कोरोनाच्या अगोदर तरी अर्थव्यवस्था कोणत्या उंचीवर होती याबाबत कुणी बोलायला तयार नाही. ऍपेल या एकट्या कँपनीचे मूल्य जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक आहे आणि कदाचित काही दिवसांनी भारतापेक्षाही मोठे असेल. भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना तसेच त्याला खीळ बसवण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्नशील असताना कोरोनाचे संकट भारतीय अर्थव्यवस्थेला भारी पडल्याचे चित्र आहे. मागणीच आटल्याने उद्योगक्षेत्राने पुरवठ्यासाठी कितीही आटापिटा केला तरी तो फेल असणार आहे. एकतर सर्वसामान्यांच्या हातात आज लॉकडावूनमुळे पैसा नाही. बेरोजगारी उग्र रूप धारण करत आहे. त्यामुळे भविष्याच्या चिंतेने लोक खर्चासाठी हात आखडता घेत आहेत. त्याचा गंभीर परिणाम बजारपेठांवर होत असून नाईलाजाने व्यावसायिक महागाई वाढवण्याच्या तयारीत आहेत. देशातील माध्यमे व राजकारण सुशांत राजपूत आत्महत्येसारख्या प्रकरणात अडकून या प्रकरणाला अवाजवी महत्व देताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेवता येणार नाहीत. अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने जाहीर विचार करायला आज कुणीही तयार नाही. एकीकडे ऍपेल कँपनी दोन लाख कोटी अमेरिकन डॉलरचा व्यवसाय करत असताना भारताची वाटचाल मात्र नको त्या विषयांना अवाजवी महत्व देण्याकडे होत आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी देशात अधिक क्षमतेचे उद्योगधंदे प्रोत्साहित करावे लागणार आहेत. उद्योगधंद्यांना नवी उभारी देण्यासाठी मागणी व पुरवठ्याचे गणित देशाला जुळवून आणावे लागेल. कोरोनाचे कारण देऊन अधिक काळ रडत न बसता औद्योगिक धोरणातील सुधारणा प्रत्यक्षात राबवून त्याचा लाभ बेरोजगार व पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक आहेत.

Comments
Post a Comment