देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

वारसा १०० वर्षांचा 
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील देवघर हे गाव सार्वजनिक गणेशोत्सवाचे १००वे वर्ष यंदा साजरे करत आहे. गेल्या दोन पिढ्यांचा हा वारसा गावातील तरुण मंडळींनी अविरतपणे आजही सुरू ठेवला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कै. महादेव राम पाटील यांनी सुरु केलेला एक गाव एक गणपती उत्सव आजही गावात मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदा गावातील हा गणेशोत्सव १०० वर्षे पूर्ण करत आहे. त्या निमित्ताने अत्यंत वास्तवदर्शी देखावा साकारण्यात आला असून त्यात गावातील घरे, शाळा, कॉलेज, मंदिरे यांसह गत १०० वर्षांत गावातील ज्या ठिकाणी हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला ती ठिकाणेदेखील ठळकपणे दर्शविण्यात आली. गावाशेजारील गुंज काटी येथील डोंगराच्या कुशीत वसलेले भगवान परशुरामांचे पांडवकालीन ऐतिहासिक मंदिरदेखील अत्यंत सुबकपणे देखाव्याच्या दर्शनी भागात दाखवण्यात आले. हा देखावा पाहण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. मंदाकिनी पर्वताच्या कुशीत वसलेले १००० ते १२०० लोकवस्तीचे देवघर हे एक छोटेसे गाव असून गावात सर्व सण - उत्सव मोठ्या उत्साहात व एकोप्याने साजरे करण्यात येतात. गावातील आबालवृद्धांच्या पुढाकाराने एक गाव एक गणपती, एक गाव एक होळी, एक गाव एक नवरात्र उत्सव, एक गाव एक हरिनाम सप्ताह हे उत्सव दरवर्षी एकोप्याने साजरे होतात. त्याचप्रमाणे दत्त जयंती, गावदेवी उत्सव, श्री संत तुकाराम बीज, गोकुळ अष्टमी, शिव जयंती, श्री साई बाबा पालखी सोहळा, श्रीसंत निवृत्तीनाथ दिंडी सोहळा तसेच मे महिन्यात बालसंस्कार शिबिराचेदेखील आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची उभारणी देवघर गावात सध्या अंतिम टप्प्यात असून वारकरी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी भविष्यात ह्या शिक्षण संस्थेचा मोठा लाभ मिळणार आहे. गावातील तरुण व ग्रामस्थांच्या योगदानातून गावात मोठमोठ्या शिक्षण संस्था कार्यरत असून त्यांचा लाभ आज तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. ह्याच शैक्षणिक संस्थांमध्ये शिकून गावातील अनेक मुलांनी विविध क्षेत्रात प्रगती केलेली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सन १८९३-९४ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. याचा उद्देश लोकांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघटित करणे आणि सामाजिक एकात्मता वाढवणे हा होता. टिळकांनी गणेशोत्सवाला खाजगी घरगुती उत्सवातून एका भव्य सार्वजनिक उत्सवात रूपांतरित केले, ज्यामुळे सर्व सामाजिक स्तरातील लोकांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि राष्ट्रीय अस्मितेची भावना निर्माण झाली. याच विचारधारेतून उदयास आलेल्या देवघर गावातील ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे गावातील वातावरण भक्तिमय व एकसंध ठेवण्यात मोठे योगदान असून त्यामुळे उत्सवाचा खरा उद्देश नक्कीच सफल होत आहे.


वैभव मोहन पाटील 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त