भिवंडी वाडा रस्त्याची दुरवस्था

ठाणे व पालघर जिल्‍हयाला जोडणा-या भिवंडी ते वाडा या महामार्गाची अत्‍यंत दुरावस्‍था झालेली आहे. या रस्‍त्‍यावर दररोज नि‍रनिराळया ठिकाणी अपघात होत आहेत. रस्‍त्‍यांची अक्षरशः चाळण झालेली असुन रस्‍त्‍याच्‍या मधोमध मोठमोठे खडडे पडलेले आहेत. याचा मोठा त्रास वाहनचालकांना होत असुन जीव मुठीत घेऊन या रस्‍त्‍यावर प्रवास करावा लागत आहे. वर्षानुवर्षे रस्‍त्‍याची ही दयनीय अवस्‍था अनेक लहानमोठया अपघातांना आमंत्रण देत आहे. अपघातांमध्‍ये अनेकांचे जीवदेखील गेलेले आहेत. तरीदेखील सुस्‍त प्रशासनाला जाग येत नाही. या रस्‍त्‍याची डागडुजीवर आतापर्यंत कोटयवधी रुपयांचा निधी खर्च झालेला आहे मात्र रस्‍त्‍याची गुणवत्‍ता मात्र जैसे थे आहे. पावसाच्‍या पाण्‍यात खडडयांचा अंदाज येत नसल्‍याने अनेक वाहने भर रस्‍त्‍यात अडकून पडत आहेत. यात वाहनांचेदेखील मोठे नुकसान होत आहे. या रस्‍त्‍याच्‍या दुरुस्‍तीसाठी अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आंदोलने केली आहेत. मात्र तरीदेखील निर्ढावलेल्‍या यंत्रणा त्‍याची दखल घ्‍यायला तयार नाहीत. मुंबईपासुन हाकेच्‍या अंतरावर असलेल्‍या या महामार्गाची दयनीय अवस्‍था अपघातांना व पर्यायाने मृत्‍यूला आमंत्रण देणारी आहे. त्‍यामुळे राज्‍य शासनाच्‍या सार्वजनिक बांधकाम खात्‍याने त्‍वरीत यामध्‍ये लक्ष घालून एकतर हा रस्‍ता नव्‍याने तरी बांधावा अथवा किमान १० वर्ष टिकेल अशा पध्‍दतीने दुरुस्‍त करावा जेणेकरुन या निकृष्‍ठ रस्‍त्‍यामुळे नाहक जाणारे निष्‍पाप जिव रोखता येतील. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments