नक्षली भाग एकदा भारतीय लष्कराच्या ताब्यात द्या

नक्षलवादाचे समूळ उच्चाटन गरजेचे

पुलवामा हल्ल्यानंतर देशाच्या जवानांवर सर्वात भीषण हल्ला १ मे या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातीलच गडचिरोली जिल्ह्यात झाला. गडचिरोलीतील जांभुरखेडा परिसरात नक्षलींनी भुसुरुंगस्फोट घडवत 15 जवानांचा बळी घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही अत्यंत दुर्दैवी घटना असून तिचा निषेध करावा तितका थोडा आहे. बुधवारी राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना गडचिरोलीसह संपूर्ण महाराष्ट्र नक्षलवाद्यांनी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास घडवलेल्या भीषण भूसुरुंग स्फोटाने हादरला. या स्फोटात क्विक रिस्पॉन्स टीमचे (शीघ्र कृती दल) 15 जवान शहीद आणि एक वाहनचालक ठार झाला. जवानांच्या या प्रवासाची कुणाला कुणकुण लागू नये म्हणून ज्या खाजगी वाहनाने जवान प्रवास करत होते त्या वाहनांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. या घटनेपूर्वी सोमवारी मध्यरात्री कुरखेडाजवळ नक्षलवाद्यांनी 30 वाहने पेटवून दिली होती. म्हणजेच नक्षलवादी हल्ल्याच्या पूर्ण तयारीत व मानसिकतेत होते हे स्पष्ट होते. तरीदेखील गुप्तचर यंत्रणेला याची कुणकुण न लागणे अनाकलनीय आहे. लोकसभा निवडणुकीत नक्षलवाद्यांनी दिलेल्या धमक्यांना जराही भीक न घालता गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्यामुळे नक्षलवाद्यांनी जाळपोळ आणि भुसुरुंग स्फोट घडवल्याचा प्राथमिक संशय आहे. नक्षलवादी सातत्याने या भागात शासनाविरोधी मजकूर लिहीलेले बॅनर फडकवत असतात. यात त्यांना स्थानिकही सहकार्य करत असण्याची शक्यता आहे. असे असताना सरकार त्यांच्याविरोधात कठोर भूमिका का घेत नाही हा एक गहन प्रश्न आहे. एकीकडे देश दहशतवादाशी निकराची लढाई लढत असताना देशातच पोसला जात असलेला हा दहशतवाद किती महागात पडू शकतो हे बुधवारच्या घटनेत स्पष्ट झाले आहे. नक्षलवादी कारवाया जर सर्वसामान्य व जवानांच्या जीवावर बेतणाऱ्या ठरत असतील आपण त्यांचा कायमचा बिमोड करण्यासाठी वाट कसली पाहतोय हाही एक प्रश्न आहेच. आपल्या रक्षणासाठी झिजणाऱ्या पोलीस व जवानांचा जीव इतका स्वस्त आहे का? दुसऱ्या देशातील अतिरेक्यांचे तळ शोधून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आपल्या लष्कराला आपल्याच देशातील नक्षलींचे तळ शोधून ते उध्वस्त करणे शक्य नाही का? मात्र यासाठी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. देशातील सर्व नक्षली भाग एकदा आपल्या लष्कराच्या ताब्यात द्या. तरच देशांतर्गत पोसला जात असलेला हा दहशतवाद नाहीसा होईल. सातत्याने नरबळी घेणारा व शासनाचे करोडोंचे नुकसान करणारा हा नक्षलवाद काय कामाचा?  

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त