२१ जून जागतिक योग दिन - "हर आंगण योग"

योगा फॉर वसुधैव कुटुंबकम
२१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असून सन २०१५ पासून हा दिवस आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. यंदाच्या योग दिनाची टॅग लाईन "हर आंगन योग" अशी असून 'योगा फॉर वसुधैव कुटुंबकम" या संकल्पनेवर यंदाचा ९वा जागतिक योग दिन साजरा केला जात आहे.  
आज आपल्या आजूबाजूला विविध आजारांनी, व्याधींनी त्रस्त असणारे रुग्ण आपल्याला पावलोपावली दिसतात. ओसंडून वाहणारी रुग्णालये व दवाखान्यांमधील गर्दी याची साक्ष आपल्याला देतील. पारंपरिक आजारांची व उपचारांची जागा आता संसर्गजन्य व अससंसर्गजन्य आजार अशा नव्या आधुनिक नावांनी घेतली आहे. त्यावरील निरनिराळ्या उपचार पद्धती व शस्त्रक्रिया जर आपण पहिल्या तर त्यासाठीच्या वैद्यकीय खर्चाचे आकडे पाहूनच गरगरायला होते. घर ते कार्यालय यामधील प्रवासात व कामात आपण इतके गुरफटलेले आहोत की मानसिक तणाव व शारीरिक व्याधी आपल्यामध्ये कधी घर करतात हे आपल्याला कळतही नाही. लहान मोठ्या व्याधींसाठी जवळपासच्या किंवा ओळखीच्या डॉक्टरकडे जाऊन जुजबी औषधोपचार करून घेतो व हा औषधोपचार असंख्य वैद्यकीय चाचण्यांसह वर्षानुवर्षे तसाच पुढे चालू ठेवतो. याचा परिणाम शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होण्यात तसेच मानसिक संतुलन ढासळण्यात होतो हे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. बळावणारा आजार हा गरीब, श्रीमंत, उच,नीच, जाती, जमाती असा कोणताही भेदभाव करत नाही त्यामुळे त्यातून कुणीही सुटत नाही. आता तुम्ही म्हणाल यावर उपाय काय? आजार जडला किंवा प्रकृती अस्वास्थ्यासाठी डॉक्टरकडे जाणार नाही तर कुणाकडे जावे? यावर एक सोपा व हक्काचा उपाय आपल्याकडे उपलब्ध आहे, तोही कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय. हा उपाय म्हणजे "योग". माणसाला जडणाऱ्या बहुतांश व्याधींवर एकमेवाद्वितीय, प्रतिबंधात्मक, कमी खर्चिक, घरात-कार्यालयात बसल्याबसल्या करता येण्याजोगा, मनोबल-आत्मविश्वास-व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत करणारा उपाय म्हणून योगाकडे पाहण्यास हरकत नाही या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो आहे. प्राचीन काळी ऋषी मुनींनी अध्‍यात्मिक व आरोग्‍यविषयक संशोधनाचे एक शास्‍त्र निर्माण करुन त्‍याला योगशास्‍त्र हे नाव दिले. योग ही शरीराला संतुलित व प्रसन्‍न ठेवण्‍यासाठीची एक क्रिया आहे. आपण आपल्‍या शरीराकडे वेळीच लक्ष न दिल्यास आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात. हे टाळून निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग्य व्यायाम व आहार महत्वाचा ठरतो. आज शहरी भागात काम करणाऱ्या बहुतांशी नोकरदारांना पाठ, मणके, गुढगे, सांधे, मानसिक तणाव, अशांती आशा विकारांनी ग्रासलेले आहे. त्यांच्यासाठी योग साधनेतील विविध थेरपी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत व त्याही कोणत्याही साईड इफेकटशिवाय. 'योग' हा विषय अत्यंत व्यापक स्वरूपाचा असून परदेशी लोक त्यामध्ये अधिक रुची दाखवत असताना आपल्या देशात मात्र त्याचा पाहिजे तितका प्रसार अजून झालेला नाही ही शोकांतिका आहे. यामुळे उद्या परदेशी संस्था व प्रशिक्षक आपल्या देशात येऊन आपल्याच देशात उत्पन्न झालेल्या या थेरपिवर आपणाला प्रशिक्षण देऊ लागले तर नवल वाटू नये. योगाचे महत्व देशाच्या पंतप्रधानांनी देखील ओळखून देशात राष्‍ट्रीय आयुष मिशन सारखे महात्‍वाकांक्षी अभियान देशात सुरू केले आहे. योग थेरपीचा समावेश असलेल्‍या हया आयुष अभियानाविषयी आज आपण थोडी माहिती पाहू. आयुष कार्यक्रमांतर्गत आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिध्‍द व होमिओपॅथी चिकित्‍सा पध्‍दतीचा समावेश करण्‍यात आलेला आहे. सन 1995 मध्‍ये आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्रालय, केंद्र सरकारच्‍या अधिपत्‍त्‍याखाली ''भारतीय चिकित्‍सा पध्‍दती व होमओपॅथी'' हा विभाग कार्यरत करण्‍यात आला. सन 2008 पासुन राज्‍यात आयुष चिकित्‍सा पध्‍दतीला मुख्‍य प्रवाहात आणावे व स्‍थानिक चिकित्‍सा पध्‍दतीचे पुनरुज्‍जीवन व्‍हावे यासाठी राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत आयुष विभाग कार्यान्वित करण्‍यात आला. त्‍यानंतर केंद्र शासनाने सुरु केलेल्‍या राष्‍ट्रीय आयुष अभियानाची अंमलबजावणी सध्‍या महाराष्‍ट्रात करण्‍यात येत आहे. आयुषच्‍या माध्‍यमातुन स्‍थानिक चिकित्‍सा पध्‍दतीला पुनरुज्‍जीवित करणे, आयुष चिकित्‍सा पध्‍दतीबाबत लोकामध्‍ये विश्‍वास निर्माण करणे, त्‍याचे महत्‍व पटवणे, आयुष पध्‍दतीत सुधार करणे, आयुष संस्‍थांचे बळकटीकरण करणे हे या अभियानाचे उददेश आहेत. तसेच आयुष अंतर्गत राबविले जाणारे कार्यक्रम राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमांसोबतच राबविणे, त्‍याअंतर्गत आवश्‍यक औषधोपचार करणे, आयुष वैदयकीय अधिका-यांना प्रशिक्षित करणे, ग्रामीण भागातील आरोग्‍य संस्‍थांमधे पंचकर्म, क्षारसुत्र, होमिओपॅथी, युनानी, योगा निसर्ग उपचार यासारख्‍या आयुष सेवा पुरवणे हीदेखील उदिदष्‍ट या कार्यक्रमाची आहेत.  या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्‍यासाठी राज्‍यस्‍तरावर कार्यक्रम व्‍यवस्‍थापन कक्ष, जिल्‍हा स्‍तरावर जिल्‍हा आयुष कक्ष तसेच जिल्‍हा रुग्‍णालय स्‍तरावर आयुष विंग स्‍थापन करण्‍यात आली असुन त्‍यामध्‍ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी वैदयकीय अधिकारी यांची नेमणूक करण्‍यात आली आहे. याचबरोबर स्‍त्री रुग्‍णालय, उपजिल्‍हा रुग्‍णालय, ग्रामीण रुग्‍णालये तसेच प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍तरावरदेखील आयुष सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहेत. ग्रामीण भागात आरोग्‍य सेवा देणा-या आशा कार्यकर्त्‍या व आरोग्‍य सेवकांच्‍या प्रशिक्षण कार्यक्रमातदेखील आयुष प्रशिक्षणाचा समावेश करण्‍यात आलेला आहे. आयुष कार्यक्रमांतर्गत सर्व वैदयकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांचे वेगवेगळे प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्‍यात येतात. या प्रशिक्षणामध्‍ये बाहयरुग्‍ण व आंतररुग्‍ण चिकित्‍सा पध्‍दती, पंचकर्म, क्षारसुत्र, योग व निसर्गोपचार या व्‍यतिरीक्‍त व्‍यक्तिमत्‍व विकास याचादेखील समावेश आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये साप्ताहिक योगसत्रे आयोजित केली जात असून त्या दिवशी योगाची प्रात्यक्षिके करवून घेतली जातात. 

दरवर्षी २१ जून हा दिवस जिल्‍हा व राज्‍य पातळीवर जागतिक योग दिवस म्‍हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्‍य व जिल्‍हा स्‍तरावर प्रख्‍यात योग संस्‍थांमार्फत व्‍याख्‍याने, शिबिरे व सामुहिक योगाभ्‍यास सत्रे आयोजित करण्‍यात येत आहेत.  तसेच दरवर्षी धन्‍वंतरी जयंती ही राष्‍ट्रीय आयुर्वेद दिवस म्‍हणूनदेखील सर्वत्र साजरा कली जाते.   
आयुष कार्यक्रम हा राज्‍यातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेला बळकटी देण्‍याचे काम करत असुन आयुर्वेदीक, योग व होमिओपॅथीसारख्‍या उपचार पध्‍दतीकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. आयुष काय्रक्रमाची व्‍याप्‍ती वाढवण्‍याचे केंद्र सरकारचे प्रयत्‍न सुरु असुन त्‍या अनुषंगाने राष्‍ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्‍हणून आयुषकडे पाहिले जाते. येत्‍या काळात या कार्यक्रमाचे महत्‍व व उददेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्‍याचा राज्‍य आयुष अभियानाचा मानस असून त्‍या अनुषंगाने सुरु असलेली वाटचाल नक्‍कीच आश्‍वासक आहे.



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments