आरोग्यमंथन ७८वे - आला उन्हाळा, तब्येत सांभाळा
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा
सध्या राज्यभर उष्णतेने थैमान घातले आहे. उन्हाने शरीराची लाही लाही होत आहे. हिवाळ्यातील सुसह्य जीवन उन्हाळ्याचे दोन तीन महिने अगदी असह्य होऊन जाते. याच उष्णतेचा आपल्या शरीरावर मात्र विपरीत परिणाम होत असतो हेदेखील दुर्लक्षित करण्यासारखे मुळीच नाही. उष्माघाताने मृत्यू ओढवण्यासारखे प्रकारदेखील दरवर्षी घडतात. उन्हाळा जसजसा वाढत जातो तसे विविध प्रकारचे उष्णतेचे विकार वाढायला सुरुवात होते. खर तर खूप व्यक्तींना मुळातच काही पित्ताचे विकार किंवा तत्सम उष्णतेने वाढणाऱ्या व्याधी किंवा लक्षणे असतात आणि ती वातावरणातील उष्म्याने वाढू लागतात. परंतु उन्हामुळे व्यक्तींना तहान लागणे, शरीराची आग होणे, पोटात आग होणे, घाम येणे, चक्कर येणे, थकवा येणे, पोटऱ्या दुखणे अशी विविध लक्षणे दिसू लागतात. उन्हाळ्यात शरीर व मनाच्या आरोग्याच्या तक्रारी अगदी तापापासून ते थेट नागीण, कांजण्यांपर्यंत दिसू लागतात. खरं तर योग्य आहार नियोजन केल्यास हा त्रास बऱ्यापैकी कमी करता येऊ शकतो. तसेच कपडे, त्यांचे रंग अशा गोष्टींचा वापर नीटपणे केल्यास उन्हाची दाहकता कमी करता येईल. उन्हाळ्यात पिकणारे ताडगोळे, कैरीपासून ते आंब्यापर्यंत, ओले काजू, कुयरी, करवंद, त्यांचे विविध पदार्थ शरीराला अगदी तृप्त करतात. त्यांचे योग्य प्रमाणात सेवन करायला हरकत नाही. पण उन्हाळ्यात पाणी हाच घटक मुळात खूप महत्त्वाचा आहे. अनेक जण पाणी सतत जवळ बाळगतात ज्यायोगेे उन्हाळ्याचे विकार कमी करता येतात. शरीर व त्वचा थंड ठेवण्याचे विशेष काम हे पाणी करते. लघवीचा त्रास कमी करून पोटाचाही त्रास कमी करते. त्यामुळेच उन्हाळ्यात पाण्याच्या सेवनाला खूप महत्त्व आहे. उन्हाळ्यात आग होत असल्यास थंड पाणी, वाळा, चंदन घातलेले पाणी किंवा कापराने सिद्ध केलेले पाणी सेवन केल्यास त्याचा फायदा होतो, तर सारखी तहान लागत असल्यास तांब्याच्या वा चांदीच्या पात्रातील पाणी तसेच नारळाच्या पाण्याने बरे वाटते. या अवस्थेत धने, जिरे टाकून केलेले पाणीही उत्तम गुणकारक ठरते. लघवीला जळजळ होत असल्यासही धने, जिरे, बडीशेप टाकून पाणी प्यावे. मातीच्या भांडय़ातील पाण्यामध्ये नैसर्गिक गुणांची वृद्धी होते. नैसर्गिक शीतलता मिळते. ज्याने कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. माती नंतर तांब्याच्या भांडय़ातील पाणी थंड असून कफनाशन करणारे आहे. उन्हाळ्यात कोणती भाजी खावी हा गहन प्रश्न आपणा सर्वांना पडतो. सामान्यतः घरात उपलब्ध असलेल्या भाज्या तयार केल्या जातात. अंगात आग होत असल्यास किंवा तहान अधिक लागत असल्यास केळफूल व पडवळाची भाजी रुचकर आणि बलप्रद ठरते, तसेच गारवा देते. आग होत असताना तोंडली, दुधीभोपळा, पालक या भाज्या योग्य पद्धतीने केल्यास उपयुक्त ठरतात. मेथी मात्र दोन्ही अवस्थेत अयोग्य असून दाह, तहान तसेच उष्णता वाढवणारी ठरते. डांगर, वांगी, शेवगा या भाज्या शरीराची आग होत असताना टाळाव्यात. शेवग्याची फुले आणि पाने मात्र याला अपवाद ठरतात. उष्णतेमुळे घेरी येत असल्यास पालेभाज्या खाऊ नयेत, तसेच उष्णतेच्या त्रासात कारलीदेखील टाळायला हवीत. कोहळ्याचा मात्र उष्णतेमध्ये खूप प्रमाणात उपयोग होतो, म्हणून भोपळ्याऐवजी कोहळा उष्णतेत सतत खावा. कोहळ्याचे सूप, कोहळ्याचे पराठे, पेठा आदी प्रकारे कोहळा वापरता येतो. ‘कोहळापाक’ हा एक अत्यंत प्रसिद्ध प्रकार बलवर्धक ठरतो. शरीराची आग होत असताना तसेच तहान अधिक लागत असताना काकडी हा उत्तम पदार्थ आहे. काकडीची कोशिंबीर दह्यामुळे वर्ज्य आहे. केवळ काकडी जमल्यास किंचित मिरपूड टाकून घ्यावी. मात्र त्यावर पाणी सेवन करू नये हे ध्यानात असावे. उष्णतेत तहान असताना भगर, साळीचे तांदूळ आणि ज्वारी फायदा करतात. मात्र शरीराची आग होत असल्यास भगर, नाचणी यांचे सेवन करू नये. तांदूळ, साळीच्या लाह्या, सातूचे पीठ सेवन करावे. पित्तामुळे घेरी येत असल्यास मका, मटार, नाचणी वर्ज्य करावेत. फळांमध्ये कैरीचा काही अवस्थेतला अपवाद वगळता सर्व आंबट फळे सेवन करावीत . आवळा हा उष्णता, तहान सर्वामध्ये गुणकारक ठरतो. केळी, द्राक्ष, डाळिंब, कवठ हे सर्व अवस्थांमध्ये तर तहानेमध्ये करवंद उपयोगी ठरतात. नारळाचे पाणी तहान व उष्णतेवर उत्तम औषध आहे. कफाचा त्रास असणाऱ्यांनी त्यात आले टाकून घेतल्यास तर लिंबू टाकल्यास एक अप्रतिम पेय होते. तहान असताना मसाल्यापैकी वेलची, जायफळ गुणकारी ठरतात, परंतु आग होत असताना नव्हे. कोथिंबीर मात्र सर्व ठिकाणी गुणकारक ठरते. तहानेमध्ये टोमॅटो खाऊ नये, तसेच मीठ व मसालेदार पदार्थ हे तहान व आग होत असताना टाळावेत. शरीराची आग होत असताना कांदा-लसूण खाऊ नये. मात्र तहानेमध्ये त्याचा उपयोग होतो. आग होत असताना गाजराचे सेवनही करू नये. शरीराची उष्णता होत असताना वय, प्रकृती व अवस्थेप्रमाणे दूध, तूप, लोण्याचे यथेच्छ सेवन करून आरोग्य प्रस्थापित करता येते. चक्कर, गरगर या त्रासामध्ये गायीचे तूप व लोणीच सेवन करावे. पातळ ताक, धने, जिरे आणि कोथिंबीर यांनी तयार केलेले असेल तर लघवीच्या तक्रारीमध्ये गुणकारक ठरते. शरीरात दाह होत असताना किंवा चक्कर येत असताना गरम पाण्याचे सेवन करू नये. लक्षणे बळावण्याची शक्यता असते. उष्णतेच्या कारणांनी होत असलेल्या सर्व अवस्थांमध्ये मूग, मसूर व हिरव्या मटारचे सेवन केल्यास फायदा होतो. लहान मुले, स्त्रिया, वृद्ध, गर्भवती या सर्वानी हिरव्या मुगाच्या लाडूचे सेवन करावे. त्यामुळे थकवा कमी होतो, बल वाढते. त्वचेला संरक्षण मिळते आणि भूक उत्तम राहण्यास मदत होते. तहानेच्या त्रासामध्ये ओली हळद व आले यांचे सेवन उपयुक्त ठरते. दाह असता खिरीमध्ये खडीसाखर टाकून घ्यावी. खडीसाखरेला कृत्रिम साखरेपेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. बाजारात मिळणारी थंड पेये व उघड्यावरील बर्फातील पेये या काळात टाळणेच उत्तम. कारण ते कृत्रिमरीत्या व असुरक्षित साधनांचा वापर करून तयार केले जात असल्याची शक्यता असल्यामुळे त्यांचा विपरीत परिणाम मानवी शरीरावर होतो. ग्लोबल वार्मिंगचा धोका सर्वच देशांना बसत असून ऱ्हास होत चाललेली वनसम्पदा व जलसंपत्ती याचा थेट परिणाम वाढत्या गर्मीत होत आहे. यामुळेच दरवर्षी उष्णतेच्या लहरी काही प्रमाणात वाढतच चाललेल्या आहेत. या परिस्थितीचा जनजीवनावर होत असलेला विपरीत परिणाम थोपवण्याचे मोठे आव्हान आज आपल्यासमोर असून आपल्या दैनंदिन जीवनपद्धतीचे सुयोग्य नियोजन करून त्यावर काही अंशी मात करता येईल. यामुळेच प्रत्येकाने उष्णतेपासून स्वतःचे रक्षण करून आरोग्य सांभाळण्याचा संकल्प करायला हवा.

Comments
Post a Comment