स्वागतार्ह निर्णय

राज्‍य लोकसेवा आयोगाच्‍या आगामी परिक्षांमध्‍ये उमेदवारांसाठी १ वर्षाने वयोमर्यादा वाढवण्‍याचा राज्‍य मंत्रिमंडळाचा निर्णय निश्‍चीतच स्‍वागतार्ह आहे. कोविडमुळे गेल्‍या दोन वर्षांपासुन लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया न झाल्‍याने अनेक उमेदवार वयोमर्यादा ओलांडलेल्‍या अवस्‍थेत आहेत. त्‍यांच्‍या आशा या संधीने नक्‍कीच पल्‍लवीत होणार आहेत. तथापि, हा निर्णय सरळ सेवेव्‍दारे होणा-या भरतींसाठी तसेच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमार्फत होणा-या निवड प्रक्रियांसाठीदेखील लागू करावा. जेणेकरुन सर्व स्‍तरांतील व स्‍थानिक पातळीवर नोकरीसाठी प्रयत्‍न करणा-या उमेदवारांनादेखील त्‍याचा लाभ मिळेल. यासाठी सरकारी सेवाप्रवेश नियमांमध्‍ये बदल करुन खुल्‍या व मागास वर्गातील उमेदवारांसाठी लागू असलेल्‍या वयोमर्यादेत किमान २ वर्षांची वाढ करणे आवश्‍यक आहे. सध्‍या शासकीय नोकरभरतीमध्‍ये खुल्‍या प्रवर्गासाठी ३८ वर्षे, मागास वर्गासाठी ४३ वर्षे तर इतर विशेष प्रवर्गांच्‍या वयोमर्यादेत अधिकची सूट देण्‍यात येत आहे. सदर नियमांमध्‍ये बदल करुन यापुढे होणा-या सर्व स्‍तरांवरील परिक्षांसाठी किमान दोन वर्षांची वयोमर्यादा सरसकट वाढवण्‍यात यावी असे वाटते.



वैभव मोहन पाटील         
घणसोली, नवी मुंबई


Comments