बंदीची कारवाईच योग्य

महाराष्‍ट्र हे सर्वधर्मसमभाव जोपासणारे राज्‍य आहे. राज्‍यात सर्व जाती, धर्म व पंथाचे लोक सामोपचाराने वास्‍तव्‍य करत आहेत. मात्र समाजातील काही घटक सातत्‍याने विविध कारणांनी जातीय तेढ पसरवण्‍याचा प्रयत्‍नात असतात. हिंसक मार्गाने हे लोक आपला कार्यभाग साधण्‍याचा प्रयत्‍न करतात. धर्माच्‍या नावाखाली समाजातील लोकांना भडकवण्‍याचे काम करायचे आणि हिंसक वातावरण निर्माण करुन दहशत माजवायची अशा प्रकारची समाजविघातक कृती करताना काही संघटना दिसतात. यामध्‍ये रझा अकादमी ही संघटनादेखील गेल्‍या काही वर्षांपासुन आघाडीवर असल्‍याचे दिसून येत आहे. सन २०१२ मध्‍ये मुंबईमध्‍ये याच संघटनेच्‍या आंदोलनादरम्‍यान झालेला हिंसाचार, महिला पोलिसांचा विनयभंग, जय जवान स्‍मारकाची मोडतोड सर्वश्रुत आहे. इतका भयंकर प्रकार घडुनदेखील या संघटनेला मोर्चे काढण्‍यासाठी परवानगी मिळतेच कशी हा खरा प्रश्‍न आहे. त्रिपुरात घडलेल्‍या कथित घटनेवर महाराष्‍ट्रात हिंसक पध्‍दतीने मोर्चे काढण्‍याचा अधिकार कुणाला असू शकत नाही. निषेध लोकशाही मार्गाने व्‍यक्‍त करण्‍याचे अनेक पर्याय उपलब्‍ध असताना आंदोलनादरम्‍यान हिंसा घडवणे जाणीवपूर्वक अशांतता पसरवण्‍याचा प्रकार आ‍हे. राज्‍यातील कायदा व सुव्‍यवस्‍था बिघडवणा-या कुठल्‍याही संघटनेला मोर्चे - आंदोलनांची परवानगी पोलिसांनी देऊच नये. तसेच अशा संघटनेवर तात्‍काळ बंदीची कारवाईच उचित आहे.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई    


Comments