विराटने आणखी खेळत राहावे
- Get link
- X
- Other Apps
विराट कोहली भारतीय क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर ‘बीसीसीआय’ने कोहलीची नियुक्ती केली होती. कोहलीच्या कसोटी नेतृत्वाच्या कारकीर्दीत भारताने जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान गाठले. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे उपविजेतेपद पटकावले. विराटने ६८ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले, त्यापैकी ४० सामने भारताने जिंकले. कर्णधार म्हणून भारताने २०१५ मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली होती. २२ वर्षात प्रथमच भारताने हा पराक्रम केला. याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले. त्याच वर्षी भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिकाही जिंकली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अनपेक्षित पराभवानंतर विराट कोहलीने शनिवारी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) व तमाम क्रिकेट रसिकांना धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासुन कोहलीचे ‘बीसीसीआय’शी त्याचे संबंध चिघळले होते. त्यामुळे क्रिकेटमधील राजकारणाला कंटाळुन तर कोहलीने राजीनामा दिला नाही ना अशी शंका घेण्यासदेखील वाव आहे. आपल्या कारकिर्दीत देशाचे नाव उंचीवर घेऊन जाणा-या एका यशस्वी खेळाडूचा कर्णधारपणाचा राजीनामा न पटणारा आहे. खेळात पाहिजे असणारी आक्रमकता, नेतृत्वकौशल्य, जिंकण्याची जिदद व सांघिक भावना ठेवून खेळणा-या विराट कोहलीची दैदीप्यमान कामगिरी पाहता त्याने अजुन काही काळ कसोटी कर्णधारपदी कायम राहायला हवे होते. त्याच्या राजीनाम्याने भारतीय क्रिकेटचेच नुकसान होणार असुन यशाच्या शिखरावर असलेल्या खेळाडूचे अशा प्रकारे एक पाऊल मागे टाकणे हे चांगले संकेत नाहीत. कर्णधार पदाचा राजीनामा देणा-या विराटने आता क्रिकेटमधूनही निवृत्ती न घेता आणखी काही काळ देशासाठी खेळत राहावे अशी अपेक्षा आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment