आरोग्य विभागाच्या वतीने महापुरुषांना मानवंदना
आरोग्य भवनमध्ये संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा
सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील आरोग्य आयुक्तालयाचे मुख्यालय असलेल्या आरोग्य भवन येथे महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात मंगळवार दिनांक २३ एप्रिल २०१९ रोजी साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांची संयुक्त जयंती आज साजरी करण्यात आली. आरोग्य भवनमधील अधिकारी व कर्मचारी वृंदाने या कार्यक्रमात सक्रिय सहभागी होत या महापुरुषांना मानवंदना दिली. देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिलेल्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचा प्रघात सरकारी अस्थापनांमध्ये अनेक वर्षांपासून आहे. त्यानुसार संबंधित तिथी वा तारखेला महापुरुषांना मांवनदना देत अभिवादन करण्याचा उपक्रम आरोग्य विभागातदेखील नियमित राबवण्यात येतो. एप्रिल महिन्यात आलेल्या महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव महाराष्ट्रभरातील अनेक कार्यालयांमध्ये या महिन्यातील एक दिवस धरून मोठया जल्लोषात साजरा केला जातो. या निमित्ताने ह्या असामान्य व्यक्तिमत्वांचे स्मरण तर होतेच मात्र त्यांनी रुजवलेल्या मार्गदर्शक वाटा चोखाळण्याची एक संधी आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळेच दरवर्षी महापुरुषांचे जयंतीचे कार्यक्रम उत्सव स्वरूपात साजरे केले जातात. सरकारी कार्यालयांना घालून दिलेला हा पायंडा त्यामुळेच प्रशंसनीय ठरतो.
आज सकाळपासून आरोग्य भवन इमारतीत जागोजागी महापुरुषांच्या तसबिरी असलेले फलक, मुख्य प्रवेशद्वारावरच काढलेली भव्य रांगोळी, विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेला परिसर व तळमजल्यावरील सभागृहातील खिळवून ठेवणारे नियोजन यामुळे येथील वातावरण एखाद्या महोत्सवापेक्षा कमी नव्हते.
सकाळी बाराच्या सुमारास कार्यक्रमास औपचारीकरित्या सुरुवात झाली. विभागाचे आयुक्त डॉ अनूप कुमार यादव सर, अतिरिक्त अभियान संचालक डॉ सतीश पवार, वित्त संचालक श्री रवींद्र शेळके, सहसंचालक डॉ नितीन आंबडेकर, वित्त सहसंचालक श्री संजय पतंगे, सुप्रसिद्ध गझलनवाज श्री भीमराव पांचाळे, जीवन शिक्षण केंद्र समाज संशोधन केंद्र सोलापूरच्या प्रकल्प संचालक ऍडव्होकेट पल्लविताई रेणके, उपसचिव श्रीमती वर्षा भरोसे, अधीक्षक अभियंता श्री विलास कांबळे, उपसंचालक डॉ घोडके, डॉ चिंचोलीकर, डॉ चव्हाण, माजी संचालक डॉ मोहन जाधव, डॉ अरुण यादव, डॉ खरात, डॉ सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत चारही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रथेप्रमाणे दीप्रज्वलन पार पडले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महोत्सव समितीचे मुख्य आयोजक डॉ बी एस सोनवणे यांनी केले. तद्नंतर पल्लविताई रेणके यांचे अत्यंत वैचारिक मार्गदर्शन उपस्थितांना झाले. एक तासाच्या आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात त्यांनी समाजातील अनेक संवेदनशील विषयांना हात घातला. त्यात स्त्री सक्षमीकरणाचा प्रवास त्यांनी अगदी अलगद उलगडून दाखवला. जयंती साजरी करण्यात येत असलेल्या चारही महापुरुषांचे स्त्री सबलीकरणासाठी व स्त्री शिक्षणासाठी असलेले योगदान त्यांनी सोप्या भाषेत विषद केले. वडिलोपार्जित म्हशीला आपसांत वाटून घेणारी मुलगा व मुलगी या भावंडांचा त्यांनी स्त्री दुर्बलतेच्या जागृतीसाठी सांगितलेला किस्सा विशेष स्मरणात राहील. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व विभागाचे आयुक्त मा डॉ अनूप कुमार यादव सरांनी देखील आपल्या छोटेखानी मनोगतातून सर्वांना जयंती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दुपारी आरोग्य भवन मधील सर्व अधिकारी कर्मचार्यांसाठी भोजनव्यवस्था संयुक्त जयंती आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली होती.
भोजनानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांच्या प्रबोधनपर संगीत गझल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासदेखील मोठया संख्येने कर्मचारीवर्ग उपस्थित होता. पंडित भीमराव पांचाळे यांनी आपल्या सुमधुर आवाजाने व तितक्याच दमदार शेरोशायरी व गझलींनी उपस्थितांचे चांगलेच प्रबोधन करत सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. जवळपास दोन तास चाललेल्या या सुमधुर कार्यक्रमाची सांगता अखेर त्यांनी भैरवीने केली. संगीत कार्यक्रमाची सांगता झाल्यानन्तर त्यातील सहभागी सर्व कलावंताचा यथोचित सन्मान करण्यात आला. जयंती महोत्सवाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ धानके मॅडम यांनी आपल्या विशेष शैलीत बहारदार पणे केले तर आभार प्रदर्शन डॉ बाळासाहेब सोनवणे सर यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतलेल्या आयोजन समितीतील श्री विजय बोरसे, प्रवीण नगराळे, भाऊ सिनलकर, प्रशांत भगत, जी एम लांजेवार, अंजली डांगळे, विजय पोस्तुरे, वैभव पाटील, सुवर्णा मुरंजन, राजेश भांकळ, महेश ठाकूर, तिलोत्तमा कोळी, राजेश आसवले, महेंद्र कदम, ऍड भाग्यश्री रंगारी, दीपक कांबळे, शीतल भागवत या कर्मचाऱ्यांचादेखील सन्मान शेवटी करण्यात आला. कार्यक्रमासाठी आरोग्य भवनमधील सर्व कर्मचाऱ्यांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले असून हा कार्यक्रम विभागात कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतून साजरा करण्यात आला. त्यासाठी योगदान दिलेल्या सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेल्या डॉ बाळासाहेब सोनवणे व श्री विजय बोरसे यांचे या निमित्ताने विशेष कौतुक.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनानिमित्त मनःपूर्वक अभिवादन व जयंती दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा ।।
वैभव पाटील



































खरंच खूप सुंदर कार्यक्रम झाला...व्याख्यान देणाऱ्या पल्लवी ताई यांनी ही खूप छान भाषण दिले...आणि गझल ने तर कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली...आरोग्य विभागातील संयुक्त जयंती ही माझी पहिलीच जयंती जॉब जॉइन केल्यावर...सर्व कर्मचाऱ्यांनी खरंच खूप मेहनत घेतली...
ReplyDeleteExcellent one.
ReplyDeleteNice initiative.Keep it up.
ReplyDelete