महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे दर्शन घडवणारे फेस्टिवल शहरांत व्हावेत
ठाण्यात सोलापूर फेस्टचे आयोजन
प्रत्येक विभागाची निरनिराळी संस्कृती हे महाराष्ट्राचे वेगळेपण मानले जाते. प्रत्येक जिल्हा, विभाग आपापल्या वैशिष्ट्यांसाठी येथे ओळखला जातो. सोलापूर हा जिल्हादेखील अशीच मोठी अध्यात्मिक, सांस्कृतिक, वस्त्र व खाद्य पार्श्वभूमी लाभलेला जिल्हा आहे. याच संस्कृतीचे दर्शन मुंबई ठाण्यातील नागरिकांना घडावे यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे १७,१८,१९ मे २०१९ रोजी हायलँड ग्राउंड ढोकाळी, ठाणे येथे 'सोलापूर फेस्ट 2019' चे करण्यात आले आहे. मी देखील शनिवारी सुट्टीचा मुहूर्त साधत या फेस्टिवलला भेट दिली. दुपारच्या सुमारास उन्हाचा पारा चाळिशीपार गेलेला असल्याने वर्दळ थोडी कमीच होती मात्र आयोजक व स्टॉलधारक यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नव्हता हे विशेष. सोलापुरी संस्कृतीचे व तेथील जीवनपद्धतीचे हुबेहूब दर्शन घडवणारा हा महोत्सव आयोजकांना धन्यवाद द्यावेत असाच भरवण्यात आला आहे. यामध्ये सोलापूरचे वेज नॉनव्हेज जेवण, शेंगांची चटणी, चादरी, मसाले, पापड, असे अनेक अस्सल सोलापूरी पदार्थ प्रदर्शन व विक्रीसाठी मांडण्यात आले आहेत. शिवाय कलात्मक कार्यक्रमात दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ विनोदी कार्यक्रम, लावणी आणि अनुप जलोटा यांची गजल संध्यादेखील आयोजित करण्यात आली. शुक्रवारपासून सुरू झालेल्या ह्या महोत्सवाचे आयोजन, मुंबई ठाणेकरांनी सोलापुरात यावे व तेथील प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊन जिल्ह्याची विविधांगी रूपे समजून घ्यावीत आणि त्या दृष्टीने जिल्ह्यातील पर्यटन वाढावे यासाठी केले गेले आहे. तसेच काम धंद्यानिमित्त बरेचसे सोलापूरवासीय ठाण्यात स्थायिक झाले आहेत मात्र ठाणेकरांनी सोलापुरात विविध क्षेत्रात गुंतवणूक करावी हा उद्देश आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविक दरवर्षी ज्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी न चुकता जातात ते विठ्ठल मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, तुळजाभवानी मंदिर, स्वामी समर्थ मंदिराच्या प्रतिकृती अगदी हुबेहूब महोत्सवात भरवण्यात आल्या आहेत ज्या बघताना पाय खिळवून ठेवतात. बाजूला तयार करण्यात आलेले कलादालनही उत्कृष्ट कलाकृतींचा नमुना आहे. शेजारीच भव्य व्यासपीठ विचारमंच आणि सोलापुरी खाद्यपदार्थांची रेलचेल यामुळे या महोत्सवात वेगळीच रंगत पाहायला मिळते. विविध वस्तूंचे १२० स्टॉल,आर्ट गॅलरी, धार्मिक होम यांसह नवरत्न पुरस्कारांचे वितरणदेखील या महोत्सवात करण्यात आले. सोलापूरची प्रसिद्ध शेंगा चटणी, कडक भाकरी, लांबोटीचा चिवडा, हुग्गी (गव्हाची खीर) अशा खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत, सोलापूरी चादर, सतरंजी, हातमागावरील साड्या अशा वस्तूंची खरेदी करण्याचा आनंद ठाणेकर ‘सोलापूर फेस्ट २०१९’ या महोत्सवाद्वारे घेत आहेत. विविध प्रकारच्या १५० उत्पादनांसह ३०० उद्योजक यामध्ये सहभागी झालेले असल्याने ठाणेकरांना एकाच ठिकाणी अनेक उत्पादने खरेदी करण्याची आणि सोलापूरी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली आहे. सोलापुरातील विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी ‘सोलापूर फेस्ट’चे आयोजन केले जाते. त्यातून सोलापुरातील स्थानिक व्यापाऱ्यांना रोजगार उपलब्ध होतोच आणि सोलापुरातील उत्पादनांना राज्यपातळीवर बाजारपेठही मिळते. यापूर्वी पुणे व नवी मुंबई येथील फेस्टमधून सुमारे पाच कोटींची उलाढाल झाली होती. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासालादेखील चालना मिळाली व आयोजकांचा हुरूपही वाढला. अनेक महिला उद्योजकांना मोठी संधी मिळत असल्याने, स्थानिक पातळीवरील उद्योजकांना प्रोत्साहन मिळत आहे. नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या सोलापूर महोत्सवात दक्षिण सोलापूर तालुक्यातील लक्ष्मी बिराजदार या महिलेने सुमारे पंधरा हजार रुपयाच्या कडक भाकरी विकल्या आणि सोलापूरच्या कडक भाकरीचे ब्रँडिंग केले. जगप्रसिद्ध सोलापूरी चादरही येथे हातोहात संपतात. ग्रामीण शेतकरी, उद्योजकांना चालना देणारे हे महोत्सव नक्कीच लाभदायक ठरतात असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्यासाठी व राज्याच्या कानाकोपर्यातील उत्पादकांना आपले उत्पादन विक्रीसाठी शहरी भागांत भरवले जाणारे हे महोत्सव नक्कीच लाभदायक ठरतील अशी परिस्थिती आहे. मुंबईकर नागरीकांना व त्यांच्या भावी पिढीलादेखील ह्या महोत्सवांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती जवळून पाहण्याची संधी मिळत असल्यामुळे विदर्भ,मराठवाडा, कोकण,पश्चिम महाराष्ट्राच्या विविधांगी रूपांचे दर्शन घडवणारे महोत्सव मुंबई ठाण्यात आयोजित केले गेल्यास नागरिकांसाठी ती एक पर्वणीच ठरेल यात शँका नाही.
वैभव मोहन पाटील
येथेही वाचा - https://www.kiranhegdelive.com/8394/
येथेही वाचा - https://www.kiranhegdelive.com/8394/














Nice
ReplyDeleteSundarleekhan bhau_mi hi kal bhet dili
ReplyDeleteSundarleekhan bhau_mi hi kal bhet dili
ReplyDeleteSundarleekhan bhau_mi hi kal bhet dili
ReplyDelete