अवयवदान श्रेष्ठ दान
दानाकडून कृतज्ञतेकडे जाण्याचा मार्ग - अवयवदान
अवयवदानाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण होत असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येत आहे. त्यामुळे आजच्या डिजिटल युगात परोपकाराची भावना लोकांच्या मनात तग धरून आहे ही बाब नाकारून चालणार नाही. आपल्या घरातील कर्त्या पुरुषाचे अकाली कोमात जाणे कुटुंबातील सर्वांसाठीच दुःखप्रद असते. मात्र अशा अवघड प्रसंगी घरातील कुटुंबियांनी मन घट्ट करीत त्यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतल्याची घटना भिवंडीत मागील आठवड्यात घडली. भिवंडी शहरातील कासार आळी येथील इमारतीत राहणारे स्वतःचा व्यवसाय करणारे कमलेश हस्तीमल जैन हे ४६ वर्षीय गृहस्थ ५ मे रोजी मिरभाईंदर येथे आपल्या मित्रांना भेटण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. रात्री अकरा वाजता माघारी घरी परतत असताना त्यांचा अपघात होऊन दुचाकी वरून पडल्याने ते जखमी होऊन कोमात गेले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना भिवंडीतील ऑर्बिट हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. वैद्यकीय उपचार करणाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना ब्रेन डेथ झाल्याचे जाहीर केले. या घटनेनंतर दुःखाचा डोंगर कुटुंबियांवर कोसळला असताना कमलेश जैन यांचे वडील हस्तीमल जैन यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयास पत्नी आणि मुले यांनी सुध्दा साथ दिली. परंतु भिवंडी शहरात अवयव दान करण्याबाबत मान्यताप्राप्त रुग्णालय नसल्याने ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात संपर्क साधण्यात आला. तेथील वैद्यकीय पथक भिवंडीच्या रुग्णालयात दाखल झाले. कमलेश जैन यांना ९ मे रोजी ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी विविध वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या शरीरातील किडनी, लिव्हर, स्वादुपिंड, त्वचा आणि डोळे हे अवयव दान करण्यात आले असून गरजवंत रुग्णांना त्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. कमलेश जैन यांच्या अवयव दानाने किमान तीन जणांचे प्राण वाचू शकणार असून त्याच्या डोळ्याने एक दृष्टिहीन जग पाहू शकणार आहे. त्यामुळे कमलेशच्या स्मृती चिरंतर राहणार आहेत. अशीच एक घटना मार्च महिन्यात वाशी येथे घडली. ५९ वर्षांच्या एका महिलेला नवी मुंबईच्या वाशीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर तपासणीत त्यांचं ब्रेन हॅमरेज झाल्याचं निदान झालं. अखेर डॉक्टरांनी त्या महिलेला ब्रेनडेड घोषित केलं. या महिलेच्या कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला आणि कुटुंबाच्या परवानगीनुसार या महिलेचं यकृत, किडनी, तसंच डोळे आणि हाडं दान करण्यात आली. यकृत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. एक किडनी अपोलो हॉस्पिटलमध्ये तर दुसरी किडनी ज्युपिटर हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आली. डोळे लक्ष्मी आय बँकेत आणि हाडं टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये दान करण्यात आलं आहे. अशीच एक अवयवदानाची घटना मुंबईतील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यातच घडली. एका ४६ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे रूग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. कुटुंबाचं अवयवदानासंदर्भात समुपदेशन केल्यानंतर त्यांनी अवयवदानाला परवानगी दिली. या अवयवदानामुळे इतरांना जीवनदान मिळाले आहे. त्याचप्रमाणे बीडमधील एका १७ वर्षांच्या मुलाचा अपघात झाला होता. नवी मुंबई, वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मुलाला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर त्याच्या पालकांनी अवयवदानाला परवानगी दिली. मुलाच्या कुटुंबाच्या परवानगीनुसार मुलाचे यकृत, दोन्ही किडनी, फुफ्फुस हे अवयव तसेच त्वचा आणि दोन्ही डोळेही दान करण्यात आले. त्या मुलाच्या अवयवदानामुळे ४ जणांना जीवनदान मिळाले आहे. एक किडनी हिरानंदानी हॉस्पिटलमधील ४६ वर्षीय महिलेला देण्यात आली, तर इतर अवयवही गरजूंवर प्रत्यारोपित करण्यात आले आहेत. विविध कारणांनी अवयव निकामी झाल्याने एकेका अवयवासाठी अनेक दिवस वाट बघत आयुष्य काढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे जी वस्तुस्थिती आहे. खरेतर मरणोत्तर अवयवदानाबद्दल बऱ्याच रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पुरेशी माहितीच नसते. त्यामुळे याबाबतची जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. अवयवदानासारखे दान जगात दुसरे कुठले नसून एखाद्या व्यक्तीच्या मरणानंतर त्याने दान केलेल्या अवयवदानातून अनेकांचे प्राण वाचवता येतात. कुणी जन्मताच अवयवरहित असतो, कुणाच्या अपघातात अवयव निकामी होतात, कुणाचे अवयव अचानक निकामी होतात, त्यांना वेळीच अवयव मिळाले नाही तर त्यांचे आयुष्य संपते. आयुष्याच्या प्रवासातील त्यांचे जगणे थांबून जाते. अशा वेळी ह्या अवयवांचे महत्व खूप वाढते. त्यांना एखाद्या अवयवदात्याचे अवयव प्राप्त झाले, त्याचे प्रत्यारोपण झाले तर त्याला नवे जीवन मिळू शकते, त्याचा जीवनप्रवास पुन्हा त्याच आनंदाने सुरू होतो, अवयव दात्याला देखील त्याच्या अवयवांच्या दानातून दुसऱ्या माणसाच्या शरीराच्या माध्यमातून जिवंत राहता येते. अवयवदानासारखे सुख इतर कशात नाही. मात्र आपल्या देशात अवयवदायाबाबत फारशी जागृती नाही. इतर देशांत म्हणजेच आॅस्ट्रेलिया, स्पेन, अमेरिकेसारख्या देशांनी अवयवदान चळवळीचे महत्त्व पूर्वीच ओळखले. यासाठी वैद्यकीय, शासन व सर्वसामान्य जनता अशा तिन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडवून आणली. त्यामुळे आज परदेशांत अवयवदानातून हजारो लोकांचे प्राण वाचत आहेत. भारतात अवयवदानाचा टक्का मात्र प्रति १० लाख लोकांमागे केवळ ‘३४’ टक्के आहे. अलीकडच्या काळात हा टक्का थोडाफार वाढल्याचे दिसून आले आहे मात्र त्याची टक्केवारी अधिक नाही हेदेखील तितकेच खरे आहे. माणूस आपले अवयव निर्माण करु नाही मात्र हेच अवयव तो दान करु शकतो. मृत्यूला रोखण्याची ताकद या अवयवदानात आहे. कायदयानुसार मानवी अवयवांची विक्री करता येत नाही मात्र त्यांचे दान करता येते. अवयवदानानंतर मिळालेल्या अवयवाचे व्यवस्थीत प्रत्यारोपण व्हावे व त्यादरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून शासनाने त्यासाठी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आणला आहे. सन १९९४ साली 'मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा' आपल्या देशात अस्तित्वात आला व अवयव प्रत्यारोपणास कायदेशिर मान्यता मिळाली. अवयवदान जिवंतपणी आणि मृत्यूनंतरदेखील करता येते. जिवंत असताना एक मूत्रपिंड (किडणी), यकृताचा (लिव्हरचा), आतडयाचा, स्वादुपिंड व फुफुसाचा काही भाग आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना सरकारची परवानगी काढून कायदयाने दान देता येतो. रक्ताच्या नातेवाईंकांत सुधारीत कायदयानुसार आई-वडील, भाऊ–बहिण, मुलगा-मुलगी, पती-पत्नी, आजी- आजोबा, नातवंडे यांचा समावेश होतो. माणसाच्या मृत्यूनंतर ह्रदय क्रिया बंद पडते व त्यानंतर सर्व अवयव दान करण्यासाठी निकामी होतात. केवळ नेत्र, त्वचा, अस्थी (हाडे) इत्यादी मरणानंतर ४ ते ५ तासांच्या कालावधीत दान करता येऊ शकतात. गंभीर जळालेल्या व्यक्तीचे प्राण त्वचेच्या दानाने वाचवता येतात तर नेत्रदानाने अंध व्यक्तीस दृष्टी प्रदान करता येते. त्यामुळे अवयवदानातून वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती शक्य आहे ज्यायोगे अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. या दानातून कृतज्ञतेकडे जाण्याचा मार्ग म्हणजे अवयवदान. अलिकडल्या काही उदाहरणांवरून मरणोत्तर अवयवदानाबद्दल लोकांच्या मनात काही प्रमाणात जागृती होताना दिसत असून त्यामुळे समाजात संवेदनशीलता वाढत असल्याची बाब नक्कीच समाधानकारक आहे.


Comments
Post a Comment