जॉयचा दिघाशी (भिवंडी) येथे विदयार्थी सहाय्यता उपक्रम संपन्न

दिघाशीतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ‘जॉय’ची आनंदरेषा
भिवंडी : १४ फेब्रुवारीचा दिवस अनेकांसाठी प्रेम व्यक्त करण्याचा असतो; मात्र ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दिघाशी गावात आज प्रेमाची एक वेगळीच अनुभूती साकारली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जोगेश्वरी येथील जॉय ऑफ गिव्हिंग या संस्थेने कै. विठ्ठल अमृत पाटील विद्यालयात आयोजित केलेला विद्यार्थी सहाय्य उपक्रम उत्साहात आणि समाधानाच्या वातावरणात संपन्न झाला. 
यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक वृत्त प्रकाश चे संपादक मनीष वाघ सपत्नीक उपस्थित होते.जॉय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे, समन्वयक वैभव पाटील, कार्याध्यक्ष असूंता डिसोझा, पदाधिकारी मिना भुतकर, भूषण मुळे, अविनाश कारगुटकर, निलेश घोडविंदे, वज्रेश्वरी आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक डॉ प्रभाकर भेरे, शाळेचे मुख्याध्यापक  गुरुदत्त पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

तसेच सहशिक्षक माधुरी भोईर, राजेंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, रुचिता पाटील, रामू बेंदर, स्वप्नाली पाटील, शोभा मढवी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी प्रकाश कामडी, मनोज गायकवाड, रसिका न्हानवे आदी उपस्थित होते. 
 कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार स्वागतगीताने झाली. बँड आणि लेझीमच्या गजरात मुलांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी मुलांनी बनवलेल्या खास कागदी पुष्पगुच्छानी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. 
ग्रामीण, आदिवासी व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या ध्यासातून जॉय संस्था सातत्याने कार्यरत आहे. सभासदांच्या आर्थिक योगदानातून उभा राहिलेला हा उपक्रम आज प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य, किराणा सामग्री आणि आधुनिक शिक्षणाचे प्रतीक असलेला संगणक देताना साकार झाला.
दिघाशीतील कै. विठ्ठल अमृत पाटील विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असून १३७ मुली आणि ११३ मुले असे एकूण २५० विद्यार्थी खडतर परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. साधनांची कमतरता असली तरी जिद्दीचा दिवा मात्र येथे अखंड पेटलेला आहे. शाळेचा एसएससी निकाल ९० टक्क्यांहून अधिक लागत असल्याची अभिमानास्पद नोंद या कार्यक्रमात अधोरेखित झाली.

आजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच आवश्यक किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात साहित्य पोहोचताना त्यांच्या डोळ्यांत उमटलेली कृतज्ञतेची चमक आणि भविष्याची आशा हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. याच वेळी शाळेला संगणक भेट देण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची दारे खुली व्हावीत, आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांचा परिचय व्हावा, हा या भेटीमागील मुख्य हेतू असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी जॉयच्या सर्व पदाधिकारी व सभासदांचे आभार मानताना, “आपल्या छोट्याशा योगदानातून एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो,” असे नमूद केले. समन्वयक वैभव पाटील यांनीही भविष्यात हेच विद्यार्थी स्वावलंबी होऊन समाजाला परतफेड करतील, अशी आशा व्यक्त करत जॉयने ठाणे, पालघर, रायगड भागात राबवलेल्या विविध उपक्रमांची विस्तृत माहिती दिली. 
निलेश घोडविंदे यांनी शासनाच्या १०८ ह्या आपत्कालीन टोल फ्री नंबर व एप्लिकेशनबद्दल माहिती उपस्थितांना दिली. डॉ प्रभाकर भेरे यांनी आरोग्य विभाग राबवत असलेल्या सिकल सेल व हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमाविषयी जनजागृतीपर माहिती देत उपस्थितांना आरोग्याबाबत जागरूक राहण्यासाठी प्रात्यक्षिकांसह टिप्स दिल्या. 
औपचारिकतेपलीकडे जाऊन हा कार्यक्रम संवाद, प्रेरणा आणि आत्मविश्वासाची देवाणघेवाण ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र भोईर तर आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या प्रवासात ‘जॉय’चा हा हातभार म्हणजे केवळ साहित्य वाटप नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांना मिळालेली नवी पंखे आहेत.

यावेळी मुलांनी बनवलेल्या खास कागदी पुष्पगुच्छानी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. सर्व शिक्षकवृंदाला यावेळी जॉयचे वैभव पाटील यांनी स्वलिखित पुस्तकभेट देऊन सन्मानित केले. 

ग्रामीण भागातील गरजू, आदिवासी व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जॉय संस्थेमार्फत सभासदांच्या व हितचिंतकांच्या आर्थिक योगदानातून ग्रामीण भागात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ठाणे, पालघर, रायगड येथील दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये गरजू, आदिवासी मुलांना संस्थेमार्फत शैक्षणिक व जीवनावश्यक वस्तू तसेच संगणकांची भेट दिलेली आहे. जॉय संस्थेच्या कार्यामध्ये नेहमीच सढळ हस्ते मदत करणारे जॉयचे सर्व पदाधिकारी, सभासद यांचे त्यांच्या या उपक्रमातील बहुमुल्य योगदानासाठी संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी आभार मानले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत हातभार लावण्यासाठी जॉय संस्था यापुढेदेखील नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे जॉय समन्वयक वैभव पाटील स्पष्ट केले. 

दिघाशीच्या शांत परिसरात आज खऱ्या अर्थाने ‘जॉय ऑफ गिव्हिंग’चा ' दिलेले प्रेम, मिळालेला विश्वास आणि उज्ज्वल भविष्याची सामूहिक प्रतिज्ञा ' हा खरा अर्थ अनुभवायला मिळाला.

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त