नवी मुंबईच्या जडणघडणीतील महत्वाचा दुवा - दैनिक नवे शहर

नवी मुंबईच्या जडणघडणीतील महत्वाचा दुवा - दैनिक नवे शहर

कोणत्याही वृत्तपत्राचा वर्धापन दिन हा त्या वृत्तपत्रपरिवार, वाचक, हितचिंतकांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असते. मुळात वृत्तपत्र चालतात किती व त्यांच्यातील सातत्य किती हाच मोठा प्रश्न असतो. आजच्या सोशल मीडियाच्या जगात वृत्तपत्रासारख्या प्रिंट माध्यमाला थोडी उतरती कळा लागली आहे हे निर्विवाद सत्य आहे. मात्र आजही अनेक वृत्तपत्र समाजात आपला वेगळा ठसा व 'खप' टिकवून आहेत हेही तितकेच सत्य आहे. नवी मुंबईतून गेल्या 25 वर्षांपासून नियमित प्रकाशित होणारे नवे शहर हे त्यातलेच एक म्हणावे लागेल. नवे शहर वृत्तपत्राला पाहता पाहता २५ वर्षे पूर्ण झाली. नवी मुंबईतून नियमित प्रसारित होणाऱ्या ह्या वृत्तपत्राची वाटचाल खरेच खूप गौरवास्पद राहिली आहे. मागील विसेक वर्षांपासून मी या वृत्तपत्राचा नियमित वाचक व अलिकडला लेखक आहे. साप्ताहिकाचे रूपांतर कालांतराने दैनिकात झाले व हे दैनिक आज दररोज ताज्या बातम्या, घडामोडी, ज्वलंत लेख घेऊन वाचकांची भूक भागवत आहे. पेपर स्टॉल्सवर हातोहात खपणारे वृत्तपत्र म्हणून नवे शहरचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. दैनंदिन स्थानिक घडामोडींनी भरलेली सहा पाने, अभ्यासपूर्ण लेख, रंगीत छपाई, टीव्हीवरही न दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांची वास्तवता व स्वागतमूल्य एक रुपयात उपलब्ध होणारे नवी मुंबईतील एकमेव दैनिक म्हणून नवे शहरची कीर्ती आहे. खरेतर इतकी वर्षे एखादे मराठी वृत्तपत्र स्थानिक पातळीवर चालवणे कसरतच आहे. यासाठी या वृत्तपत्राचे मालक कैलाश गिन्दोडिया यांचे कौतुकच करावे लागेल. वृत्तपत्रांच्या कारखानदारीत एखादे वृत्तपत्र सलग पंचवीस वर्षे चालवणे हे एक दिव्यच आहे. मात्र नवे शहर ने हे दिव्य पार तर केलेच पण वृत्तपत्राचे दैनिकात रूपांतर करून पत्रकारीतेतील एक मराठी पाऊल आणखी पुढे टाकले आहे. राज्यभरातील अनेक मराठी वृत्तपत्रांना घरघर लागली असताना नवी मुंबईसारख्या हायटेक शहरात दिमाखात सुरू असणारे वृत्तपत्र म्हणजे नवे शहर. आजकाल दररोज मिळणारी बहुतांशी वृत्तपत्रे आपण उघडून पहिली तर कोणत्या तरी राजकीय पक्षास, विचारास, पंथास, धर्मास किंवा संस्थेस वाहिलेली असल्याचे आढळून येते. मात्र नवे शहर ने टिकवून ठेवलेला निपक्षपतीपणा व प्रामाणिकपणा काबिलेतरीफच आहे. अर्थात याचे संपूर्ण श्रेय या वृत्तपत्राचे मालक कैलाशचंद्र गिदोडिया, संपादक शैलेश जाधव व त्यांच्या टीमला द्यायलाच हवे. गेल्या दोनेक वर्षांपासून मी नवे शहरचे संपादक श्री शैलेश जाधव यांच्या संपर्कात आहे. वृत्तपत्र चालवण्यासाठी व नावारूपास आणण्यासाठी त्यांची सुरू असणारी धडपड आपल्या सहज लक्षात येते. नवोदित लेखकांना संधी देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचे मोठे कसब त्यांच्यात आहे. यामुळेच माझ्यासारख्या वृत्तपत्रलेखकांसाठी 'वाचकांचे मत' हे सदरदेखील त्यांनी सन्मानपूर्वक नवे शहरमध्ये सुरू केले व टिकवून ठेवले आहे. याच वृत्तपत्रातून मला आरोग्य जनजागृती करण्यासाठी एक मोठी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. मी ज्या आरोग्य क्षेत्रात काम करतो त्या विभागासाठी व आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या आरोग्य योजना लोकांपर्यंत विविध माध्यमांद्वारे पोहोचवण्यासाठी सतत धडपडत असतो. नवे शहर मध्ये आरोग्य या विषयावर 'आरोग्यमंथन' मालिका सुरू करण्याची कल्पना व संधी या वृत्तपत्राने मला उपलब्ध करून दिली. ज्या लेखमालिकेची मी केवळ कल्पनाच करत होतो ती दर मंगळवारी प्रसिद्ध होणारी आरोग्यमंथन या सदराची मालिका देखील नुकतीच ७५ लेखांची पर्यायाने ७५ आठवड्यांची झाली असून शतकाकडे वाटचाल करत आहे. विविध आरोग्य उपक्रमांवर नवे शहरमध्ये नियमितपणे, न चुकता, दर आठवड्याला मंगळवारी प्रकाशित होणाऱ्या माझ्या 'आरोग्यमंथन' ने आज पंचाहत्तरी पार केली आहे हादेखील नवे शहराच्या वर्धापन दिनानिमित्त दुग्धशर्करायोग म्हणावा लागेल. नवे शहरच्या वाचकांना रोज स्टॉल वर उपलब्ध होणारे वर्तमानपत्र वेबसाईटवर देखील नियमित उपलब्ध होत असल्याने या वृत्तपत्राचे वाचक सातासमुद्रापार देखील नवे शहर वाचत असतील एव्हढे नक्की. नवे शहर नवी मुंबईच्या जडणघडणीतील एक महत्वाचा दुवा असून सर्व स्तरांतील मान्यवरांनी त्याची वेळोवेळी पुष्टी केलेली आहे. दरवर्षी 1 मे रोजी आपला वर्धापन दिन सोहळा साजरा करत असताना कला, क्रीडा व शिक्षण क्षेत्रांतील विविध गुणवंताना सन्मानाने गौरवण्याची आपली परंपरा नवे शहरने आजही कायम ठेवली आहे ही देखील आणखी एक कौतुकास्पद बाब. समाजातील अनेक असामान्य मात्र दुर्लक्षित घटकांना आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून गौरवण्याची नवे शहरची परंपरा सामाजिक भान जपणारी आहे. नवी मुंबईत दररोज घडणाऱ्या विविध घडामोडींचे सांगोपांग अस्तित्व दाखवणारे व नवी मुंबईचा आरसा बनलेले नवे शहर हे वृत्तपत्र उत्तरोत्तर बहरत जावो व अखंडीतपणे लोकांचे ज्ञानाचे दीप प्रज्वलित करत राहो हीच या निमित्ताने अपेक्षा. वर्धापन दिनानिमित्त नवे शहरच्या संपूर्ण परिवाराला, वाचकांना व हितचिंतकाना शतशत शुभेच्छा!  



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई








Comments

  1. छान वाचनीय लेख. अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्हाला आणि आपलं नवे शहर शी निगडीत सर्व लेखकांना व हितचिंतकांना.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त