मोठे व्हायची स्वप्न जरूर पाहावीत मात्र आधी संस्कारक्षम व्यक्ती व्हा
संस्कारक्षम पिढीसाठी बाल संस्कार शिबिरे उपयुक्त
माझे जन्मगाव असलेल्या पालघर जिल्ह्यातील देवघर गावामधील के जी पाटील विद्यालय येथे 2 मे 2019 पासून भव्य निवासी बाल संस्कार शिबिर सुरू झाले असून या शिबिरात परिसरातील 70 मुले सहभागी झाली आहेत. पंचक्रोशीतील आळंदी येथे अध्यात्मिक शिक्षण घेतलेल्या हरिभक्त पारायण व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांच्या पुढाकाराने तसेच देवघर विभाग शिक्षण प्रसारक ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळ देवघर यांच्या सहयोगाने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ह्या निवासी बाल संस्कार शिबिरास मी ठाणे येथील माझे भावोजी श्री निलेश घोडविंदे यांच्यासह शनिवार दिनांक 11 मे रोजी भेट दिली. ह्या बाल संस्कार शिबिरामुळे गावातील वातावरणदेखील पूर्णपणे अध्यात्मिक व पवित्र झाले असून आजकाल दुर्मिळ होत चाललेले व दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारे बाल संस्कार मुलांवर घालण्यात येत आहेत. यावेळी मी शिबिरातील मुलांशी संवाद साधत त्यांनी आत्मसात केलेल्या अनेक गोष्टी व कला मुलांकडूनच उलगडवल्या. त्यातून शिबिराच्या दहा दिवसांत अनेक मुले पेटी, पखवाज, तबला, श्लोक, हरिपाठ, हनुमान चालीसा, गीतेचा पंधरावा अध्याय इत्यादी विषयांत पारंगत झाल्याचे दिसून आले. मुलांची शिकण्याची व ज्ञान ग्रहण करण्याची तीव्र इच्छा पाहता वाचन, छंद, संगणक, खेळ, व्यायाम, अभ्यास यांसह इतर विषयांवर मुलांना मार्गदर्शन केले. सोबत शिबीर आयोजक मंडळीना धन्यवाद देणारी एक कवितादेखील सादर केली. याप्रसंगी मुलांना संस्कारक्षम पुस्तकांचे वाटपदेखील केले. त्यांनतर 'गुरु' या विषयावर एक निबंध स्पर्धा व निसर्ग किंवा 'बाल संस्कार शिबिरातील मला आवडलेली वस्तू' या विषयावर चित्रकला स्पर्धादेखील घेण्यात आली ज्यात मुलांनी शिबिरात घेतलेले अनेक अनुभव कागदावर रेखाटले. याप्रसंगी मुलांमध्ये खाऊ व चॉकलेटचे वाटपदेखील करण्यात आले. मुले इथे इतकी रुळलीत की त्यांना घरी जावेसेच वाटत नाही व गुरुजनांबद्दलचा त्यांचा प्रचंड आदर त्यांनी निबंधलेखनामध्ये व्यक्त करून दाखवला. त्यामुळे या वर्षीच्या शिबीराची सांगता जरी 22 मे रोजी होणार असली तरी पुढील वर्षीच्या शिबिराची प्रतीक्षा व उत्कंठा शिबिरातील व बाहेरील इतर अनेक मुलांनादेखील लागून राहिली आहे. ग्रामीण भागातील मुलांची बाल संस्कार शिबिरातील प्रगती व त्यांची लेखन-चित्र कला अत्युत्तम करणारी असल्याचे मत याप्रसंगी उपस्थित सर्वांनीच व्यक्त केले. निस्वार्थी भावनेने मुलांना 24 तास त्या ठिकाणी सांभाळणारे, शिकवणारे व त्यांना विविध अध्यात्मिक कलांमध्ये पारंगत करणारे समस्त गुरुजन वर्गाचे मुलांच्या व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले. मुलांनी डॉक्टर, इंजिनीयर, वकील व सरकारी अधिकारी बनण्याची स्वप्ने जरूर पाहावीत मात्र त्याअगोदर त्यांनी चांगला व सुसंस्कारित माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत मनोगतातून व्यक्त केले. आजच्या तंत्रज्ञानाच्या व पुढारलेल्या युगात लहान मुलांवर अध्यात्मिक व पारंपारिक संस्कार करण्याची नितांत गरज असून गावागावात व तालुक्यातालुक्यात भरवली जाणारी ही संस्कार शिबिरे कौटुंबिक स्वास्थ्य व संस्कारक्षम पिढी घडवण्यास अत्यंत उपयुक्त ठरतील असे मत व्यक्त करून मुलांवर दुर्मिळ होत चाललेले संस्कार घालण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या बाल संस्कारासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सर्वांनी जमेल तेव्हढे सहकार्य व योगदान देण्याचे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले.
वैभव












Excellent post
ReplyDeleteखुपचं छान
ReplyDeleteGood work sir
ReplyDeleteGood job sir
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete