अनाथांची माय हरपली
हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांच्या 'माई' बनलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने समाजसेवेतील एक आदर्श हरपला आहे. नुकतेच त्यांना 'पद्मश्री' किताबाने सन्मानित करून, केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची उचित दखल घेतली होती. मानवतेची केवळ भाषा न करता, ती कृतीतून साकारणाऱ्या सिंधुताई खऱ्या अर्थाने 'अनाथांच्या आई' होत्या. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभे केलेले काम प्रशंसनीय आणि वंदनीय आहे. त्यांची कहाणी महाराष्ट्राला काही नवीन नाही. खुद्द त्यांच्या भाषणांतून, त्यांच्यावरील लेखनांतून आणि चित्रपटातून ते सर्वांसमोर गेले आहे. सिंधुताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा... पन्नास-साठच्या दशकात भारतातील बहुतेक महिलांची कहाणी अशीच असे. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेल्या सिंधुताईंची कथा सुरुवातीला याहून वेगळी नाही. परंतु त्यांनी अन्यायाला वाचा फोडली. शेण काढणाऱ्या महिलांना मजुरी मिळत नसल्याबद्दल त्यांनी आवाज उठविला. परंतु त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांचे चारित्र्य मलिन करणारे आरोप झाले, सासरच्यांनीही साथ सोडली अन् तिथून सुरू झाला सिंधुताईंचा संघर्ष. बेघर झाल्यानंतर त्या भटकत राहिल्या. कधी रेल्वेत राहिल्या, तर कधी स्मशानात. पोटात भुकेचा आगडोंब घेऊन हिमतीने उभे राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भीक मागण्याची वेळ आली; परंतु यातूनच त्यांना अनाथांच्या प्रश्नांचे भेदक दर्शन झाले. अनाथांची आई होण्याची प्रेरणाही त्यांना मिळाली. स्वत:ची भूक भागवितानाच अन्य भुकेल्यांना आपल्या घासातील घास देत त्यांनी जगावेगळा प्रपंच सुरू केला. त्यांचे कार्य आज समाजात एकमेवाद्वितीय आहे. मायेचा ओलावा त्यांनी अखेरपर्यंत आपल्या भाषेतून आणि वागण्यातून जोपासला. त्यांच्या वागण्याबोलण्यातील साधेपणातून त्यांच्या कार्याची दैदिप्यमान शृंखला प्रतिबिंबित व्हायची. सामाजिक कार्यात काम करणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्थांना त्यांचे कार्य आदर्शवत होते. त्यामुळेच त्यांच्या अकाली जाण्याने सामाजिक कार्याचा वसा व आदर्श आज हरपला आहे. माईंना भावपूर्ण आदरांजली.
Comments
Post a Comment