बॉलिवूड हलवणे सोपे नाही



मुंबईतील फिल्‍मसिटी उत्‍तर प्रदेशमध्‍ये हलवणे सोपे नाही. आज बॉलीवुड कलाकारांना मुंबईइतके सहज व सुरक्षित वातावरण दुसरे कुठेही मिळणे अशक्‍य आहे. उत्‍तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ हे मुंबई दौ-यावर आल्‍यानंतर फिल्‍मसिटीसंदर्भातील चर्चेला ऊत आलेला होता. मात्र प्रत्‍यक्षात उत्‍तर प्रदेशमध्‍ये फिल्‍म इंडस्‍ट्री स्‍थापन करायला पोषक वातावरण आहे का याचा विचार त्‍यांनी करायला हवा. गुन्‍हेगारी कारवायांमध्‍ये अग्रेसर असलेल्‍या उत्‍तर प्रदेशात बेरोजगारीची समस्‍यादेखील मोठया प्रमाणात आहे. अशा ठिकाणी कलाकार मंडळी स्‍थायिक होण्‍यास तयार होणे शक्‍य नाही. प्रत्‍येक प्रदेशाची आपली एक वेगळी ओळख असते, वैशिंष्‍टय असते. त्‍याचा पर्यटनाच्‍या दृष्‍टीने योग्‍य वापर करता आला पाहिजे. पर्यटन वाढले की उदयोग, व्‍यवसायात वृध्‍दी होते व राज्‍याकडे लोकांचा कल वाढतो. मात्र यासाठी उत्‍तर प्रदेशमध्‍ये जाणीवपूर्वक प्रयत्‍न झाल्‍याचे गेल्‍या काही वर्षांमध्‍ये दिसुन आलेले नाही. उत्‍तर प्रदेशलादेखील मोठी ऐतिहासिक पार्श्‍वभुमी असुन अनेक ऐतिहासिक स्‍थळांचा वारसा लाभलेला आहे. मात्र त्‍याचा प्रभावी वापर करणे राज्‍याला जमलेले नाही. त्‍यामुळे फिल्‍मसिटीसारखा उदयोग राज्‍यामध्‍ये स्‍थापन करण्‍याअगोदर पर्यटन, उदयोग, व्‍यवसाय, रोजगार यांचेसाठी पोषक वातावरण निर्माण करुन देशाच्‍या विविध भागांत पोटापाण्‍यासाठी धाव घेणारे उत्‍तर प्रदेशातील कामगारांचे लोंढे थोपविले गेले पाहिजेत. राज्‍यातील गुन्‍हेगारीचे प्रमाण आटोक्‍यात आणले पाहिजे. शिक्षण, आरोग्‍य यासारख्‍या विषयांवर लक्ष केंद्रित करायला हवे. फिल्‍म सिटी स्‍थापन करणे प्रत्‍येक राज्‍याचा अधिकार आहे मात्र मात्र तो राज्‍याच्‍या दृष्‍टीने प्राधान्‍याचा विषय ठरु शकत नाही. मुंबई-महाराष्‍ट्राची ओळख केवळ फिल्‍मसिटीवर नाही तर इतर अनेक चांगल्‍या गोष्‍टी महाराष्‍ट्राने घडवलेल्‍या आहेत ज्‍यामुळे महाराष्‍ट्र एक प्रगतशिल राज्‍य आहे. त्‍यामुळे केवळ फिल्‍मसिटी स्‍थापन करुन राज्‍याचा विकास होईल हा समज असेल तर तो गैर आहे.  

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई         


Comments