नवी मुंबईतील धार्मिक स्थळे
बऱ्याच वर्षांपूर्वी सिडकोने पनवेल ते दिघा ह्या पट्ट्यातील सर्व गावांमधील भूमीधारकांच्या जमिनी अधिग्रहित केल्या व एक सुनियोजित शहर बसविण्याचे काम सुरु झाले ज्याचे नाव नवी मुंबई. सिडकोच्या ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या ते झाले प्रकल्पग्रस्त. मूळ गावांचे नोड झाले व हे नोंड सेक्टरमध्ये विभागले गेले. ज्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या त्या प्रकल्पग्रस्तांना ह्या नोंडमध्ये अधिग्रहित जमिनीच्या साडेबारा टक्के भूखंड वाटप करण्यात आले जी प्रक्रिया सिडको कार्यालयामध्ये आजवर सुरु आहे. खरेतर अनेक भूधारकांमध्ये वाटप झालेल्या जमिनी विकसित करण्याची क्षमता नसल्याने विकासक बिल्डरांनी असे भूखंड विकसित करून प्रकल्पग्रस्तांना त्यांचा हिस्सा देऊन 'नामानिराळे' केले. मात्र प्रत्येक नोंडमध्ये प्रकल्पग्रस्तांची पिढीजात घरे कायम राहिल्यामुळे हि गावठाने आजतागायत या ठिकाणच्या मूळ भूमीपुत्रांच्या अस्तित्वाची निशाणी राखून आहे. हि घरे पुढे प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे म्हणून ओळखली जाऊ लागली.
नवी मुंबई अस्तित्वात येण्याअगोदर येथिल शेतकरी व आताचे प्रकल्पग्रस्त पारंपरिक शेती करत असत. ह्या शेतीचे पालनपोषण, रक्षण व उन्नतीसाठी अनेक देवदेवातांवर शेतकरी अढळ निष्ठा व श्रद्धा ठेवत असत ज्यांना कुळदेव, गावदेव अशी नावे जी आजदेखील राज्याच्या अनेक भागात अस्तित्वात आहेत. अशा देवदेवतांची प्रतिष्ठापना शेतकरी कुळानुसार शेतात व माळरानात करत असत. सिडकोने जमीन अधिग्रहित केल्यानंतर अशी अनेक श्रद्धास्थाने लुप्त पावली. नवी मुंबई बसल्यानंतर गावठाणांमध्ये राहणाऱ्या मूळ भूमिपुत्रांना आपल्या श्रधास्थानांची निकड प्रकर्षाने जाणवू लागली व मग त्यांनी जागा मिळेल तेथे मंदिरे, धर्मस्थळे स्थापित केली. नवी मुंबईमध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर सिडकोने विकासाची जबाबदारी महानगरपालिकेवर सोपविली. त्यानंतर नवी मुंबईतील अशी अनेक धर्मस्थळे जमिनीच्या कागदपत्रांअभावी ट्रस्ट वा प्रकल्पग्रस्तांना स्वमालकीची सिद्ध न करता आल्याने पालिकेने अनधिकृत ठरविली व कारवाईचे सत्र सुरू केले जे आजवर जोमाने सुरु आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिसर आज विकासाच्या सर्वोच्च टप्प्यावर असूनदेखील रहिवाशी संकुलांमध्ये अनेक अनधिकृत बांधकामे उघड झाली आहेत व अनेक ठिकाणी सुरु आहेत ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. अनेक अनधिकृत बांधकामाना नोटीसा देण्यात आल्यात, अनेक निष्कासीत करण्यात आलीत तर काहींची पडताळणी सुरु आहे. अशात प्रकल्पग्रस्तांच्या धार्मिक स्थळांचीदेखील झाडाझडती सुरु आहे, बहुतेकांना नोटीस बजावल्यात तर काही रात्री अपरात्री कारवाई करून तोडली जात आहेत. ह्या कारणामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत्त आहे. पूर्वी साध्या पद्धतीची मंदिरे आज ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून प्रशस्त केली आहेत. त्यांच्या श्रद्धेचा प्रश्न असल्याने व सार्वजनिक धार्मिक विधींसाठी त्यांच्याकडे अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांच्या भावना ह्या देवस्थळांशी कमालीच्या जुळल्या आहेत. त्यामुळे रहिवाशी अतिक्रमानांना हटविण्यासाठी फारसा न होणारा विरोध महानगरपालिकेला धार्मिक स्थळांच्या बाबतीत सहन करावा लागत आहे. नुकतेच कोपरखैरणे नोड मधील एक मंदिर मध्यरात्रीनंतर निष्कासीत करण्यात आले तर जुहूगाव मधील हनुमान मंदिराच्या निष्कसनाची बातमी पसरल्याने रात्रभर मंदिर परिसरामध्ये ग्रामस्थांचा जमाव व तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी समजूत घातल्यानंतर हा जमाव शांत झाला.
खरेतर प्रकल्पग्रस्तांना गरजेपोटी घरे बांधावयास दिलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून स्थापित असलेल्या पारंपरिक श्रद्धेशी निगडित ह्या देवस्थळांचेदेखील सर्वानुषंगाने एकदा सर्वेक्षण झाले पाहिजे व त्यांना नियमित वा स्थलांतरित करण्याच्या अनुषंगाने विचार झाला पाहिजे असे वाटते. इथे प्रश्न श्रद्धेशी, धर्मभावानेशी,लोकभावनेशी व जमिनीच्या मूळ ताबेदारांशी निगडित असल्याने संवेदनशीलपणे हाताळला गेला पाहिजे यामागे असंतोषाचे रूपांतर विस्फोटात होऊ नये अशी भावना आहे. ह्या देवस्थळांचे सर्व बाजूने म्हणजे वाहतूक, रहदारीला अडथळा, रहिवाशांना त्रास होत नाही ना, व्यावसायिक दृष्टिकोन नाही ना, कायद्याचे व सुव्यवस्थेचे उल्लंघन होत नाही ना, लोकांच्या तक्रारी आहेत का अशा अनुषंगाने सर्वेक्षण झाले पाहिजे. जुहूगावमधील हनुमान मंदिर हे केवळ खाडीकिनारी असलेल्या ट्री बेल्ट मध्ये येत असल्याने पालिकेच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली. पण ट्रस्टीने मंदिर परिसर विविध झाडे, अद्ययावत सामग्रीसह उत्तम प्रकारे सुशोभित केलेला आहे त्यामुळे ह्या ट्री बेल्टमधील इतर परीसरापेक्षा मंदिर परिसर निश्चितच शोभानिय व सुंदर दिसतो. त्यामुळे केवळ ट्री बेल्ट मध्ये असल्याने या देवस्थळावर निष्कसनाची कारवाई होत असेल तर त्याचा पुनर्विचार करण्याची अपेक्षा येथे दर्शनासाठी येणारे हजारो भाविक व्यक्त करतात.
एकंदरीत एवढेच कि देवस्थळांबरोबर जनतेच्या धार्मिक भावना जुळलेल्या असतात. व्यक्तिगत अतिक्रमणे व देवस्थळांची अतिक्रमणे यांच्यावरील कारवाईत तफावत असली पाहिजे. नवीन धार्मिक स्थळांची अनधिकृतपणे कुठे निर्मिती व विस्तार होत असेल ते पालिकेने रोखले पाहिजे. व्यक्तिगत अतिक्रमणे नियमित करणे वा त्यांना संरक्षण देणे कठीण असले तरी पारंपरिक धार्मिक स्थळांचा महानगरपालिकेने पुनर्विचार करावा. शक्य असेल तर त्याच्यासाठी समाजातील सुजाण घटकांचा समावेश करून पुनर्मूल्यांकन समिती गठीत करावी, पात्रतेचे निकष सर्वंकष विचार करून सुधारित करावेत व सर्व बाजूने विचार करून सदर देवस्थान नियमित करण्याचा वा इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घ्यावा. पात्रतेच्या अनेक निकषांचा भंग होत असेल तर ह्याच समितीच्या माध्यमातून संबंधीत ट्रस्ट व लोकांना विचारात घेऊन निष्कसनाचा निर्णय घ्यावा जेणेकरून वादाचे व संघर्षाचे प्रसंग उद्भवणार नाहीत.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment