आला पावसाळा, आरोग्य सांभाळा

आला पावसाळा, आरोग्‍य सांभाळा 

असहय करणा-या उन्‍हाळयानंतर आता सुखद गारवा देणा-या पावसाळयास सुरुवात झाली आहे. पावसाळयाचे दिवस हे आपल्‍या सर्वांच्‍याच दृष्‍टीने तसे आनंदाचे असतात. मुंबईसारख्‍या शहरी भागातील लोकांना हे दिवस थंड वातावरणामुळे तर ग्रामीण भागात शेतीवर उपजिविका असल्‍यामुळे प्रिय असतात. मात्र दरवर्षी येणारा पावसाळा विविध साथीच्या आजारांनादेखील आमंत्रण देत असतो हेदेखील आपल्‍याला विसरुन चालणार नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या दिवसामध्ये योग्य आहार आणि साथीचे आजार टाळण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना केल्‍या तर हया आजारांपासुन आपल्‍याला संरक्षण करता येते व पावसाळा ख-या अर्थाने आपल्‍याला सुखद जाणवेल. यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला अत्‍यंत आवश्‍यक आहे. या दिवसात बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. तसेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. लहान मुलांकडेही लक्ष दिले पाहिजे. त्यांना किरकोळ वाटणार्‍या आजारांसंदर्भात तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. पावसाळ्यामध्ये वातावरणात बदल झाल्यामुळेही अनेक आजार उदभवत असतात. पावसाळ्यादरम्यान ताप, गॅस्ट्रो, टायफॉईड, मलेरिया, डेंगू, लेप्टोस्पायरेसीस व इत्यादी आजार मोठ्या प्रमाणात होत असतात. या आजारांमुळे दरवर्षी अनेक लोक मृत्यूमुखी पडतात. प्रशासनाने आजारांचा सामना करण्यासाठी कंबर कसली असली तरी आजार उदभवण्‍याच्‍या प्रमाणात फार कपात होत नाही हीदेखील वस्‍तुस्थिती आहे. दरवर्षी आजारी पडणाऱ्या रुग्‍णांच्‍या संखेत वाढच होताना दिसत आहे. वर्षानुवर्षे वाढत असलेली लोकसंख्या हेदेखील कारण यासाठी दिले जाते. 
साथीच्‍या आजारांबाबत मोठया प्रमाणावार जनजागृती करण्‍यात येते. महापालिका रुग्‍णालयांतील काही खाटा साथीच्‍या आजारांवरील रुग्‍णांसाठी आरक्षित ठेवण्‍यात येतात. पालिकेची रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्र यातील डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचा-यांना प्रशिक्षणही दिले जाते. असे असले तरी प्रशासनाच्‍या सूचना आणि आवाहना नुसार पालिकेला सहकार्य करत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असते. म्हणून वापरातील पाणी स्‍वच्‍छ करुन वापरावे. अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे जलजन्य आजार हे या दिवसांत अधिक पसरतात. लहान मुलांना त्याची लगेचच बाधा होते. पाऊस थांबल्यानंतर साचलेल्या पाण्यामुळे मलेरियाचा फैलावही अधिक होतो. पावसाळ्यामध्ये संसर्गाची भीती अधिक असते. पाण्याच्या शुद्धतेसोबत अन्य कारणांमुळेही हा प्रादुर्भाव होत असला तरीही रोगराई झपाट्याने पसरू नये यासाठी घरात व परिसरात स्वच्छता ठेवणे हाच सर्वात मुख्य प्रतिबंधक उपाय आहे. आपल्या राहत्या परिसरात कचरा व पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. प्रकाशाची तिव्रता कमी असल्याने वातावरणातील जीवजंतूंचा नायनाट होत नाही. परिसरात कचरा व पाणी साचणार नाही, याची दक्षता घेतल्यास मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांची निर्मिती होणार नाही, रोगराईला आळा बसेल. 
आपले घर, परिसर स्वच्छ ठेवायला हवे. तसेच घरात ओला व सुका कचरा वेगळा ठेवला पाहिजे. स्वयंपाक करण्याची जागा स्वच्छ व निर्जंतुक साबणाने स्वच्छ करून घ्यावी. पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून पिणे आवश्यक आहे. घराच्या भोवती कुंड्या लावल्या असतील तर पावसापूर्वी त्याची छाटणी करावी, घरामध्ये झाडे लावू नयेत. यात पाणी साठून डासांची पैदास वाढते. पिंपामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये साठवणूक केलेले पाणी एका दिवसांच्या वर साठवून ठेऊ नये. त्यात डास वाढतात. जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत, उघड्यावरील अन्न पदार्थ आणि शिळे अन्नपदार्थ खाऊ नये. ही काळजी घेतली तर पावसाळयात आजारपणापासुन आपले संरक्षण करता येईल. 
सतत उलट्या, जुलाब होणे, ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, गळून गेल्यासारखे वाटणे,  स्त्रियांमध्ये हात पाय खूप दुखणे, मुलांमध्ये पोट दुखण्याचा त्रास,  तापाची मुदत वाढत जाणे, डोळे लालसर होणे,  खूप थकवा येणे ही पाण्यातून प्रादुर्भाव होणाऱ्या आजारांची काही सामायिक लक्षणे आहेत. सदर लक्षणे जाणवू लागल्‍यास अंगावर काढू नयेत, घरगुती औषधांवर चालढकल न करता डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यावा, औषधांचा पूर्ण कोर्स घ्यावा, गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तचाचणी करावी, आजाराची ही लक्षणे आढळल्यास प्राथमिक स्वरुपात ओआरएसचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. ओआरएस उपलब्ध नसल्यास हलका आहार घ्यावा. भाताची पेज, सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी आदी भरपूर प्रमाणात सेवन करावे जेणेकरुन अशक्‍तपणा नाहिसा होऊन रोगप्रतिकारक शक्‍ती वाढेल. 
पावसाळयात उदभवणा-या विविध आरोग्‍यविषयक समस्‍या गंभीर रुप धारण करु नयेत यासाठी आजारपणाची लक्षणे जाणवल्‍यास तातडीने शक्‍यतो जवळच्‍या सरकारी दवाखान्‍यातच उपचार घेणे फायदेशिर आहे. पावसाळा हा ऋतू आनंद घेऊन येणारा असला तरी या ऋतूत आरोग्‍याची उचित काळजी न घेतल्‍यास तो त्रासदायक ठरु शकतो. यासाठी सर्वांनी आवश्‍यक दक्षता व प्रतिबंधात्‍मक काळजी घ्‍यावी यासाठीच हे आजचे आरोग्‍यमंथन. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई   

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त