असा किर्ती कुमार न होणे

असा 'कीर्ती' कुमार न होणे
मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी निघालो तोच एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी गावाकडची बातमी कानावर आली. ज्याला त्याच्या लहानपणापासून सोबतीने मोठे होताना पाहत आलो तो माझा चुलतबंधू किर्ती यशवंत भोईर याचे अकाली निधन झाल्याचा तो निरोप होता. गेले कित्येक महिने आजारपणाशी संघर्ष करणाऱ्या किर्तीने अखेर  सर्वांचा निरोप घेतला. अवघ्या पस्तीशीतील किर्तीने अगदीच कमी मात्र सर्वांनाच हेवा वाटावा असे आयुष्य जगले. आज जीवाला जीव लावणारा कुटुंबकबिला आणि पुढ्यात असणारे सुंदर आयुष्य हे सारे अर्धवट सोडून जाणाऱ्या कीर्तीच्या अंतिम यात्रेत धाय मोकलून रडणारी त्याची आई (काकू) आणि कधी न रडणारे मात्र आज आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देणारे त्याचे वडील (यशवंत काका) पाहून मन अत्यंत गहिवरून आले. त्याला आजारातून बरे करण्यासाठी ह्या कुटुंबाने विशेषतः धाकट्या संतोष काकाने अगदी जीवाचे रान केले. जिथे मार्ग सापडेल तिथे त्याच्या उपचारासाठी धाव घेताना मी त्यांना पाहिलंय. मात्र काही घटना ह्या विधिलिखित असतात आणि त्या चुकवता येत नाहीत असे आमचे बाबा म्हणायचे. त्यामुळे आभाळाएव्हढ्या दुःखावर मात करत पुढचे आयुष्य चांगल्या व्यक्तींच्या आठवणीत आणि जिव लावणाऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात जगणे हेच आयुष्याचे खरे गणित आहे. किर्ती हा आमच्या कुटूंबातील एक ऊर्जेचा स्त्रोत होता. दिवसभर स्वतःला अत्यंत व्यस्त ठेवणारा आणि तितक्याच तन्मयतेने सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या किर्तीचा आम्हाला नेहमीच हेवा वाटायचा. दिवसभर लोकांचा राबता असलेल्या भरल्या घरात जन्म घेतलेला किर्ती प्रत्येकाच्या हाकेस 'ओ' द्यायचा. असे म्हणतात दारात पाहुण्यांच्या चपलांचा ढीग असलेले घर सर्वात श्रीमंत समजले जाते, अशा घरास कधीच काही कमी पडत नाही. अशा घरात किर्तीसारख्या मुलाचा जन्म म्हणजे 'सोन्याहून पिवळे' असेच म्हणावे लागेल. सणासुदीला घरातील कार्यात पायात भिंगरी बांधून घरातील कामे करायचा. आपली दुचाकी घेऊन गावात फिरताना अनेक घरासमोर गाडी थांबवून आस्थेने सर्वांची विचारपूस करणाऱ्या किर्तीचा आवाज आता कधीच ऐकू येणार नाही. गावी गेल्यावर दर वेळेस 'कसा आहेस दादा' ही त्याची हाक आता कानावर पडणार नाही. मित्रत्वाच्या नात्याने आपल्या वडिलांशी त्याचा संवाद आता कधीच पाहायला ऐकायला मिळणार नाही. परिवारातील प्रत्येकाच्या कार्यात अगदी घरातील सदस्यासारखा वावरणाऱ्या किर्तीची उणीव कुटुंबात सदैव भासत राहील. त्याच्या जाण्याने केवळ कुटुंबाचाच नाही तर गावाचादेखील एक पिलेर (स्तंभ) आज निखळला आहे. फोटोग्राफीची प्रचंड आवड असलेल्या किर्तीने फोटोग्राफीला आपले करिअर बनवले. कुटुंबातील सर्व लग्नसोहळे आणि कार्यक्रम, कायम कॅमेरा हाती असलेल्या किर्ती विना अपूर्ण वाटायचे. ह्या व्यवसायामुळे त्याने अनेक मित्र, स्नेही कमावले आणि आपला एक वेगळा मित्र परिवार निर्माण केला. कुटुंब, ग्रामस्थ तसेच मित्रमंडळी या प्रत्येकाच्याच मदतीसाठी सतत तत्पर असणाऱ्या किर्तीने वडिलांना शेती कामातदेखील तितक्याच समर्पित भावनेने साथ दिली. आई, वडील, भाऊ लोकेश आणि काका संतोष यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या किर्तीने कुटुंबीय आणि आप्तेष्टांशीदेखील तितकेच दृढ संबंध प्रस्थापित केले. जन्मतः शारीरिक आणि मानसिक सुदृढता लाभलेल्या किर्तीचा एखादा आजार पराभव करू शकेल असे कधीही मनाला वाटले नाही. त्यामुळेच त्याच्या जाण्याच्या अविश्वसनीय बातमीने आज प्रत्येकजण हळहळतोय. आजाराशी झुंज देताना शरीराने पुरता खचलेला मात्र मनाने अखेरपर्यंत तितकाच खंबीर असलेला किर्ती आपण पाहिला. नेहमीचा ताजातवाना, उर्जावान, तरणाबांड, हसतमुख असा किर्ती डोळ्यांसमोर दिसत असल्याने अंतिम समयी शरीराने थकवलेल्या त्याला पाहण्याची इच्छा असूनही धीर मात्र झाला नाही. अखेरच्या घटकातही त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, मनाचा खंबीरपणा आणि दृढनिश्चयी स्वभाव अनेकांना अनुकरणीय असाच होता. किर्ती हा नावाप्रमाणेच किर्तीवंत होता. आज त्याच्या अंत्ययात्रेतील गर्दी याची साक्ष देत होती. प्रत्येकालाच तो आपलासा होता, जवळचा होता. कुणाशी कधी वितुष्ट न घेतलेला किर्ती सर्वांसाठीच हक्काचा होता. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही तरीपण म्हणेन असा 'किर्ती'वंत होणे नाही. आज त्याच्या आठवणींनी त्याचा तो हसरा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही त्यामुळे आठवेल व जमेल तेव्हढे लिहण्याचा प्रयत्न केलाय, यापेक्षा तो कितीतरी उंच होता आणि त्याच्याबद्दल सांगण्यासारख्याही अनेक आठवणी आहेत. मात्र मनातले लिहले नसते तर अपराधीपणाची खंत राहिली असती म्हणून हा प्रपंच. घराचा कर्तासवरता आधार हरपलेल्या कुटुंबियांस हे अभाळाएव्हढे दुःख पचवण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏽.  


*"किर्ती" कुमार*

तुझा हसरा, उर्जावान चेहरा
डोळ्यासमोरून जात नाही
तुझे अकाली सोडून जाणे
मनाला आजही रुचत नाही

सर्वांच्या हाकेला धावणारा
असा साथी मिळणार नाही
'दादा कसा आहेस' ही हाक
आता कानी पडणार नाही

आम्हा सर्वांना हेवा वाटावा
असेच आयुष्य तू जगलास
तुझ्यातला तो 'किर्ती'कुमार
अनेकांच्या मनी तू जपलास

अजाणतेपणीही अशा वयात
देवा, नेऊ नको अकाली कुणा
निरोप देताना किर्तीला आज
जाणवल्या त्या असंख्य वेदना

वैभव

Comments