एक्झिट पोलने उत्कंठता संपुष्टात





देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आणि आता सर्वांना वेध लागलेत ते निकालाचे. येत्या 23 तारखेला ही प्रतीक्षा संपणार आहे आणि मतपेटीत बंद झालेली गुपिते उघड होणार आहेत. यंदा चोहूबाजूंनी लागलेला प्रचाराचा जोर पाहता साशंकतेमुळे राजकीय पक्ष मात्र भलतीच चुप्पी साधून आहेत. स्थानिक राजकीय पक्षांना तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चिंताच जास्त भेडसावत आहे. लोकसभा निवडणुकीकडे ते केवळ वजन चाचपण्याची रंगीत तालीम म्हणूनच पाहत आहेत. असो, निकाल यायला अजून अवधी आहे मात्र टीव्ही चॅनेल्सवाल्यांनी मात्र आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. अनेक चॅनेल्सचे एक्झिट पोलचे आकडेदेखील बाहेर आलेले आहेत. खरेतर हे एक्झिटवाले जिंकणाऱ्या उमेदवारांचे आकडे शोधून लोकांना कशाचा आधारे दाखवतात हे एकदा तपासून पाहायला हवे. लोकशाहीत मतदान हे गुप्त पद्धतीने होत असताना कुठला उमेदवार जिंकणार हे एखाद्या सर्वेतून निष्पन्न होत असेल राजकीय पक्षांनीही असे सर्व्हे करूनच निवडणुका लढवल्यास त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. एक्झिट पोलच्या आधारे कुठला उमेदवार वा पक्ष जिंकणार हे तर्क लावले जात असल्याने निवडणूक आकड्यांवर सट्टेबाजीदेखिल चालत असण्याची दाट शक्यता आहे. आघाडीवर राहणारा पक्ष अर्थातच या एक्झिट पोलचे समर्थन करतो व पिछाडीवर राहणारा मतमोजणीची वाट पाहतो. अनेकांना हिरमुसवणारे एक्झिट पोलचे निकाल बऱ्याच अंशी खरे ठरत असल्यामुळे मतमोजणीच्या आधीच पराभव मान्य करणारेदेखील बरेच असतात. एक्झिट पोलमधूनच लोकसभा निवडणुकीचा बराचसा निकाल बाहेर आल्याने मतमोजणीनंतरच्या गणितांनादेखील उधाण आले आहे. ह्या एक्झिट पोलने मतमोजणीपर्यंतची उत्कंठता मात्र संपुष्टात आणली आहे. निकाल काय लागणार याची कल्पना या पोलवर विश्वास असणाऱ्या सर्वांना आली आहे. त्यामुळे निकाल काहीही लागो, विजय अखेर आकड्यांच्या जवळपास पोहोचलेल्या एक्झिट पोलवाल्या चॅनेलवाल्यांचाच होणार एव्हढे नक्की.


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त