सक्षम लोकशाहीसाठी मतदान करा
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक हवी
येत्या 29 तारखेला सोमवारी मुंबई ठाण्यासह राज्यातील बहुतांशी मतदारसंघात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होत आहे. शनिवार, रविवार ला जोडुन आलेल्या मतदानाच्या सुट्टीमुळे मतदानावर परिणाम होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अनेक लोक जोडून मिळालेल्या सुट्ट्यांचे निमित्त साधत बाहेर फिरायला जाणे पसंत करतात. सुशिक्षित मतदारांचा यात अधिक भरणा असतो. त्यामुळे मतदानावर त्याचा विपरीत परिणाम होतो. निवडणूक आयोग व राजकीय पक्ष लोकांना मतदानासाठी कितीही जागृत करण्याचा प्रयत्न करत असले तरी लोक जुमानत नाहीत ही वर्षानुवर्षांची परिस्थिती आहे. त्यामुळे मतदानाची सुट्टी देणाऱ्या आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. लोकशाही सक्षम बनवण्यासाठी मतदान प्रक्रिया अत्यंत महत्वाची असून यात लोकांचा अधिकाधिक व सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. सरकारी कार्यालये व खाजगी आस्थापनांनी मतदानाच्या सुट्टीचा उपभोग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान सक्तीचे करायला हवे. मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या दिवसाची रजा विनावेतन करावी तरच परिस्थिती काही अंशी सुधारेल. तसेच मतदान प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी व लोकसहभाग वाढवण्यासाठी मतदानासाठी आधार क्रमांकाचा वापर करून नागरिकांना आपल्या आधार क्रमांकाद्वारे घरबसल्या किंवा कार्यालयांत बसून मोबाईल, संगणकाद्वारे मतदान करण्याची सेवा उपलब्ध करून देण्याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी एखादे एप्लिकेशन विकसित करता येईल. मतदान प्रक्रिया आता बॅलेट व ईव्हीएमच्या चक्रातून बाहेर काढून खऱ्या अर्थाने डिजिटल करण्याची वेळ आली आहे. यासाठी आधार यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करून घेता येईल. आधार क्रमांकाच्या आधारे मतदान घेतल्यास मयत, दुबार, बोगस मतदानाची शक्यताही मावळेल व निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने राबविता येईल. यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असून आज ना उद्या हा बदल नक्कीच घडेल अशी आशा आहे.

Comments
Post a Comment