आरोग्य सेवेतील संवेदनशील, अभ्यासू वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश भागवत सेवानिवृत्त

आरोग्य सेवेतील संवेदनशील, अभ्यासू वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश भागवत सेवानिवृत्त
३१ मे २०२५ रोजी अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यातीलच एक म्हणजे आमचे परमस्नेही, मार्गदर्शक, खंदे पाठीराखे डॉ अविनाश भागवत. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ भागवत यांच्यासोबत निर्माण झालेले ऋणानुबंध उत्तरोत्तर वाढतच गेले. एक अत्यंत संवेदनशील, अभ्यासू, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून डॉ भागवत सर्वांना परिचित आहेत. त्यांची सेवानिवृत्ती आरोग्य व्यवस्थेत निश्चितच एक पोकळी निर्माण करणारी आहे. त्यांचा नेहमीच हसतमुख व कुणाला कधीही न दुखावण्याचा स्वभाव, सकारात्मक दृष्टिकोन, दांडगा लोकसंपर्क, माणसे जोडण्याची कला एकमेवाद्वितीय आहे. त्याचा विभागाला चांगला उपयोग झाला. ७ मे १९६७ रोजी जन्मलेल्या डॉ भागवत यांचे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भेटा हे मूळ जन्म गाव. १ मे २००१ मध्ये शासकीय आरोग्य सेवेत रुजू झालेल्या डॉ भागवत यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा येथे केली. त्यानंतर पालघर व ठाणे जिल्ह्यातील वाशाळा, दाभाड, आनगाव, वज्रेश्वरी, दहागाव, दिवे अंजुर ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली. तालुका वैद्यकीय अधिकारी  मोखाडा म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले. १८ मार्च २०२४ पासून प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे ते कार्यरत होते. सध्या ते आरोग्य सेवा आयुक्तालयात आयुष विभागाचा कार्यभार पाहत असताना २४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीदरम्यान असामान्य कामगिरीसाठी विभागीय स्तरावर आनंदीबाई जोशी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला असून जागतिक आरोग्य संघटनेची थायलंड आणि बँकॉकची फेलोशिपदेखील मिळाली होती. कोविड काळात उत्तम सेवा दिल्याबद्दल त्यांचा सन्मान झालेला आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषवत कर्मचारी हिताच्या निर्णयात महत्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे ते कोकण विभाग सहसचिव होते. मराठवाडा जनविकास परिषदेच्या ठाणे विभागाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. मॅग्मो संघटनेच्या कोकण विभागाचे ते माजी अध्यक्ष आहेत. अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करत असताना आरोग्य सेवेत मनापासून झोकून देऊन त्यांनी योगदान दिले. मोखाडासारख्या दुर्गम भागांत काम करत असताना तेथील आदिवासी पाड्यांवर अंधश्रद्धेतून आजार बरा करण्यासाठी भगत म्हणजे तांत्रिकांकडे लोकांचा ओढा अधिक असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर भगतांनाच विश्वासात घेऊन त्यांचे समुपदेशन करत भगतांकडे जाणारा लोकांचा ओढा सरकारी आरोग्य केंद्राकडे वळवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. रुग्ण व गरीबांप्रति अत्यंत संवेदनशील असलेले डॉ भागवत हे आमच्याबरोबर सामाजिक कार्यातदेखील सक्रिय योगदान देत आहेत. जॉय ऑफ गिव्हिंग ह्या आमच्या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील शाळांमध्ये राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमामध्ये ते सहभाग घेतात व मार्गदर्शन करतात. त्यांच्यासोबत निर्माण झालेले कार्यालयीन, सामाजिक, कौटुंबिक ऋणानुबंध पुढेदखील असेच टिकून राहतील यात शंका नाही. तूर्तास त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा चित्तींतो. 

वैभव 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त