महात्मा गांधी जयंती निमित्ताने

आज २ ऑक्‍टोबर गांधी जयंती म्‍हणजे महात्‍मा गांधीजींचा जन्‍मदिवस. स्‍वातंत्र्यसंग्रामामध्‍ये अहिंसेच्‍या मार्गाने लढा देऊन यश मिळवणारे महापुरुष म्‍हणजे राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी. महात्‍मा गांधींंच्‍या आयुष्‍याबाबत अनेक गोष्‍टी आज साहित्‍यातुन उपलब्‍ध झालेल्‍या आहेत. बापुजींच्‍या जिवनातील अनेक घडामोंडींचे साक्षीदार बनलेल्‍या वास्‍तु देशामध्‍ये अस्तित्‍वात आहेत ज्‍या त्‍यांच्‍या संघर्षाची आठवण करुन देतात.  त्‍यातीलच एक म्‍हणजे सेवाग्राम आश्रम. मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच बापूंजीच्या जीवनाचा आरसा असलेले महाराष्‍ट्रातील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे वर्धा येथील हा सेवाग्राम आश्रम. गांधीजींनी त्यांच्या वृद्धापकाळातील सर्वाधिक काळ म्हणजेच 12 वर्षे सेवाग्राम आश्रमात घालविला आहे. विदर्भातील वर्धा या शहरापासून 8 किलोमीटरवर असलेल्या सेवाग्राम या गावी 300 एकर जमिनीत हा आश्रम वसला आहे. बापूजींच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या व त्यांच्या विश्वात घेऊन जाणाऱ्या या आश्रमाला मी अनेकदा भेट दिली आहे. या ठिकाणी नियमितपणे दररोज सहाच्या सुमारास खुल्या प्रांगणात प्रार्थना केली जाते. या ठिकाणी बापूजींच्या अनेक आठवणींना उजाळा मिळतो. सेवाग्राम आश्रमात गांधीजीनी अनेक देशवासियांना योग्य दिशा देण्‍याचे महान कार्य केले आहे. आश्रमातील शांत व सुंदर परिसर पाहिल्यानंतर बापुजींच्या स्वाभाव तसेच व्यक्तिमत्त्वाविषयी कल्पना आल्याशिवाय राहत नाही. महात्मा गांधी यांना समजुन घ्यायचे असेल तर सेवाग्राम आश्रमाला एकदा तरी भेट देणे आवश्यक आहे. पारंपरिकता येथे अजून ही जिवंत असून येथील बापूजींचे स्मृती चि‍न्हे पाहून ते आपल्यातच असल्याचा भास होतो. 1933 मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजीांनी देशव्यापी हरिजन यात्रा काढली. यात्रेदरम्यान मध्य भारतातील एक गाव निवडून त्या गावी मुख्यालय करण्याचा निश्चय केला. 1934 मध्ये जमनालाल बजाज तसेच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे वास्तव्य केले. त्यांनतर दोन वर्षांनी अर्थात 1936 मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडीहून सेगाव म्हणजेच सेवाग्राम येथे आले व येथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. सेवाग्राममध्ये अनेक प्रकारच्या झोपड्या आजही आपल्याला पहावयास मिळतात. त्यात स्वत: गांधीजी व त्यांचे सहकारी वास्तव्य करीत होते. आजही या झोपड्या येथे आहेत. त्यात बापुजींची त्या काळातील जीवनशैली दिसून येते. त्याची विस्तृत माहिती त्या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्‍यांकडून मिळते. सेवाग्राम मधील निरनिराळ्या ठिकाणी बापूजींच्या अनेक आठवणी जुळलेल्या असून त्यांच्या जीवनाशी निगडित त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू व साधनसामग्री येथे पाहायला मिळते. 1942 मध्ये 'भारत छोडो आंदोलनाची' पहिली सभा सेवाग्राम आश्रमातच झाली होती तर 1940 मध्ये व्यक्तिगत सत्याग्रहाची प्राथमिक तयारीही याच आश्रमात करण्‍यात आली होती. बापूजींचे जीवनचरित्र उलगडणाऱ्या अनेक पुस्तकांचे व खादीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीदेखील या आश्रमात उपलब्ध आहे. संपूर्ण आश्रम फिरल्यानंतर महात्मा गांधीं या थोर व्यक्तिमत्वाच्या साध्या राहणीमानाची बारीक ओळख आपल्याला झाल्याशीवाय राहत नाही. अशा या थोर विभुतीला साष्‍टांग दंडवत.




वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments