बदल की बगल ?


गणिताचे आकडे आपल्याला लहानपणापासून शाळेत शिकवले जातात. ह्या संख्या व त्यांचा उच्चार सहसा कुणी आयुष्यभर विसरत नाही. आकडे म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत वर्षानुवर्षे रूढ आहे. मात्र गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात अवाजवी बदल करणाऱ्या शिक्षण विभागाने यंदाच्या बालभारतीच्या दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात अजबच बदल केला आहे. गणिताच्या मराठी वाचनात यापुढे संख्या वाचन करताना २८ चा उच्चार अठ्ठावीस असा नाही तर दोन आठ असा करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे तेवीसचा उच्चार वीस तीन, चोवीसचा उच्चार वीस चार अशा रितीने हे उच्चार करण्यात आले आहेत. एकतीसचा उच्चार तीस एक, बत्तीसचा उच्चार तीस दोन अशा रितीने बदल करण्यात आले आहेत. संख्यावाचन करताना यापुढे विद्यार्थी ६१ या संख्येला एकसष्ट न म्हणता साठ एक म्हणतील, ६२ या संख्येला बासष्ट न म्हणता साठ दोन म्हणतील इतरही उच्चार अशाच प्रकारचे असतील. ९३ त्र्याण्णव असा उच्चार न करता नव्वद तीन असा उच्चार केला जाईल. १ ते १०० या ठिकाणी जिथे जोडाक्षर येते तिथे ती संख्या नव्या पद्धतीने वाचण्याची सूचना अभ्यास मंडळाने दिली आहे. जोडाक्षरांचा उच्चार करताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे तज्ञांकडून सांगितले जाते. मात्र यामुळे गणितातील संख्याचे वाचन सोपे झाले की कठीण हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढवणारे बदल गणिताच्या पुस्तकात करण्यात आले आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच करण्यात आलेले हे बदल का केले गेले हा प्रश्न आहेच मात्र यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. जोडाक्षर वाचताना विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते म्हणून हा बदल करण्यात आल्याचा दावा केला जातोय. मराठी जोडाक्षरं कठीण आहेत त्यामुळे त्यांचा उच्चार करणे विद्यार्थ्यांना कठीण जाते हे कारण देऊन हे बदल करण्यात आले आहेत. यात जोडाक्षरांच्या उच्चाराना बगल देण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी हा बदल विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या समोर आला आहे. संख्यांचा उच्चार कसा करावा याची जुनी आणि नवी पद्धत मांडण्यात आली आहे. मात्र शिक्षकांनी नव्या पद्धतीनेच शिकवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एकीकडे मराठी भाषेची व शाळांची राज्यातील अवस्था बिकट असताना अभ्यासक्रमात प्रगतिशील बदल होणे अपेक्षित आहे. मात्र ती आणखी सोपी करण्याचा प्रयत्न म्हणजे विद्यार्थ्यांना काठिण्यपातळीपासून दूर नेण्यासारखे आहे. अशाने सीबीएसई व आयसीएसई सारख्या माध्यमांपुढे विद्यार्थ्यांचा निभाव कसा लागेल? एकीकडे मराठी भाषेत मुलांचे नापास होण्याचे प्रमाण वाढत असताना मराठीच्या संवर्धनासाठी अभ्यासक्रम व शाळांच्या माध्यमातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील क्लिष्टता व अलंकार शालेय वयातच मुलांवर बिंबवणे गरजेचे आहे. मात्र जोडाक्षरांच्या नावाखाली ती आणखी सोपी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यातून पळवाट काढण्यासारखे आहे असे मत आहे. जोडाक्षरे मुलांना नीट बोलता येत नाहीत म्हणून दोन आकडी संख्येचा उच्चार एक एक आकड्यात करणे म्हणजे तो फुकटचा उपद्व्यापच म्हणावा लागेल. खरंच या बदलाची आवश्यकता होती का? 

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त