शेतकऱ्याने जगायचे कसे?
- Get link
- X
- Other Apps
मागील आठवडयात झालेल्या परतीच्या अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांत दाणादाण उडवली. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पटटा निर्माण झाल्याने चार पाच दिवस सलग पडत असलेल्या पावसामुळे कोकणातील शेतकरी पार बेजार झालेला असुन हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत भाताचे रोप पूर्णपणे तयार होऊन कापणीला आलेले असते. गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतक-यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे. कापलेले भाताचे पीक एकतर शेतातच ठेवले जाते किंवा माळरानावर झोडपणीसाठी आणले जाते. बहुतांश शेतक-यांची कापणी पूर्ण झालेली असुन मध्येच मुसळधार पाऊस कोसळल्याने कापलेले पीक पूर्णपणे भिजले आहे तर काही वाहून गेले आहे. अशा परिस्थीतीत शेतक-यांना वर्षभर पुरेल इतकेदेखील पीक मिळण्याची शक्यता राहीलेली नाही. अगदी हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे. भातशेती हा येथील शेतक-याचा प्रमुख व्यवसाय आहे. भाताशिवाय इतर दुसरा कोणताही उत्पन्नाचा स्त्रोत येथील शेतक-यांकडे सध्यातरी उपलब्ध नाही. कुटुंबाला वर्षभर पुरेल इतक्या धान्याचा साठा करुन उर्वरित धान्याची शेतकरी विक्री करतात व त्यातुन मिळणा-या पैशांवरच मुलांची शिक्षणे, लग्ने, वर्षभराचा किरकोह खर्च, कुटुंबातील वृध्दांचा औषधोपचार केला जातो. तयार झालेले पिक समोरच उध्वस्थ होताना पाहून शेतकरी आज हतबल आहे. गेले पाच सहा महिने अत्यंत मेहनतीने उत्पन्न घेतलेले पिक चार दिवसांच्या पावसाने शेतक-यांपासुन हिरावून घेतलेले आहे. आता वर्षभर रोजीरोटीचा प्रश्न आहेच पण इतर खर्च भागवणे शेतक-यांसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. कोकणातील शेतकरी तसा फार सोशिक. अगदीच गळयापर्यंत आल्याशिवाय येथील शेतकरी कधी मागण्या, आंदोलने, आमहत्या केल्याचे स्मरत नाही. मात्र सरकारने आता त्यांचा अधिक अंत न पाहता त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची गरज निर्माण झाली आहे. नुकसान झालेल्या शेतीचे त्वरीत पंचनामे करुन झालेल्या नुकसानीचा आर्थिक मोबदला शेतक-यांना दयायलाच हवा. वर्षानुवर्षे शेतीवरच आपल्या कुटुंबाचे तसेच अनेकांचे पोट भरणा-या शेतक-याला असे तडफडत ठेवणे संयुक्तीक नाही. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने उभी भातपिके नष्ट होण्याची वेळ सातत्याने शेतक-यांवर येत आहे. दुबार पेरणी केल्यानंतरदेखील पिके उध्वस्थ होत असतील तर शेती करण्यास उदया कुठलाही शेतकरी धजावणार नाही अशी परिस्थिती सध्या ग्रामीण भागात आहे. तसे झाले तर ग्रामीण जनतेचा पोटापाण्याचा मोठा प्रश्न उदभवणार आहे. त्यात शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षण, नोकरी, रोजगाराचा प्रश्न आहेच. त्यामुळे सातत्याने दुष्काळी परिस्थीतीने बेजार झालेल्या शेतक-यांना वेळेत मदत पोहोचणे गरजेचे आहे. त्यांना शेतीच्या इतर जोडधंदयांसाठी बी बियाणे, खते मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतदेखील विचार व्हायला हवा. सरकारी हस्तक्षेपातुन व मदतीतुन हे सहजसाध्य आहे. दिर्घकालीन व अधिक उत्पादन देणा-या पिकांकडे शेतकरी वळायला हवेत. यासाठी ग्रामीण शेतक-यांना आवश्यक मार्गदर्शन व प्रशिक्षण उपलब्ध करुन देता येईल. एकंदरीत बदलत्या ऋतुमानाचा शेतीवर होत असलेला विपरीत परिणाम पाहता शेती व शेतकरी या दोन्ही घटकांना समृध्द व स्वावंलंबी बनवण्याचे मोठे आव्हान आगामी काळात असणार आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment