तरुणाई कुणाच्या मागे पळतेय?

मागील शनिवारी रात्री एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका क्रूझमधील रेव्ह पार्टीवर छापेमारी केली. हे प्रकरण तेव्हा चर्चेत आले जेव्हा यामध्ये बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या मुलाचे नाव समोर आले. अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट होताच एनसीबीने आर्यनसह काही प्रसिद्ध व्यक्तींनाही अटक केली. बॉलिवूडचे ड्रग्स कनेक्शन अनेकदा समोर आले आहे. अनेकदा एनसीबीच्या छाप्यामध्ये एखाद्या बॉलिवूडमधील कलाकाराचे नाव समोर येते आणि त्यानंतर संपूर्ण मीडिया हा विषय चवीने चघळत बसते. आता शाहरुख खान चा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज पार्टीतून अटक केली ही बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच सिनेसृष्टीमध्ये खळबळ उडालीच पण माध्यमांनीदेखील ही बातमी नको तितकी उचलून धरली. हीच तत्परता माध्यमांनी महिलांवर सातत्याने घडणाऱ्या सामूहिक  अत्याचाराच्या घटनांमध्ये दाखवायला हवी. मात्र महिला अत्याचाराविरुद्ध तावातावाने दाखवल्या जाणाऱ्या बातम्या व त्याचा पाठपुरावा थोड्या दिवसानंतर थांबून जातो हा इतिहास आहे. ड्रग्स पार्ट्यांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास अशा प्रकारच्या अंमली पदार्थ सेवनाच्या पार्ट्या बॉलिवूड जगतात सर्रास होत असतात मात्र त्याची चर्चा अपवादानेच होते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्त्या प्रकरणानंतर सिनेताऱ्यांचे हे ड्रग्स कनेक्शन प्रकाशझोतात आले मात्र त्यानंतर अंमली पदार्थांची विक्री व सेवन रोखण्यासाठी ठोस कारवाई दिसून आली नाही. आता तर बॉलिवूड कलाकारांची मुलेदेखील ह्या ड्रग्स रॅकेट मध्ये सामील असतील तर सिनेसृष्टीला डोक्यावर उचलणाऱ्या प्रेक्षकांना आत्मचिंतन करावे लागेल. चित्रपटाच्या आभासी दुनियेतील वर्तन वास्तविक जगापासून वेगळे असेल तर आजची तरुणाई कुणाच्या मागे पळतेय ही बाब चिंतनीय ठरते. 

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई 


Comments