रेल्वे स्थानके फेरीवाले, गर्दुल्ले व भिकारी मुक्त करा
आज मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानके अनेक प्रकारच्या गुन्हेगारीचाचे अड्डे बनत चालल्याचे चित्र आहे. चैन खेचणे, मोबाईल खेचणे, पाकिटमारी, सामान चोरी, निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री, हेरगिरी, स्टंटबाजी, वेश्यावृत्ती यासारखे अनेक प्रकार राजरोसपणे घडत आहेत. यावर प्रशासन व पोलिसांना फार अंकुश ठेवणे शक्य झालेले नाही हेदेखील खरे आहे. बऱ्याच घटनांमध्ये पीडित प्रवाशी तक्रारी करण्यासाठी पुढे येत नसल्याने गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. वास्तविकता हे गुन्हेगार रेल्वे स्थानक परिसरातच आपला तळ ठेवून असतात. वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये या गुन्हेगारी तळांच्या मुळापर्यंत गेले तर त्यातील खरी बाजू उघड होईल. सर्वच रेल्वे स्थानकांत आज गर्दुल्ले, फेरीवाले, भिकारी यांचा बिनबोभाट व अनधिकृतपणे मुक्त वावर सुरू असतो. खरेतर गुन्हेगारी घटनांचे मूळ हेच आहे. गुन्हे घडवणाऱ्या अनेक टोळ्या स्टेशन परिसरात सक्रिय असतात. या टोळ्या भिकारी, गर्दुल्ले, फेरीवाल्यांना हेरून गुन्ह्यासाठी त्यांचे सहाय्य घेत असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातील ह्या अनधिकृत वावर असणाऱ्या घटकांचा बंदोबस्त केला गेला पाहिजे. गर्दीचा फायदा घेऊन गुन्हे घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या लोकांना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. रेल्वे स्थानकांमध्ये सुरक्षेची मोठी यंत्रणा कार्यान्वित असताना व सीसीटीव्ही कॅमेरेदेखील सर्वत्र असताना सातत्याने फिरत असलेले हे लोक महिनोन्महिने रेल्वे स्थानकांत तळ ठोकून कसे राहू शकतात हादेखील मोठा प्रश्नच आहे. स्टेशन परिसरातील फूट ओव्हर व ओव्हर ब्रिजच्या खालील जागा जर पाहिली तिथे अनेक गर्दुल्ले, फेरीवाले व भिकारी रात्रंदिवस आपले बस्तान बांधून बसलेले असतात. यातील बहुतांशी लोक बाहेरून आलेले असतात ज्यांचा कुठलाही थांगपत्ता कुणालाच नसतो. त्यामुळे गुन्हा केल्यानन्तर जर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला तर शोधणार कसा हाच मोठा सवाल आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांतील फेरीवाले, गर्दुल्ले व भिकारी यांची तपासणी करून त्यांना रेल्वे स्थानकांमधून हद्दपार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे जेणेकरून गुन्हेगारी प्रवृत्तींवर अंकुश येईल व मुंबईकर सुरक्षित रेल्वे प्रवास करू शकतील.

Comments
Post a Comment