नवे वर्ष, आरोग्याचा संकल्प
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
नूतन वर्षाभिनंदन २०२२
२०२२ ह्या नव्या कोऱ्या वर्षाची सुरुवात होत आहे. गेल्या दिड दोन वर्षांपासुन आपण कोरोना हया महाभयंकर जागतिक महामारीच्या सावटाखाली वावरत आहोत. गेल्या वर्षी देशात शिरकाव केलेला कोरोना विषाणू अदयाप आपल्यातून जाण्यास तयार नाही. या साथीच्या पहिल्या दोन लाटांमध्ये मोठी जिवितहानी झाली आहे. आपले अनेक परिचीत आप्तजनदेखील या जिवघेण्या साथीच्या लाटांमध्ये मृत्यूमुखी पडले. त्यात सध्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराची भिती सर्वत्र पसरलेली आहे. या प्रकाराचा प्रसार परदेशांमध्ये मोठया वेगाने होत असल्याने त्या दृष्टीने आपण खबरदारी घेतलीच पाहीजे. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसींगचे नियम व मास्कचा वापर आपण कटाक्षाने करायलाच हवा. त्याचबरोबर सर्वच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांनी कोविड लसीचे दोन्ही डोसदेखील घेणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात पदार्पण करत असताना आपल्यापुढे अनेक आव्हाने अजूनही आ वासुन उभी आहेत. मात्र आरोग्याच्या बाबतीत आपण बाळगलेली सतर्कता आपल्याला हया कठीण काळातुन बाहेर पडण्यास नक्कीच उपयोगी पडेल. खरेतर नवीन वर्ष म्हणजे उत्साहाचे व नव्या संकल्पाचे. नवीन वर्ष साजरे करण्याच्या अनेक देशी विदेशी पद्धती आपल्या समाजात दृढ आहेत. कुणी फिरायला शहर सोडून बाहेर पडतो, कुणी कुटुंबासह दिवस घालवतो, अगदीच हौशी मंडळी मित्रमंडळीसह या दिवसाचे सेलिब्रेशन करतो तर काही नव्या वर्षाचे विविध संकल्प सोडून नववर्षाचे स्वागत करतात. एखादा नवा उद्योगधंदा सुरू करण्याचा पण केला जातो, नवे घर, गाडी विकत घेण्याचा संकल्प किंवा दररोजच्या जीवनात ठराविक गोष्ट खाणे सोडणे, वागणे, बोलणे, चालणे यात बदल करण्याचादेखील संकल्प केला जातो. मात्र माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याचे आरोग्य. आरोग्य व्यवस्थित असेल तर त्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यात फारशा अडचणी उदभवत नाहीत त्यामुळेच आपले आरोग्य नीट सांभाळण्याचा संकल्प प्रत्येकाने नव्या वर्षात करायला हवा असे माझे मत आहे. नव्या वर्षाकडून आपल्यापैकी प्रत्येकाला अनेक आशा असतात. अनेक प्रकारची नियोजने केलेली असतात. मात्र, आपले नियोजन तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहू. आपले शरीर निरोगी राहावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आवश्यक असलेला वेळ आपल्याला मिळत नाही हेदेखील तितकेच खरे आहे. तुमचं आरोग्य चांगलं असेल तरच तुमचं मानसिक स्वास्थ्य व दैनंदिन जीवनातील आत्मविश्वास देखील चमकदार असताे. म्हणून आरोग्यदायी असणं महत्त्वाचं. यासाठी काही आरोग्यदायी संकल्प आपण आज सोडायलाच हवेत. मानसिक आरोग्य आणि सुंदरता या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. राग. ईर्ष्या, गर्व किंवा नकारात्मकता मनात असेल तर ते चेहऱ्यावर प्रतिबिंबीत होते. त्याचबरोबर ताण, तणाव, नैराश्य, चिंता यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. म्हणून मानसिक स्वास्थ्य चांगले असणे गरजेचे आहे. नवीन वर्षात मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा. तुम्हाला आनंद देणारी चांगली कामे करा. तुमचे छंद जोपाला. नवीन ठिकाणी फिरायला जा. त्यामुळे तुमचे मन आनंदी होईल आणि तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसेल. ध्यान, विश्वास व श्रद्धा या गोष्टीदेखील खूप महत्त्वाच्या आहेत. ईश्वरी ध्यानामुळे तुमचे मन शांत होईल. राग, द्वेष, भीती, चिंता दूर होऊन मानसिक संतुलन साधण्यास मदत होईल. त्यामुळे आपली सकारात्मकता वाढीस लागेल. मनाचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी तुम्हाला सात्विक आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. असं म्हणतात, यथा अन्नम् तथा मनम्. म्हणून फळे, भाज्या, पालेभाज्या, सुकामेवा यांसारख्या सात्विक आहारामुळे तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. परिणामी तुम्ही सजग व आत्मविश्वासाने भरलेले राहाल. म्हणून शक्यतो सात्विक अन्नाचा आहारात समावेश करा. नव्या वर्षात आणखी आपण काय करायला हवे तर नव्या वर्षांपासून नवे विचार आपल्या मनात रुजायला हवेत. आपण निश्चय करायला हवेत मग तो निश्चय दररोज चालायला जायचा असो किंवा व्यायाम करायचा, वा वजन कमी करायचा. पण योग्य विचारांना नियोजनांची साथ मिळाली नाही तर त्या संकल्पांना काही अर्थ राहणार नाही. तुमचेच संकल्प काही दिवसांतच तुमच्याकडूनच मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाहीत. नेहमी फार मोठे टारगेट ठेवले जाते. उदाहरणार्थ, मी एका महिन्यात १० किलो वजन कमी करेन. वास्तविकपणे व नैसर्गिकपणे हे नक्कीच शक्य नाही. त्यापेक्षा मी नियमित व्यायाम करून आणि योग्य आहार घेउन शारिरिक स्वास्थासाठी मनापासून प्रयत्न करीन हा निश्चय जास्त योग्य आहे. असे केल्यामुळेच आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकतो. एक वाईट गोष्ट सोडण्याचा निश्चय पूर्ण करणे अवघड आहे. पण त्या तुलनेत चांगले काम करण्याचा निश्चय पाळणे सोपे आहे. त्यासाठी संकल्पांमध्येही ताळमेळ हवा. ते संकल्प जास्त यशस्वी होतात. संकल्प पाळण्यात अपयश आले तर लगेचच तो सोडून देणे योग्य नसून पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसे बघितले तर प्रत्येक दिवस नवाच असतो. १ जानेवारीला तुमचा जेवण कमी करण्याचा संकल्प पाळला गेला नाही तर २ तारखेला तो परत सुरू करा. वाटेतच सोडून देऊ नका. उद्यावर ढकलण्याचे कामही करू नका. संकल्पात सातत्य असणे जितके महत्वाचे आहे तितकेच तो टिकवण्यात परिश्रम व जिद्ददेखिल अत्यंत महत्वाची आहे. कोरोनाने खरेतर आज आपल्याला व्यक्तीगत आरोग्य किती महत्वाचे आहे हे शिकवले आहे. त्यामुळे संकल्प कुठलाही करा तो आरोग्याशी निगडीत असायला हवा. नववर्षाचे आगमन आपल्याला नवीन संकल्पांसाठी चांगली संधी आहे मात्र आपले संकल्प आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असायला हवेत.
नविन वर्ष सर्वांना आरोग्यदायी जावो हयाच सदिच्छा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps


Comments
Post a Comment