डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त
सेवानिवृत्ती सन्मानाची
डॉ. दुर्योधन गोपाजी चव्हाण, आरोग्य सेवेतील आणखी एक धुरंदर अधिकारी नियत वयोमानानुसार २७ वर्षे ३ महिने इतक्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. २६ फेब्रुवारी १९९८ रोजी आरोग्य सेवेत रुजू झालेल्या डॉ चव्हाण यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले. वैद्यकीय अधिकारी, प्राआकेंद्र मंरूळपिर अकोला, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मंरूळपिर, प्राआकेंद्र, कासोळा वाशिम, जिल्हा परिषद वाशिम, जिल्हा प्रशिक्षण पथक वाशिम, बलरामपूर उत्तर प्रदेश, धार मध्य प्रदेश येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून जिप वाशीम येथे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, सहाय्यक संचालक कुष्ठरोग तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून तसेच जिल्हा परिषद अकोला येथे माता बालसंगोपन अधिकारी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक संचालक हिवताप व हत्तीरोग म्हणून तसेच वर्धा व यवतमाळ येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे. आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे राज्यस्तरीय सहाय्यक संचालक मानसिक आरोग्य, आयुष, मुख्यालये व अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, तसेच उपसंचालक नर्सिंग व प्राआकेंद्र ह्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. अत्यंत मनमिळावू, हसतमुख, हजरजबाबी, प्रामाणिक व कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आरोग्य सेवेतील अनेक जबाबदाऱ्या त्यांनी कुठल्याही प्रकारचा डाग लागू न देता अत्यंत प्रामाणिकपणे निभावल्या. स्वच्छता, शिस्त व टापटीपपणा त्यांच्या अंगी असल्यामुळे राज्यस्तरीय अधिकारी म्हणून क्षेत्रीय आरोग्य संस्थांना भेटी देताना तेथील उणिवादेखील ते वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत व त्याची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावादेखील करत. आयुक्तालयातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांशी त्यांचे संबंध नेहमीच सौहार्दाचे राहिले. आपल्या सर्वव्यापी स्वभावामुळे कार्यालयातील ध्वजारोहण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात पुढाकार घेत आपल्या अष्टपैलूत्वाची छाप सोडली आहे. अत्यंत कुटुंबवत्सल असणारे डॉ चव्हाण एक हौशी गायक, कविमनाचे आणि शायरदेखील आहेत हे त्यांनी अनेकदा सिद्ध केले आहे. कार्यालयात सर्वच मजल्यांवर सतत भ्रमंती करून सर्वांशी मिळूनमिसळून वागणारे डॉ चव्हाण यांच्यासारखे अधिकारी तसे दुर्मिळच. त्यामुळे त्यांना कार्यालयातील प्रत्येक विभाग व कर्मचाऱ्यांची इत्यंभूत माहिती असे. त्यामुळेच निवृत्तीच्या काही महिने आधी त्यांच्या चाकोरीबाहेरील आयुष सारख्या विषयाची सोपवलेली जबाबदारीदेखील त्यांनी यथाशक्ती पार पाडली. त्यांच्या सेवानिवृत्तीने आयुक्तालय काही काळ तरी काहीसे सुनेसुने नक्कीच वाटेल पण त्यांनी कुठल्या न कुठल्या भूमिकेत कायम आरोग्य सेवेशी निगडित राहावे अशी मनोमन इच्छा त्यांचेकडे मी बोलून दाखवली. वर्तमानपत्रांत प्रकाशित होणाऱ्या माझ्या लेखांवर नेहमीच व्यक्त होणारे व त्यात सुधारणादेखील सुचवणाऱ्या डॉ चव्हाण सरांचे मोठे योगदान माझ्या कार्यालयीन व व्यक्तिगत आयुष्यातदेखील राहिले आहे. कुठल्याही प्रकारच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असणारे चव्हाण सर नेहमीच आमच्यासाठी सहज उपलब्ध होणारे अधिकारी होते. क्षेत्रीय स्तरावर काम करताना आलेले अनुभव ते नेहमीच आमच्याबरोबर शेअर करत असत. मुख्यालयाची जबाबदारी पेलताना त्यांनी आरोग्य भवनच्या बारीकसारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले व त्यात सुधार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. एकदा कार्यालयातील इतर सहकाऱ्यांच्या निवासस्थान वाटपात उद्भवलेला पेच, स्वतःच्या निवासस्थानाच्या बाबतीत मोठी तडजोड करत त्यांनी सोडवल्याचे मी जवळून पाहिले आहे. यातून त्यांची संवेदनशील व कार्यालयीन हिताय वृत्ती प्रत्ययास आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निरोप समारंभात त्यांनी अनेकदा सुत्रसंचालनाची भूमिका बहारदारपणे निभावली आहे. निवृत्तीच्या निमित्ताने कार्यालयात सपत्नीक उपस्थित राहिलेल्या डॉ चव्हाण सरांना त्यांच्या ह्या सन्मानाच्या सेवानिवृत्तीसाठी सवयीप्रमाणे 'अग्निपंख' पुस्तक भेट देत निरोप दिला. आज त्यांच्या निवृत्तीने आरोग्य सेवेत निर्माण झालेली पोकळी उद्या भरूनही निघेल मात्र 'डॉ. दुर्योधन' हे नाव आम्हा सर्वांच्याच मनात कायम घर करून राहील एव्हढे नक्की.
वैभव
Comments
Post a Comment