जागतिक योग दिनाच्या निमित्ताने..
आज २१ जून म्हणजे जागतिक योग दिवस. आज आपल्या आजूबाजूला विविध आजारांनी, व्याधींनी त्रस्त असणारे रुग्ण आपल्याला पावोलोपावली दिसतात. ओसंडून वाहणारी रुग्णालये व दवाखान्यांमधील गर्दी याची साक्ष आपल्याला देतील. पारंपरिक आजारांची व उपचारांची जागा आता संसर्गजन्य व अससंसर्गजन्य आजार अशा नव्या आधुनिक नावांनी घेतली आहे. त्यावरील निरनिराळ्या उपचार पद्धती व शस्त्रक्रिया जर आपण पहिल्या तर त्यासाठीच्या वैद्यकीय खर्चाचे आकडे पाहूनच गरगरायला होते. अशातच आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष करत आहोत असे माझे मत आहे. घर ते कार्यालय यामधील प्रवासात व कामात आपण इतके गुरफटलेले आहोत की मानसिक तणाव व शारीरिक व्याधी आपल्यामध्ये कधी घर करतात हे आपल्याला कळतही नाही. लहान मोठ्या व्याधींसाठी जवळपासच्या किंवा ओळखीच्या डॉक्टरकडे जाऊन जुजबी औषधोपचार करून घेतो व हा औषधोपचार असंख्य वैद्यकीय चाचण्यांसह वर्षानुवर्षे तसाच पुढे चालू ठेवतो. याचा परिणाम शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होण्यात तसेच मानसिक संतुलन ढासळण्यात होतो हे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. बळावणारा आजार हा गरीब, श्रीमंत, उच,नीच, जाती, जमाती असा कोणताही भेदभाव करत नाही त्यामुळे त्यातून कुणीही सुटत नाही. आता तुम्ही म्हणाल यावर उपाय काय? आजार जडला किंवा प्रकृती अस्वास्थ्यासाठी डॉक्टरकडे जाणार नाही तर काय कुठल्या बुवा-बाबाकडे? यावर एक सोपा व हक्काचा उपाय आपल्याकडे उपलब्ध आहे, तोही कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय. हा उपाय म्हणजे "योग". माणसाला जडणाऱ्या बहुतांश व्याधींवर एकमेवाद्वितीय, प्रतिबंधात्मक, कमी खर्चिक, घरात-कार्यालयात बसल्याबसल्या करता येण्याजोगा, मनोबल-आत्मविश्वास-व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत करणारा उपाय म्हणून योगाकडे पाहण्यास हरकत नाही या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो आहे. योग प्रशिक्षण देणारी एक जागा मुंबईच्या अगदी जवळ उपलब्ध असून ती म्हणजे लोणावळा या निसर्गरम्य पर्यटन स्थळी वसलेले कैवल्यधाम. कैवल्यधाम ह्या आश्रमाचा परिसर लोणावल्यासारख्या गजबजलेल्या पर्यटनाच्या ठिकाणी असला तरी कमालीचा मनःशांती देणारा आहे. अत्यंत शांत, सुंदर, स्वच्छ, झाडाफुलांनी सजलेला ह्या परिसरात प्रवेश करताच एक विलक्षण अनुभूती मिळते. जगभरातील प्रशिक्षणार्थी येथे रुग्णालय व महाविद्यालयात तीन-सहा महिने वा वर्षभराचे योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी वास्तव्य करत असल्याचे आढळते. त्यांच्याशी संवाद साधल्यावर योगाचे महत्व जागतिक पातळीवर किती प्रभावाने पसरले आहे याची प्रचिती येते. 'योग' साधनेची उत्पत्ती भारतात झाली व आज जगभराने योगाचे महत्व जाणून मोठ्या प्रमाणावर योग धारणेला स्वीकारले आहे. त्यामुळे 'योग' ही भारताने जगाला दिलेली एक देणगी आहे असे म्हटले जाते. 21 जून रोजी भारतात साजरा होणारा 'जागतिक योग दिवस' आज जगभरात साजरा केला जातो यावरूनच योगाचे वैश्विक महत्व लक्षात येईल. आज शहरी भागात काम करणाऱ्या बहुतांशी नोकरदारांना पाठ, मणके, गुढगे, सांधे, मानसिक तणाव, अशांती आशा विकारांनी ग्रासलेले आहे. त्यांच्यासाठी योग साधनेतील विविध थेरपी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत व त्याही कोणत्याही साईड इफेकटशिवाय. 'योग' हा विषय अत्यंत व्यापक स्वरूपाचा असून परदेशी लोक त्यामध्ये अधिक रुची दाखवत असताना आपल्या देशात मात्र त्याचा पाहिजे तितका प्रसार अजून झालेला नाही ही शोकांतिका आहे. कैवल्यधाम सारख्या भारतातील योग प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन विदेशी प्रशिक्षणार्थी आपापल्या देशात योगाचा प्रसार व व्यवसाय करतात. यामुळे उद्या परदेशी संस्था व प्रशिक्षक आपल्या देशात येऊन आपल्याच देशात उत्पन्न झालेल्या या थेरपिवर आपणाला प्रशिक्षण देऊ लागले तर नवल वाटू नये. योगाचे महत्व देशाच्या पंतप्रधानांनी देखील ओळखून जागतिक पातळीवर त्याचा विस्तार करण्याचा तसेच आयुष मिशन सारखे मोठे अभियान देशात सुरू करण्याचे महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. अनेक असाध्य आजारांना ऑलोपॅथीशिवाय पर्याय नसला तरी या आजारांबाबत उचित दक्षता व शारीरिक हालाचालींद्वारे नियंत्रण मिळवण्यासाठी योग साधना खूप मोठी भूमिका बजावू शकते हे विसरून चालणार नाही. ज्यांना दररोजच्या धकाधकीच्या जीवनापासून दोन क्षण निवांतपणे निसर्गाच्या सानिध्यात योग अभ्यास करण्यासाठी व्यतीत करायचे असतील तर त्यांच्यासाठी लोणावळ्यातील 'कैवल्यधाम' ही अतिशय उत्तम जागा आहे.

Comments
Post a Comment