अवघे गरजे पंढरपूर....आज आषाढी
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
पंढरपूर. महाराष्ट्रातल्या लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान. पंढरीला गेला नाही असा वारकरी महाराष्ट्रात तरी शोधून सापडणार नाही. आमचं घरही तसं वारकरी संप्रदायातलच. आई, वडील, आजी, आजोबा, सासू सासरे सर्वच विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. दरवर्षी वारी अगदी न चुकवता करतात. मीदेखील खूप लहान असताना म्हणजेच जवळपास पंचवीसेक वर्षांपूर्वी वयाच्या 11व्या वर्षी वारीचा हा अनुभव आजोबांसोबत घेतला. त्यानंतर मनात खूप इच्छा असतानादेखील पांडूरंगाच्या प्रत्यक्ष दर्शनाला जाऊ शकलो नाही. इतक्या वर्षांत लागलेली ही दर्शनाची आस मागील शनिवारी पूर्ण झाली. शुक्रवार 12 एप्रिल रोजी ठाणे येथून मी व माझे चुलते कमळाकर पाटील सहकुटुंब रात्री साडेअकराच्या पंढरपूर फास्ट पॅसेंजर रेल्वेने निघालो. शनिवार 14 तारखेला सकाळी अकराच्या सुमारास पंढरपूर रेल्वे स्थानकात पोहोचलो. शहरातील एका हॉटेलमध्ये रूम भाड्याने घेऊन फ्रेश झालो. दोन वाजता जेवण करून तीनच्या ठोक्याला विठ्ठल रखुमाई मंदिरात पोहोचलो. चैत्र एकादशीनिमित्त मंदिरात भाविकांची थोडी गर्दी होतीच. मात्र मंदिरातील भक्तीपूर्ण वातावरण पाहून मन फार सुखावले. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात अपार श्रद्धा व भक्तिभाव दाटलेला असतो. एकदा दर्शन सुखरूप पार पडले की मन आणि भाव अगदी मोकळे होऊन जातात. आमचीदेखील अवस्था अशीच काहीशी झाली होती. लहानपणी पंढरीच्या वारीला जाण्यासाठी आजोबांकडे हट्ट धरून बसायचो. मात्र वारीची गर्दी व लहानग्यांची जबाबदारी यामुळे बहुतांशी वारकरी मुला नातवंडांना वारीला घेऊन जाण्याचे टाळतात. लाखो वारकऱ्यांची तीच गर्दी व तीच श्रद्धा वर्षानुवर्षे श्री विठ्ठलावर तशीच टिकून आहे हे एक जागतिक आश्चर्य मानले जाते. आषाढी व कार्तिकीला तर भक्तांचा अगदी महापूर पंढरीत येतो. या श्रद्धेमध्ये व भक्तांमध्ये दरवर्षी वाढच होताना दिसत आहे. वर्षभर मंदिरात दर्शनास येणाऱ्या भक्तांची रीघ पहिली तर आपल्या ही गोष्ट लक्षात येते. आजकाल दर्शन व इतर सुविधांचे आरक्षण ऑनलाईन देखील उपलब्ध झाल्याने भक्त मोठया संख्येने वर्षभर येथे गर्दी करतात. वारी व सणवारांशीवाय कमी गर्दीचा दिवस पाहून मी त्या दिवशी कुटुंबासह श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले व विशेष म्हणजे माझ्या सहा वर्षाच्या मुलीला तनिषालादेखील कमी वयातच पांडुरंगाचे दर्शन घडवले याचा विशेष आनंद झाला. मुलीला घेऊन विठ्ठलाच्या अगदी पायावर डोके ठेवून शांतपणे व व्यवस्थित दर्शन घेता आल्याने खूप समाधान वाटले. विठ्ठलाच्या शेजारच्या सभामंडपात असणाऱ्या रखुमाईचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. लाडू प्रसाद, धागे दोरे, पुस्तके व इतर खरेदी करत आम्ही रिक्षाने पंढरपूरपासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या व संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा या ऐतिहासिक स्थळाला संध्याकाळी पाच वाजता भेट दिली. तेथे संत दामाजी पंत, संत चोखा मेळा, संत कान्हो पात्रा यांच्या समाधीच्या दर्शनाने कृतकृत झालो. तेथून निघत आम्ही पुन्हा पंढरपूर येथे पावणेसात वाजता पोहोचलो. पंढरपुर रेल्वे स्टेशन शेजारी वन विभागाने 'तुळशी वृंदावन' नावाचे एक नयनरम्य स्थळ विकसित केले आहे. पंढरपूरच्या पवित्र भूमीत हे निसर्गरम्य स्थळ एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. एके काळी पंढरपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या यमाई तलावाच्या परिसरात वसवण्यात आलेल्या ह्या सुंदर ठिकाणी विठ्ठलाची भव्य दिव्य प्रतिमा विराजमान करण्यात आली आहे. आजूबाजूला अनेक फुलझाडांची, तुळशीची शोभिवंत झाडे लावण्यात आलेली असून याच झाडांमध्ये अनेक संतांच्या मोठमोठया प्रतिमा त्यांच्या महिम्यासह बसवण्यात आलेल्या आहेत. उद्यानाच्या मधोमध पाण्याचे तुषार उडवणारे भले मोठे कारंजे असून सभोवतालच्या भिंतींवर संतचरित्रे रेखाटण्यात आलेली आहे. तुळशी वृंदावन या नावाने नव्याने विकसित करण्यात आलेले हे ठिकाण सकाळ व सायंकाळ पर्यटक भक्तांसाठी नाममात्र प्रवेश दरात उघडण्यात येत असून पंढरीला दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र बनत चालले आहे. विजांचा कडकडाट व अवकाळी पावसाची रिमझिम यामुळे आम्ही साडेसातच्या सुमारास तेथून काढता पाय घेतला व पुन्हा हॉटेलवर परतत रात्रीचे जेवण करून मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी रविवारी आम्ही सकाळी साडेनऊ वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिराशेजारील चंद्रभागा तीर गाठले. चंद्रभागेच्या पवित्र जलाशयात उतरून दर्शन घेतले. चंद्रभागा नदीला इतक्या भर उन्हाळ्यातदेखील भरपूर पाणी असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होती. नदीच्या पात्रात सध्या बोटीने फिरण्याची व्यवस्थादेखील स्थानिकांमार्फत उपलब्ध करण्यात आलेली आहे. नदीकिनारी वाळवंटात असलेल्या भक्त पुंडलिकाचे दर्शन घेत आम्ही सरळ नदीच्या किनारीच दुसऱ्या बाजूने विष्णुपदापर्यंत पोहोचलो. तेथे विष्णू पादुका व जनाबाई मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर समोरच असलेल्या गोपाळपुरात पोहोचलो. गोपाळपूर चढताच समोरच रुख्मिणीचे आई वडील व पांडुरंगाचे सासू सासरे भीमक राजा व सिद्धमती यांच्या मंदिराचे दर्शन होते. तिथे विधिवत दाम्पत्य पूजा केली जाते. त्यानंतर बाजूलाच पाळणा हलवण्याची प्रथा पार पाडून आम्ही गोपाळपुराचा निरोप घेतला. त्यानंतर आम्ही तनपुरे महाराज समाधीस्थळ येथे पोहोचलो. हा मठदेखिल खुप मोठा असून तेथे भक्तांच्या निवासाची तसेच कार्यक्रमासाठी हॉल ची सोय उपलब्ध आहे. नंतर लगेचच आम्ही पंढरीच्या सुप्रसिद्ध कैकाडी महाराजांच्या मठात पोहोचलो. हा मठ म्हणजे निव्वळ महाराजांची समाधीस्थळ नसून तेहतीस कोटी देवांचा माहितीकोष आहे. मठात एकदा प्रवेश केला की पुढचा तास दीड तास अवघे ब्रह्मांड फिरून आल्याची अनुभूती भाविकास येते. अगदी आदिमानवापासून सर्व संत देवांची चरित्रे इथपासून ते संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय याची माहिती सचरित्र देखाव्यांसह इथे पाहायला,वाचायला मिळते. त्यामुळे पंढरपुरात गेल्यानंतर कैकाडी महाराजांचा हा ज्ञान मठ पाहायलाच हवा. दीडच्या सुमारास आम्ही आमची पंढरपूर भ्रमंती समाप्त करत पुन्हा हॉटेलवर पोहोचलो. विठ्ठलाच्या दर्शनाचा परमोच्च आनंद व पंढरपूर, मंगळवेढा येथील विविध ऐतिहासिक स्थळांचा ज्वलंत इतिहास मनात साठवत आम्ही सायंकाळी साडेपाचची मुंबईला जाणारी रेल्वे पकडण्यासाठी पुन्हा रेल्वे स्टेशनवर आलो. गेल्या अनेक वर्षांची विठ्ठलाच्या भेटीची आस पूर्ण झाल्याने आमचा दोन दिवसांच्या प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेला होता. त्यामुळेच पंढरपूरची ही भेट आमच्यासाठी कायम स्मरणात राहील एव्हढे नक्की.
- Get link
- X
- Other Apps




























Amhala pn sangitle nay amhi pn alo asto
ReplyDeleteआषाढी एकादशीच्या शुभेच्छा
ReplyDelete