ठाणे व पालघर जिल्ह्यातील शाळांना जॉय ऑफ गिव्हिंग व आयआयकेअर संस्थेमार्फत संगणक भेट
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
ठाणे व पालघर जिल्ह्यातील शाळांना जॉय ऑफ गिव्हिंग व आयआयकेअर संस्थेमार्फत संगणक भेट
मुंबईच्या जॉय ऑफ गिव्हिंग सामाजिक संस्था व आयआयकेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी 'संगणक साक्षरता उपक्रम' राबवण्यात येत आहे. ह्या उपक्रमांतर्गत अनेक शाळांना संगणक भेट देण्यात आलेले आहेत. शनिवार दिनांक २ मार्च २०२३ रोजी ह्या उपक्रमांतर्गत पालघर व ठाणे जिल्ह्यातील दोन शाळांना संगणक भेट देण्यात आले. पालघर जिल्ह्यातील केळठण- वज्रेश्वरी येथील सरस्वती गणपत पाटील विद्यालय ह्या जवळपास १७० आदिवासी कुटुंबातील विद्यार्थी शिकत असलेल्या माध्यमिक शाळेत संगणक भेट देण्यात आले. जॉय ऑफ गिव्हिंगचे नवी मुंबई समन्वयक वैभव मोहन पाटील यांनी सदर संगणक शाळेतील संगणक प्रयोगशाळेसाठी सुपूर्द केले. यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक विजय पाटील, के जी पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक एन के पाटील, कर्मचारी वर्ग योगेश माळी, निखिल पाटील, नरेश पाटील आदी प्रतिनिधी उपस्थित होते. सरस्वती गणपत पाटील विद्यालय ही शाळा गेली पंचवीस अकलोली केळठण सारख्या ग्रामीण व दुर्गम भागात ज्ञानदानाचे उत्तम कार्य करत असून शाळेतील दहावीच्या वर्गाचा निकाल गेली अनेक वर्षे १०० टक्के लागत असल्याचे वैभव पाटील यांनी सांगितले. याचे संपूर्ण श्रेय शाळेचे शिक्षक व संस्थाचालकांचे असून पुस्तकीय ज्ञानाबरोबरच कौशल्य विकास व संगणकीय ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे योगेश माळी यांनी स्पष्ट केले. यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक विजय पाटील सर यांनी जॉय व आयआयकेअर संस्थेचे शाळेला संगणक उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून आभार मानत शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्याच सहयोगातून तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेतील रोपटे भेट देत वैभव पाटील यांचे आभार मानले. त्यानंतर दुपारी भिवंडी तालुक्यातील सागाव - एकसाल येथील ग आं पाटील विद्यालयातदेखील संगणक वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या शाळेत परिसरातील एकूण २७८ मुले पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गांत शिक्षण घेत आहेत. यावेळी पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात शाळेच्या वतीने वैभव पाटील व योगेश माळी यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले. यावेळी नवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या ग . आं. पाटील विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री. केशव झिपरु पाटील, सहसचिव श्री प्रकाश विठ्ठल पाटील, वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक प्रभाकर भेरे, ग्रामस्थ प्रवीण निपुर्ते, मुख्याध्यापिका सौ. योगिता मोहन पाटील, सहशिक्षक श्री. दयानंद विठ्ठल पाटील, श्री. बाळाराम पिलाजी कनोजे, श्री .विपुल शंकर शेळके, शिपाई श्रीमती पारू केशव पाटील इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष केशव पाटील यांनी संस्थेचा १९८३ सालापासूनचा इतिहास उलगडत संस्थेच्या अस्तित्वासाठी केलेला संघर्ष उपस्थितांसमोर विषद केला. संगणक शिक्षण आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक गरज बनलेली असून संस्थेच्या माध्यमातून ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागांतील शाळांना संगणक व संगणकीय साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे वैभव पाटील यांनी स्पष्ट केले. अत्यंत कठीण व संघर्षमय परिस्थितीत ग्रामीण भागात कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करणाऱ्या अशा शैक्षणिक संस्थांचे देशाची भावी पिढी घडवण्यात व सामाजिक परिवर्तनामध्ये मोठे योगदान असल्याचे पाटील यांनी सांगितले. शिक्षक दयानंद कनोजे यांनी प्रास्ताविक केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता पाटील यांनी जॉय व आयकेअरचे पत्र देत आभार मानले. यावेळी शाळेतील शिक्षकांचादेखील जॉय संस्थेच्या वतीने पुस्तके भेट देऊन वैभव पाटील यांनी सन्मान केला. स्पर्धेच्या युगात संगणक ज्ञान अत्यंत महत्वाचे झाले असून संगणकांच्या अभावी त्या ज्ञानापासून ग्रामीण, दुर्गम व अदिवासी भागातील मुले वंचित राहू नयेत यासाठी सामाजिक दायित्व म्हणून जॉय व आयआयकेअर यांच्यामार्फत राबवण्यात येत असलेला संगणक साक्षरता उपक्रम हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून आगामी काळात याचा निश्चितच फार मोठा लाभ ग्रामीण शाळांना होणार आहे. ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल जॉय आणि आयआयकेअर ह्या दोन्ही संस्थांचे समाजातील विविध घटकांमार्फत कौतुक करण्यात येत आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment