केंद्रीय तपास यंत्रणांनी निरपेक्ष काम करावे

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक नेते-मंत्र्यांवर भ्रष्टाचार, अंमली पदार्थ व अनियमित संपत्तीचे आरोप होत आहेत. यात केंद्रीय तपास यंत्रणा मोठी भूमिका बजावत असून दररोज नवनवी प्रकरणे बाहेर येत आहेत. चुकीच्या पद्धतीने जमवलेल्या पैसा, संपत्तीवर अंकुश आणणे व दोषी लोकांवर कारवाई करणे हे तपास यंत्रणांचे प्रमुख काम आहे. सीबीआय, ईडी, एनसीबी यासारख्या तपास यंत्रणा स्वायत्तपणे काम करणाऱ्या असून मिळालेल्या माहितीच्या वा तक्रारीच्या आधारे आपला तपास सुरू करतात. मात्र त्यांच्यावर शंका घेऊन संशयाच्या भोवऱ्यात उभे करणे देशाच्या सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखे आहे. या तपास यंत्रणांनी जलद गतीने तपास करून आरोपींना शोधून काढणे अपेक्षित आहे. तपासात दिरंगाई संशयाला जागा निर्माण करते. केंद्रीय तपास यंत्रणांनी राजकीय दबावाला बळी न पडता आपले काम सुरू ठेवावे. पुरावे उपलब्ध असतील तर या तपास यंत्रणांकडे जाण्याचा अधिकार देशातील कुठल्याही नागरिकाला आहे. त्यामुळे त्यांचा वापर राजकीय पक्षांनी एकमेकांवर केवळ शाब्दिक कुरघोड्या करण्यासाठी करू नये. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments