स्वाईन फ्लू - प्रतिबंधात्मक काळजी हाच उपाय
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
स्वाईन फ्लू
स्वाईन फ्लू या आजाराविषयी आपण सर्वांनी ऐकले असेलच. या आजााराच्या भितीने काही वर्षांपूर्वी राज्यात थैमान घातले होते. त्यामुळे या आजाराविषयी आपल्या सर्वांच्याच मनात एक विशिष्ट प्रकारची भिती आहे. स्वाईन फ्लू हा आजार हवेवाटे पसरणारा आजार आहे. हा आजार सन २००९ मध्ये साथ स्वरुपात संपूर्ण देश भरात पोहोचला. हिवाळा व पावसाळयात या आजाराची लागण होण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. या आजारास इंन्फलूएंझा ए.एच १ एन १ म्हणून ओळखले जाते. इंन्फलूऐझा हा आरएनए प्रकारचा विषाणू असून तो जनुकीय दृष्टया अत्यंत लवचिक आहे. इन्फल्युएंझा हा आजार कोणत्याही वयोगटातील स्ञी पुरुषास होऊ शकतो. विशेषतः ५ वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील प्रौढ व्यक्ती, पूर्वीचे दमा, हदयाचे आजार, मूञपिंडाचे विकार, मधुमेह, यकृताचे विकार, रक्त अथवा चेतासंस्थेचे विकार यासारखे जुनाट आजार असलेल्या व्यक्ती, औषधे व आजारामुळे प्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्ती, गरोदर माता, स्थूल व्यक्ती इत्यादी व्यक्ती इन्फल्यूएंझा लागणीच्या बाबतीत अतिजोखमीच्या आहेत. समशितोष्ण कटिबंधात हा आजार मुख्यत्वे हिवाळ्यात व पावसाळ्यात आढळतो. भारतासारख्या संमिश्र हवामानाच्या देशात या आजाराचे रुग्ण वर्षभर आढळतात. हा आजार हवेव्दारे पसरत पसरत असल्याने गर्दी, सामाजिक सोहळे, सभा, जत्रा, गर्दीचा बाजार या ठिकाणी या आजाराच्या प्रसारास मदत होते. शाळा, वसतिगृहे अशा ठिकाणीही हा आजार वेगाने पसरतो. इन्फल्युएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार असून तो मुख्यत्वे हवेवाटे पसरतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्या - खोकण्यातून उडणा-या थेंबावाटे या आजाराचे विषाणू एका रुग्णापासून इतर निरोगी व्यक्तीकडे पसरतात. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा ही या आजााराची मुख्य लक्षणे आहेत. लहान मुलांमध्ये उलटी व जुलाब ही लक्षणे आढळतात. आर.टी.पी.सी.आर.पध्दतीने या आजाराचे निदान करता येते. या साठी रूग्णाच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात येतो. या आजारावर ऑसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे गुणकारी आहेत. इन्फल्युएंझा करिता इंजेक्शनव्दारे दयावयाची (Killed Vaccine) आणि नेसल स्प्रे स्वरुपातील (Live attenuated Vaccine) लस उपलब्ध आहे. गंभीर स्वाईन फल्यू रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि अवैद्यकीय कर्मचारी, इन्फल्युएंझा संसर्गाकरिता अतिजोखमीच्या व्यक्तींनी इंन्फलूएंझा लस घेणे फायदयाचे आहे. आजारपणाची लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांशी संपर्क करुन त्यांच्या मार्गदर्शनानुसार लस घेण्यात यावी. इन्फल्युएंझा ए एच१ एन १ टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवत राहिले पाहिजे, पौष्टिक आहार घ्यायला पाहिजे, लिंबु, आवळा, मोसंबी, संञी, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर केला पाहिजे, धुम्रपान टाळा, पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे व भरपूर पाणी प्यायला हवे. इफ्लूएंझा ए एच १ एन १ टाळण्याकरता वारंवार हस्तांदोलन टाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका. आपल्याला फल्यू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी अजिबात जाऊ नका. शासकीय पातळीवर आरोग्य विभागामार्फत अनेक योजना या आजाराच्या नियंत्रणासाठी राबविण्यात येत असुन या आजाराच्या बाबतीत आरोग्य यंत्रणा सतत सतर्क असतात. फ्ल्यू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण, तपासणी व उपचार सुविधा, प्रयोगशाळा निदान सुविधा, फ्ल्यू विरोधी औषधांचा पुरेसा पुरवठा, खाजगी रुग्णालयांशी समन्वय, डॉक्टर्स व इतर कर्मचा-यांचे प्रशिक्षण तसेच आरोग्य शिक्षण या बाबी स्वाईन फलू नियंत्रणासाठी विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहेत.
तीव्र ताप, खोकला व सर्दी असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. शिंका व खोकल्यावाटे निघणाऱ्या घशातील स्रावाच्या फवाऱ्यातून याचे विषाणू पसरत असल्यामुळे खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करावा जेणेकरून विषाणू अधिक प्रमाणात पसरणार नाहीत. फ्लूची बाधा झालेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. काही वेळेस डेंग्यू, हिवताप, विषमज्वर यांची लक्षणे आणि स्वाइन फ्लूची लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ततपासणी करून आजाराचे अचूक निदान करावे. रुग्णांनी घरी आराम करणे, पथ्ये पाळणे, पोषक आहार घेणे, दगदग टाळणे, पुरेशी झोप घेणे उत्तम ! घरातील व्यक्तीला फ्लूचे निदान झाल्यास नातेवाईकांनी घाबरून न जातात्या व्यक्तीची योग्य काळजी घ्यावी. तसेच घरातील अन्य व्यक्तीला फ्लूची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार सुरू करावेत. फ्लूची लक्षणे असलेल्या रुग्णांचे लाक्षणिक निदान करून डॉक्टरांकडून त्वरित उपचार करणे रुग्णांच्या दृष्टीने हिताचे असते. या आजारावर टॅमिफ्लू नावाचे औषध उपलब्ध असून ते सरकारी आणि खासगी तसेच महापालिका दवाखान्यात उपलब्ध आहे. गंभीर व गुंतागुंतीच्या आजारांमध्ये रुग्ण दवाखान्यात दाखल असल्यास ‘एच१ एन१’ आणि आरटीपीसीआर नावाची घशातील द्रवाची तपासणी करून स्वाइन फ्लूचे निदान करता येते. वेळेेत निदान आणि उपचार केल्याने यातून पूर्णपणे बरे होता येते. काही विशिष्ट रुग्णांना फ्लूची बाधा झाल्यास गुंतागुंत संभवते. फ्लूची लागण होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींना ही लस महापालिकेच्या दवाखान्यात दिली जाते. फ्लूचा धोका टाळण्यासाठी खासगी किंवा सरकारी रुग्णालयातून ही लस घेणे महत्त्वाचे आहे. प्रतिबंधात्मक काळजी घेणे हाच उपाय या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी महत्वाचा आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps




Comments
Post a Comment