नवी मुंबईत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

जुहूगावात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा



श्री हनुमंत हे शक्तीचे, भक्तीचे व त्यागाचे रूप समजले जाते. हनुमानासारखा रामभक्त झाला नाही असे इतिहास सांगतो. त्यामुळेच हनुमानाची भक्ती सर्वश्रेष्ठ ठरली, जळी स्थळी काष्टी पाषाणी हनुमानाला प्रभू रामचंद्र व सीतामाई दिसायच्या,म्हणूनच त्याने छाती फाडून या दोघांचे दर्शन सर्वाना दिले होते, हनुमंताची भक्ती व अचाट शक्ती यामुळे एका वनौषधी वनस्पतीसाठी संपूर्ण पर्वतच त्याने उचलून आणला होता, आज सर्वत्र श्रीरामापेक्षा हनुमानाची मंदिरे जगोजागी आपल्यास पहावयास मिळतात हादेखील श्रीरामाचा हनुमानाला मिळालेला आशीर्वादच समजला जातो. निर्मळ भक्तीमुळे हनुमान भक्तश्रेष्ठ ठरले. त्याच्या भक्तीची अनेक उदाहरण रामायणात आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात. आपल्या भक्तांना मदत करण्यासाठी देव सदैवच धावून येत असतो, फक्त त्याच्यावर श्रद्धा असावी लागते. अनेक संकटातून भक्तांना देव चुटकीसरशी बाहेर काढतो, फक्त आपल्याला स्वच्छ भावनेने व निर्मळ मनाने त्याला आळविता आले पाहिजे. श्रद्धेची अनेक उदाहरणे, दाखले आपल्याला कलियुगात देखील पाहायला मिळतात. 

आज हनुमान जयंती. श्री हनुमानाचा जन्मदिवस. खरेतर आध्यत्मिक दृष्टिकोनातून देवाधिकांच्या जन्माचे अनेक पुरावे पुराणात सापडतात. त्याधारेच त्यांची विशिष्ट दिवशी विधिवत पूजाअर्चा समाजात केली जाते. हनुमान जयंतीच्या आजच्या दिवशी सर्वत्र हनुमान भक्तीचा जागर केला जातो. नवी मुंबईतदेखील बेलापूर पासून अगदी दिघ्यापर्यंत सर्वच भागांत पारंपरिक हनुमान मंदिरामधे हनुमान जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. वाशी येथील जुहूगावातील श्री हनुमान जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला. श्री हनुमान मंदिर ट्रस्ट च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2019 या हनुमान जयंतीच्या दिवशी करण्यात आले होते. सकाळी साडेचार ते सहा श्री राम, हनुमान व शनिदेवावर अभिषेक करण्यात आला. त्यांनतर हनुमान जन्मोत्सव मंदिरात साजरा करण्यात आला. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा दरम्यान आळंदी येथील कीर्तनकार हभप जगन्नाथ महाराज म्हस्के यांचे सुश्राव्य कीर्तन व त्यानंतर मरीआई महिला भजन मंडळाच्या वतीने सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम पार पडला. दुपारी बारानंतर सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले होते ज्याचा लाभ जवळपास साडेतीन हजार भाविकांनी घेतला. सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत जुहूगावात हनुमंताच्या पालखी सोहळ्याचे आयोजनदेखील करण्यात आले. या संपूर्ण उत्सवात जुहूगाव ग्रामस्थ व आसपासच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सन 2007 पासून सलग 12 वर्षे या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी भक्तगणांच्या संख्येत भरच पडत असून हनुमंतावरील श्रद्धेपोटी शेकडो भक्त दररोज या ठिकाणी नियमित दर्शनासाठी येत असल्याचे हनुमान मंदिर ट्रस्टचे श्री लालचंद भोईर यांनी सांगितले. भक्तीतून मिळणारी शक्ती व आत्मविश्वास यामुळेच एकविसाव्या शतकात वावरत असतानाही भक्तीचे व श्रद्धेचे महत्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे असे मत भाविकांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जुहूगावातील ग्रामस्थ व तरुण वर्गाने विशेष परिश्रम घेतले. 


वैभव पाटील















Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त